सर्वांत अधिक तोटा दिगंबरांचा!
काँग्रेस पक्ष फोडण्याचे सारे प्रयत्न फसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 6 सप्टेंबरपर्यंत स्वत: मायकल लोबो यांनीही वाट पाहिली. त्यांची वालंकिणी भेट ठरल्याप्रमाणे उरकण्यासाठी ते निघूनही गेले. ‘6 तारखेनंतर मी काही थांबणार नाही’, असेही त्यांनी भाजप नेत्यांना बोलून दाखवले होते. लोबो यांना तसा फारसा फरक पडत नाही. ते भाजपला निकट गेले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे सहज जाऊन बसू शकतात; हास्यविनोदात भाग घेऊ शकतात. दुर्दैवाने दिगंबर कामत यांचे तसे नाही. कामत यांचे एक स्थान आहे. ते अगदीच खालच्या स्तराला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ‘ऑपरेशन लोटस’ असफल झाल्याचा सर्वांत अधिक तोटा दिगंबर कामतांनाच झाला आहे. ते काल पत्रकारांवरही चिडले. मोहीम अयशस्वी झाल्याचा सारा दोषही त्यांच्यावर आला. ते अशा मोहिमा हाताळू शकत नाहीत, असाही संदेश गेला. ∙∙∙
चोडणकरांची तलवारबाजी
गिरीश चोडणकर यांनी सध्या भाजप सरकारविरुद्ध तोफा डागणे चालवले आहे. काँग्रेसवाले गप्प आहेत, या पार्श्वभूमीवर कोणतेही स्थानिक पद नसलेले चोडणकर हे तलवारबाजी चालवत आहेत, हे दृष्य आगळे-वेगळे आहे. मिलिंद नाईक यांचा फडशा पाडल्यानंतर आता त्यांनी आपली तलवार जमीन हडप प्रकरणात गुंतलेल्या मंत्र्यांच्या विरोधात उगारली आहे. ते कुणाचेच नाव घेत नाहीत. काल त्यांनी ‘एसआयटी’कडे आवश्यक पुरावे व नावही असल्याचा दावा केला. ‘हा’ मंत्री कोण, या संदर्भात गोव्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनाही ‘तो’ नकोसा असल्याची चर्चा खुद्द भाजपचे ज्येष्ठ नेते करतात. काँग्रेसला भगदाड पाडण्यात सुरू असलेल्या मोहिमेला ज्या दोन मंत्र्यांनी ‘खो’ दिला, त्यात तेही एक होते. त्यामुळे अमित शहा यांच्याकडेही त्यांच्याविरोधात तक्रार गेली आहे. या पार्श्वभूमीवर सदर मंत्र्याचे गर्वहरण आपोआप होत असेल तर ते मुख्यमंत्र्यांना हवेच आहे. गिरीश चोडणकरही दर दोन दिवसांनी त्यांच्याविरोधात नवे प्रकरण उपस्थित करणार आहेत. ∙∙∙
(Digambar Kamat has suffered the most from failure of Operation Lotus)
लोकप्रतिनिधींची मोठी पंचाईत!
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचा बुधवारी बार्देश तालुका दौरा होता. यावेळी प्रोटोकॉलनुसार कार्यक्रमाचे वेळापत्रक होते. त्यानुसार, संबंधित स्थानिक लोकप्रतिनिधींना थेट व मोजकेच बोलण्यासाठी दोन मिनिटेच दिली. यावेळी काही लोकप्रतिनिधी हे हिंदीतून बोलू लागले. मात्र, अनेकांचे हिंदीवर प्रभुत्व नसल्याने अनेकांची पंचाईत झाली. आपल्या मोडक्यातोडक्या हिंदी भाषेत संबंधितांनी मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते जमले नाही! काही लोकप्रतिनिधींनी कोकणीतूनच भाषण केले. याची राज्यपाल साहेबांनी प्रशंसा केली व तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोचल्या, असे सांगत आपल्या भाषणावेळी अनुमोदन दिले. मुळात भावनांना भाषेची गरज नसते. कारण, प्रामाणिकपणे एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केल्यास, ती संबंधित व्यक्तीपर्यंत पोचते हे नक्की. अन्यथा जमत नसलेली भाषाप्रयोग केल्यास, गोष्टी या अकारण क्लिष्ट बनतात व मुद्दा भरकटत जातो, तो अशाप्रकारे बरं का! ∙∙∙
खरेच काँग्रेस फुटणार!
यावेळी आपलेच सरकार सत्तेवर येणार या आविर्भावात सगळे काँग्रेस नेते होते. त्यांचा भ्रमाचा भोपळा निवडणूक निकालाने फुटला. सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेवर आला. त्या दिवसापासून काँग्रेस फुटीचे वृत्त दिवसाआड येत आहे. त्यांतून त्या पक्षाने आपल्या दोन नेत्यांविरुद्ध अपात्रता याचिकाही दाखल केली आहे. तरीही येणाऱ्या बातम्या थांबलेल्या नाहीत. या एकंदर घडामोडीत सर्वसामान्य वाचकांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे. काहींना तर या वार्ता म्हणजे ‘लांडगा आला रे आला’ या गोष्टी प्रमाणे वाटत असून उद्या खरेच काँग्रेस फुटली, तरी त्यात त्यांना विशेष काही वाटणार नाही, असे त्या पक्षाचे कार्यकर्तेच म्हणू लागले आहेत. ∙∙∙
बाबूशचे प्रशस्तिपत्र
गोव्यात गेल्या महिनाभरात ज्या काही घटना घडल्या आहेत, त्यावरून सरसकट सर्वच विरोधी पक्षांनी आकाशपाताळ एक करण्यास प्रारंभ केला आहे. त्यांनी ते तसे करणे स्वाभाविकच आहे. आपले खासदार सार्दिनबाब सुध्दा त्याला अपवाद नाहीत. मात्र आपले दिगंबरबाब अजून या मुद्द्यावर काही बोललेले नाहीत, कदाचित त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त जवळ आलेला असावा, हे त्यामागे कारण असू शकते. तर असो, मात्र महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गोवा पोलिसांची बाजू उचलून धरण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे अनेकांचे डोळे विस्फारलेले आहेत. पण बाबूश हे उगाच अशी बडबड करणाऱ्यांपैकी नाहीत, त्यांनी ज्या अर्थी पोलिसांची तळी उचलून धरली आहे. त्याअर्थी त्या मागे निश्चित कारण असून त्यांचे पणजीतील विरोधक त्याचा शोध घेताना दिसत आहेत. ∙∙∙
कुंभारजुवेत भाजप की काँग्रेस?
कुंभारजुवे मतदारसंघात कॉंग्रेसचे अनेक नेते होते, पण ऐनवेळी कोणी भाजप, तृणमूलमध्ये प्रवेश केला. कोणी सपशेल माघार घेतली आणि काँग्रेसचे उमेदवार राजेश फळदेसाई निवडणूक आले आणि भाजपकडून एक मतदारसंघ निसटला अशी चर्चा सुरू झाली. पण आत्ता नेमकी स्थिती वेगळी आहे. कारण सगळीकडे काँग्रेसचा आमदार असूनही सगळीकडे भाजपचीच चर्चा दिसते. काँग्रेस फुटणार, या चर्चेत कुंभारजुवेचे नेतृत्वही भाजपात जाणार,अशीच चर्चा रंगते. ही चर्चा गेल्या दोन महिन्यापासून सुरू असून अद्याप काहीच बदल झालेला नाही. नेमका केव्हा मुहूर्त मिळणार? हे कोणीच ठामपणे सांगत नाहीत, पण कोपऱ्या कोपऱ्यावर चर्चा मात्र नेहमीच रंगत आहे. कारण या मतदारसंघातून निवडून आलेल्यांनी अनेक वेळा पक्षांतर केले आहे, हे मात्र शंभर टक्के खरे! ∙∙∙
बाबा को गुस्सा क्यों आता है!
मडगावचे बाबा म्हणजेच दिगंबर कामत हे खरे तर शांतपणे निर्णय घेणारे राजकारणी. ते सहसा कुणावर चिडलेले कधी कुणी पाहिलेले नाही. पत्रकारांवर तर नाहीच नाही. मात्र आता तेही चिढू लागले आहेत, याचा अनुभव दोनवेळा मडगावच्या पत्रकारांनी घेतला. दोन्ही वेळा निमित्त होते, ते त्यांचा दिल्ली दौरा. त्यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात त्यांना मंगळवारी काही पत्रकारांनी विचारले असता, माझ्या खासगी दौऱ्याची तुम्हाला माहिती कशासाठी हवी? असे म्हणत ते भडकले. काय बरे झाले असेल, बाबांचा आता संयम सुटू लागला आहे. घास अगदी तोंडाकडे आहे. मात्र तो घेता येत नाही, अशा विचित्र कात्रीत बाबा सापडले आहेत. त्यांचा संयम सुटण्यामागचे कारण हेच तर नाही ना! ∙∙∙
‘त्या’ उमेदवारांच्या मनात भीती!
गोमेकॉत झालेल्या नोकर भरतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिल्याने यासंदर्भात सुनावणी सध्या सुरू आहे. परंतु, या नोकर भरतीत नोकऱ्या मिळालेल्या उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात सध्या भीती निर्माण झाली आहे. गोव्यात सरकारी नोकरी मिळण, हे अवघड असून, एकदा मिळालेली नोकरी कोणत्याही परिस्थितीत टिकली पाहिजे, असे लोकांचे मत आहे. त्यासाठी अनेक उमेदवारांनी कायदेशीर सल्ले देखील घ्यायला सुरुवात केली आहे. आपल्या नोकरीवर कोणत्याही प्रकारचे सावट येणार नाही, यासाठी त्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी देखील ठेवली आहे. ∙∙∙
राज्यात सहा हजार खड्डे ?
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि गाव जोड रस्ते हे दळणवळणाचे मुख्य साधन आहेत. मात्र या रस्त्यांवर तब्बल सहा हजार खड्डे पडले असल्याचे कबुली आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी दिली. यासाठी तातडीने आणलेल्या चार जेट पॅचरच्या साहाय्याने हे खड्डे बुजवण्यात येत आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यात या ६ हजार पैकी केवळ अडीच हजार खड्डे बुजवल्याचे त्यांनीच सांगितले. सरकारने यापूर्वी अनेक वेळेला राज्यातील रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याची आश्वासन दिली होती. ती नेहमीप्रमाणे फेलही ठरली होती. आता उरलेले साडेतीन हजार खड्डे कधीपर्यंत बुजवले जाणार? हा प्रश्न सोशल मीडियावर ट्रोलिंग होत आहे. आता पाऊस कमी झाला आहे. बघूया सुपर जेट पॅचरना कधी गती येते ती. तोपर्यंत हळू आणि सुरक्षित वाहन चालवा. ∙∙∙
‘आरजी’चे तुणतुणे!
आरजी पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब राज्यातील गुन्हेगारीचा मुद्दा कमी मुख्यमंत्र्यांनाच घायाळ अधिक करत होते. निवडणूकीनंतर आता पुन्हा मनोजबाब फॉर्मात येत आहेत. राज्यात देखील गुन्हेगारी वाढल्याने विरोधकांना आयतेच कोलीत सापडले आहे आणि जो तो आपापले तुणतुणे मोकाटपणे वाजवत सुटल्याचे दिसत आहे. मनोज परब आज मुख्यमंत्र्यांची स्तुती करत होते की टीका हे त्यांचे त्यांनाच माहित... कारण, राज्यातील गुन्हे वाढीत परप्रांतीय जबाबदार असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे ते समर्थन करत होते . परंतु , मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शिक्षणमंत्री म्हणून असमर्थ ठरतायेत असे त्यांचे म्हणणे कितपत योग्य हे त्यांनाच माहित. ∙∙∙
अमित पाटकर अतिसक्रिय
जेव्हापासून गोवा प्रदेश काँग्रेस समितीची धुरा अमित पाटकर यांनी सांभाळली आहे. तेव्हापासून त्यांनी आपल्यापरीने ही जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न केला आहे. आज देखील ‘भारत जोडो’ मोहिमेत देखील पाटकर हे उपस्थित होते. सध्या काँग्रेस पक्षात दोन गट झाले असून, पाटकर यांना संघटनेवर आपली पकड बळकट करण्यासाठी काटकसर करावी लागत आहे. परंतु, या आव्हानाला ते हिमतीने सामोरे जात असल्याचे दिसून येते. विधानसभा निवडणुकीत देखील पाटकर यांनी आपली धडाडी दाखवली होती. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष अशी महत्त्वाची भूमिका काँग्रेस पक्षश्रेष्ठीने दिली आहे. आपल्याकडून प्रयत्न कमी पडणार यासाठी पाटकर हे सध्या अतिसक्रिय झाले आहे. ∙∙∙
मंत्रालयातील खट-खट!
सध्या मंत्रालयांवर रूफटॉप घालण्याचे काम सुरू आहे. बरोबरच मंत्रालयातील मंत्र्यांच्या केबिन दुरुस्ती सुरू आहे. मात्र गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली ही खट-खट चालूच आहे. याला पावसाचा अडथळा होत आहे म्हणे. पण ऐन पावसाळ्यातच अशी कामे का घेतली जातात? हाही प्रश्न आहे. या खटखटीमुळे मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी मंत्रालयात येणे कमी केले आहे. त्याऐवजी त्यांनी इतर कार्यालयाचा आसरा घेतला आहे. मुख्यमंत्री आपल्या शासकीय बंगल्यातून आणि पर्यटन भवनातून आपला कारभार हाकत आहेत. तर नंबर दोनचे मंत्री विश्वजित राणे यांनी वनविभागाचे कार्यालय आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सर्वांना आतुरतेने प्रतीक्षा आहे, ती मंत्रालयाच्या नूतनीकरणाची. बघूया हे काम कधी संपते आणि मंत्रालयातील खट-खट थांबते कधी?∙∙∙
मायकल लोबोंची वारी
काँग्रेसचे आमदार फुटतील, अशा चर्चांमुळे सध्या समाजमाध्यम ढवळून निघाले आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांबाबत लोकं आपली मते स्पष्टपणे व्यक्तही करू लागली आहेत. काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काहीकाळ सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणारे मायकल लोबो हे आता भाजपच्या नजीक येऊनही सध्या विरोधीपक्ष नेतेपदी आहेत. त्यांना भाजपमध्ये जायचे आहे; पण पक्ष प्रवेशासाठी आवश्यक दोन तृतीयांश आमदार संख्या काही केल्या होईना. अखेर नाराज झालेले लोबो हे कुटुंबीयांसह वालंकणी येथे दर्शनाला गेले. तेथे सायबीणीचे दर्शन घेतानाचे त्यांचे छायाचित्रही चांगलेच व्हायरल झाले. आता लोबोंनी सायबीणीकडे काय मागितले असावे ते वेगळे सांगण्याची गरज नाही. सुज्ञास अधिक सांगणे न लगे! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.