Goa Crime : उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी असे मानले जाते. मात्र दक्षिण गोव्यात मागच्या दोन महिन्यातच तब्बल 5 खूनांच्या घटना घडल्याने या कल्पनेला तडा गेला आहे. यातील प्रत्येकी दोन खून वास्को आणि मडगाव परिसरात घडले असून एक खून कुडचडे परिसरात झाला असून त्यामुळे सर्व जिल्हा हादरून गेला आहे.
मागच्या दोन महिन्यात या जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही खुनांची मालिका 14 जुलै पासून सुरू झाली. आझाद नगरी मडगाव येथे मुक्तार बदानी या 25 वर्षीय युवकाचा त्याच्या वाढदिवसाची पार्टी चालू असतानाच पाच जणांच्या गटाने हल्ला करून करून खून केला. पूर्व वैमस्यातून हा खून करण्यात आला होता.
या घटनेतून जिल्हा पोलीस सावरण्याआधीच 6 ऑगस्ट रोजी सांखवाळ येथे निमिशा गोणे या युवतीने घरगुती भांडणातून आपल्या 14 महिन्याच्या मुलीचा खून करून नंतर स्वतः जुवारी नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 17 ऑगस्ट रोजी हाउसिंग बोर्ड मडगाव येथील अब्दुल रौफ याने आपली पत्नी नसीमा हिला मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. फातोर्डा पोलिसांनी हे खुनाचे प्रकरण म्हणून नोंद केले आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 1 ऑगस्ट रोजी रेती माफियांनी केलेल्या गोळीबारात युसुफ आलम (21) या झारखंड येथील कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच पूर्ववैमनस्यातून वास्को येथे पाच जणाकडून दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यात उमेश हरिजन या युवकाचा खून केला गेला.
या दोन महिन्यात महिलांवर अत्याचार होण्याच्याही घटना दक्षिण गोव्यात घडल्या असून त्यातही वास्को आघाडीवर आहे. 11 ऑगस्ट रोजी वास्को येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पाच जाणानी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. तर त्यापूर्वी 10 जुलै रोजी कुडतरी येथून एका 22 वर्षीय तर केपे येथून एका 10 वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. चार दिवसांपूर्वी पाजीफोंड मडगाव येथील एका अनाथाश्रमातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. त्यापूर्वी शिरवडे मडगाव येथे राहणाऱ्या एका अलपवयीन मुलीवर मातृत्व लादल्या प्रकरणी कोलवा पोलिसांनी एकाला अटक केली होती.
या सर्व घटनातील एक समान धागा असा की या सर्व घटना बिगर गोमंतकीयांशी निगडित असून गोवा आपल्या मूळ संस्कृती पासून भरकटत चालल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.
सरकारी धोरणे व्यवस्थीत नसल्याने गुन्हेगारी
गोव्यात हल्लीच्या काळात ज्या गुन्हेगारी घटना घडल्या आहेत त्या एकतर नैराश्यातून किंवा व्यावसायिक चढाओढीतून घडल्या आहेत. राज्यात एकाबाजूने बेकारी वाढत आहे. दुसऱ्या बाजूने सरकारची धोरणेही व्यवस्थित नाहीत. गोवा सरकारने रेती उत्खनना संदर्भात व्यवस्थित धोरण ठरविले असते तर कुडचडे येथे खून झालाच नसता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.