

डिचोली: डिचोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या मुख्य जलवाहिनीचा दुरुस्तीनंतर अवघ्या काही तासांत पुन्हा भंग झाल्याने शहरवासीयांना सलग दुसऱ्या दिवशीही पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अखेर शुक्रवारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण करून दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
शहरातील मुस्लिमवाडा परिसरात ही मुख्य जलवाहिनी भररस्त्यात फुटली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू होती. या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर गुरुवारी संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती केली होती.
मात्र रात्री उशिरा पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही तासांतच जलवाहिनीतील दाब वाढल्याने दुरुस्ती केलेल्या ठिकाणी पुन्हा बिघाड निर्माण झाला आणि जलवाहिनी दुसऱ्यांदा फुटली.यामुळे मध्यरात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले. मुस्लिमवाडा परिसरातील रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागले, तर गटारेही पाण्याने तुडुंब भरली. दुरुस्तीचे काम समाधानकारक झाले नसल्यानेच पाण्याच्या प्रचंड दाबामुळे जलवाहिनी पुन्हा फुटल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याची माहिती मिळताच आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे आदेश दिले. त्यांच्या निर्देशानुसार पाणीपुरवठा विभागाने सकाळीच युद्धपातळीवर काम हाती घेतले. अभियंते व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तळ ठोकून दुपारपर्यंत दुरुस्ती पूर्ण केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.