

सांगे: धनगर समाजाचा एसटीत समावेश करण्यासाठी सांगे तालुक्यातील धनगर समाजाने रविवारी सांगेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सरकारने योग्य विचार न केल्यास परिणाम वेगळा होणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सांगेतील श्रीसन प्लाझा सभागृहात झालेल्या या सभेस तालुक्यातील हजारभर धनगर बांधव उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाने समाजावर होणारा अन्याय आता खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला.
धनगर समाजाचा आक्रोश सुरूच असून, शेवटचा प्रयत्न म्हणून राज्यभरातील धनगर समाज प्रत्येक मतदारसंघात निर्धार मेळावे घेऊन सरकारचे लक्ष वेधून घेत आहे. या समाजातील युवक आता जागृत झाले आहेत. त्यांच्यावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. आता या समाजाला रोखणे कठीण आहे. गेली तेवीस वर्षे प्रतीक्षा केली, पण न्याय मिळत नाही, ही खंत समाजात पसरली आहे. केवळ चुका काढण्यात वेळ घालविला जात असल्याची भावना माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर धनगर समाजाचे नेते लक्ष्मण कवळेकर, विठू खरात, वाघा मिसाळ, विठोबा खरात, बाळू रेकडो, सावित्री कवळेकर, अध्यक्ष बाबू जांगळे, माया जांगळे, दीप्ती शिंगाडे, दीपक लांबोर, रामा मिसाळ, सरपंच बुंदा वरक, मनीष लांबोर यांच्यासह इतर स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्ष्मण कवळेकर म्हणाले की, समाजाच्या हितासाठी बाबू कवळेकर यांनी राजकीय हित न पाहता काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला; पण भाजप नेत्यांनी समाजाला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. आमचे नेते बाबू कवळेकर यांच्या साध्या स्वभावाचा सरकारने गैरफायदा घेऊ नये. सरकारला १५ ऑगस्टची तारीख देण्यात आली आहे; अन्यथा गोव्यात कोक्रोच पार्टी जन्माला येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
सांगे तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष बाबू जांगळे यांनी येत्या १५ ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न केल्यास पणजीत जेलभरो आंदोलन करण्यास मागे हटणार नाही, असे सांगितले. वेळ आल्यास तीव्र आंदोलन करण्यास समाज सज्ज असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
धनगर समाज सर्वांत पिचलेला समाज असताना सरकार वारंवार अन्याय करीत आहे, असा आरोप जया यमकर यांनी केला. अभिजित मिसाळ, वाघा मिसाळ, दिलीप वरक, गंगाराम लांबोर, विठू खरात, दीपक लांबोर, रामा मिसाळ आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन जना वरक यांनी केले. जानो झोरे यांनी आभार मानले.
अन्याय दूर करा : कवळेकर
बाबू कवळेकर म्हणाले की, गेली साडेचार वर्षे आपण विधानसभेत नसल्याने एकाही आमदाराने धनगर समाजाचा विषय विधानसभेत उठविला नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना सोबत घेऊन दिल्लीवारी केल्या. त्यामुळे आज नाही तर उद्या यश मिळणार, अशी आशा वाटत असताना धनगर समाजाचा अहवाल फेटाळून लावल्याचे कळविण्यात आले. धनगर समाजाला फसविण्याचे दिवस आता संपले. युवक आता आपला हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्यास सज्ज आहेत. समाजावर झालेला हा अन्याय दूर करा, अशी मागणी त्यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.