

केपे: देवसा-केपे येथील श्री दामोदर संस्थान मालकीच्या जमिनीवर ध्यान फाउंडेशनच्या गोशाळेसाठी उभारण्यात आलेल्या किमान आठ शेड अज्ञात व्यक्तींनी जमीनदोस्त केल्याच्या घटनेचा निषेध करत त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी गोप्रेमींनी केली. या मागणीसाठी देवसा येथे सुमारे शंभर गोप्रेमी एकत्र आले होते.
पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींना अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.बजरंग दल गोवा विभागाचे विराज देसाई यांनी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले.
भर पावसात गोवंशाची पर्वा न करता शेड पाडण्यात आल्यामुळे जनावरे उघड्यावर पडली आहेत. पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक करावी, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. भगवान रेडकर, जयेश नाईक यांनी गोमातेच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
संस्थानचा संबंध नाही : मंजुनाथ दुकळे
जांबावली श्री दामोदर संस्थानचे अध्यक्ष मंजुनाथ दुकळे यांनी गोशाळा शेड मोडतोड प्रकरणात संस्थान समितीचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. ज्या लोकांना आम्ही शिरवई येथील आमची जागा दिली तसेच प्रत्येक गुरांची देखभाल करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपयांची मदत केली, याची जाण त्यांना असायला हवी असे सांगून ध्यान फाउंडेशन गुरांची राखण करत नाही तर त्यांना कत्तलखान्यात पाठवण्याचे काम करत असल्याच सनसनाटी आरोप त्यांनी केला. गोशाळा चालविण्याच्या नावाखाली जमीन हडप करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांनीच त्या शेड जमीनदोस्त केल्या आहेत, असा दावाही त्यांनी केला.
पाणी साचल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती
केपे उपजिल्हाधिकाऱ्यांनी ध्यान फाउंडेशनला बारा दिवसांच्या आत देवसा येथे असलेली गुरे सुरक्षित ठिकाणी हलवावी असा आदेश दिला आहे. तसेच देवसा येथे ज्या ठिकाणी गुरांना ठेवण्यात आले होते, त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले असल्याने रोगराई पसरू शकते. त्यामुळे शेडचे साहित्यसुद्धा बाजूला करावे, असे आदेशात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.