Goa Shigmotsav 2023 नुकताच सत्तरी तालुक्यात शिगमोत्सव अगदी थाटात पार पडला. विशेषकरून 16 रोजी वाळपईत लोकोत्सवही झाला. या शिगमोत्सव काळात सत्तरीत गावागावांत विविधांगी परंपरेने नटलेले खेळप्रकार करण्यात आले.
रोमटामेळ, करवल्या, चोरोत्सव इत्यादी रोमांचपणे करण्यात आले. यासाठी कलाकारांची वेशभूषा करणे अगदी कठीणच असते. ती जबाबदारी पेलतात होंडा-सत्तरी-गावकरवाडा येथील युवा कलाकार व विद्यमान पंच दीपक गावकर. त्यांच्या कलेत जिवंतपणा दिसून येतो.
होंडा भागात सुमारे चार रोमटामेळ पथके आहेत. त्यात युवकांना रंगविण्यासाठी दीपक गावकर यांनाच बोलविले जाते. दीपक यांनी विविध कला आत्मसात केल्या आहेत. त्या कलांच्या माध्यमातून परिसरात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या कलेला मोठ्या प्रमाणात वाव दिला आहे.
माझी समाजात खरी ओळख ही लोकोत्सवातून झालेली आहे. तिथे प्रदर्शनात ठेवलेल्या चित्रांमुळे अनेकांशी मैत्रीही झाली. घरच्या परिस्थितीमुळे आठवीत शाळा सोडावी लागली. पण आपल्याकडे कलेची जोड आहे याचा आत्मविश्वास होता. आपण विविध हॉटेल्समध्ये भिंतींवर पेंटिंग केले आहे.
2000 सालापासून गणपती मूर्ती व अन्य रंगकला काम करीत आहे. नुकतेच शिगमोत्सवात अनेकांची रंगभूषा व वेशभूषा केली होती. ती आवड बनली आहे. काही वेळेला पदरमोड करूनही हे काम करीत आहे.
- दीपक गावकर, युवा कलाकार व विद्यमान पंच, होंडा
होंडा परिसरात उमटवली वेगळी छबी
चित्रकला, मातीकाम, इको फ्रेंडली कला, टाकाऊपासून टिकाऊ, क्राफ्टिंग, मुरल आर्ट, कॅनव्हास पेंटिंग, भिंतीवर चित्र रेखाटणे, वॉटर कलर्स पेंटिंग, पोटरेट पेंटिंग, मॉर्डन आर्ट, गणपती करणे अशा विविध माध्यमांतून दीपक गावकर यांनी होंडा परिसरात वेगळीच छबी उमटविली आहे.
कोणी सांगितले तर त्यांच्या घरी जाऊन भिंतींवरही आकर्षक पेंटिंग ते करतात. त्यांनी काढलेली पेंटिंग्स खूपच मनमोहक असतात. त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणांहून बोलावणे असते,
पेंटिंग्सची लोकांना भुरळ
राज्यात ठाणे, पणजी, काणकोण, साळगाव, झुआरीनगर-वास्को अशा ठिकाणी झालेले लोकोत्सव अन्य महोत्सवांत दीपक यांनी आपल्या पेंटिंग कलेचे प्रदर्शन भरवीत लोकांना भुरळ घातली होती.
विशेष म्हणजे पणजी कला अकादमीत चार वर्षांअगोदर झालेल्या लोकोत्सवात चेन्नईतील हरिप्रसाद शर्मा यांच्याशी दीपक यांची भेट झाली होती. तेव्हापासून हरिप्रसाद हे दरवर्षी दीपककडून पेंटिंगची मागणी करीत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.