Davorlim Sadiq Bellary Murder Case: भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रुमडामळ-दवर्ली येथे सादिक बेल्लारी याचा खून केला असला, तरी प्रत्यक्षात हा प्रकार एका तऱ्हेने गँगवॉरचाच भाग असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
या प्रकरणात सध्या दोघांना अटक केली असली तरी खुनाचा कट रचण्यात आणखी काहीजणांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत. या प्रकरणात आणखी कोण गुंतले आहेत का, याचाही तपास सुरू आहे, अशी माहिती सासष्टीचे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी दिली.
सादिक बेल्लारी आणि सध्या अटक केलेले कादर खान आणि तौसिफ कडमनी हे तिघेही पूर्वी कुख्यात गुंड टायगर अन्वर याच्या गँगमध्ये काम करायचे. दक्षिण गोव्यात त्यांनी गुंडगिरीने दहशत निर्माण केली होती.
मटकावाले आणि अन्य जुगारी अड्डे चालविणाऱ्यांकडून ते लाखोंचा हप्ता गोळा करायचे. याच कमाईच्या वाटणीवरून त्यांच्यात नंतर वाद होऊन जावेद चॉप्सी आणि टायगर अन्वर अशा दोन गटांत विभागणी झाली.
तेव्हापासून एकमेकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी या दोन गटांत वरचेवर हाणामाऱ्या व्हायच्या. तीन वर्षांपूर्वी कादरचा भाऊ मुजाहीद खान याचा खून याच दोन टोळ्यांमधील शत्रुत्वातून झाला होता. त्यावेळी सादिक व सुलेमान या दोघांनी मुजाहीदवर हल्ला चढवून त्याला ठार केले होते.
ज्या दिवशी मुजाहीदचा खून झाला, त्याच दिवशी कादरने या खुनाचा वचपा काढण्याचे ठरविले होते. खुनाच्या सुनावणीसाठी या संशयितांना मडगाव कोर्टात आणले असता, तिथेही या दोन गटांतील गुंडांमध्ये वाद झाला होता. याची ठिणगी नंतर कधी तरी उडणार, हे त्यावेळीच स्पष्ट झाले होते.
गुंडांचा शेवट हत्येनेच
एकदा गुंडगिरीत कुणी सामील झाला तर त्याचा शेवट हत्येनेच होतो, असे सांगितले जाते. टायगरच्या टोळीतील चार सदस्यांचा असाच खात्मा झाल्याने त्यावर पुन्हा शिक्कमोर्तब झाले.
टायगरवर मडगावात दिवसाढवळ्या हल्ला झाल्यानंतर त्याने जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात आसरा घेतला होता; पण तिथेही त्याने कारनामे सुरू ठेवल्याने तिथल्या दोघा भावांनी भर रस्त्यावर त्याच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून यमसदनी धाडले होते.
या टोळीतील चोर अन्वर याचा मोती डोंगरावर झालेल्या हल्ल्यात खून झाला होता. तीन वर्षांपूर्वी मुजाहीदचा सादिकने खून केला, तर आता सादिकचा गेम कादरने बजावला.
जंगी पार्टी
सादिक बेल्लारी याला दोन महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने तो सुटला. पुन्हा दवर्ली येथे आल्यावर त्याने आपल्या मित्रांना जंगी पार्टी दिली होती.
या पार्टीमुळे कादरचे पित्त आणखी खवळले होते. त्या दिवसापासून तो सादिकचा काटा काढण्याची संधी शोधत होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.