Danielle McLaughlin Murder Case: ब्रिटिश-आयरिश पर्यटक तरूणी डॅनिएल मॅक्लॉफिन हिची 2017 मध्ये गोव्यातील काणकोण येथे बलात्कार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी गोवा पोलिसांनी विकट भगत याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध मडगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.
भगत याच्यावर डॅनिएलच्या बलात्कार आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाला सहा वर्षे झाली आहेत. पैकी न्यायालयात या खटल्याला सुरवात होऊन 5 वर्षे झाली आहेत. 2018 मध्ये खटला सुरू झाला होता.
गेल्या 5 वर्षात या खटल्यात सुमारे 200 सुनावणी होत आल्या आहेत. त्यामुळे डॅनियलला न्याय मिळणार तरी कधी? असा सवाल केला जात आहे.
डॅनिएलच्या मातोश्री अँड्रिया ब्रॅनिगन यांना हे सर्व सहन होणे कठीण झाले आहे. खटल्याला होत असलेल्या विलंबामुळे आरोपी पुन्हा जामिनासाठी अर्ज करेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
ब्रॅनिगन म्हणाल्या की, “खटला द्रुतगतीने चालला पाहिजे. आजपर्यंत ज्या पद्धतीने ही सुनावणी सुरू आहे, त्यावरून वाटते की डॅनियलला न्याय मिळणार नाही. पण नवीन महिला न्यायाधीश आणि सरकारी वकीलांमुळे मी अजूनही सकारात्मक आहे.”
दरम्यान, एका आयरिश न्यूज पोर्टलशी बोलताना ब्रॅनिगन यांनी म्हटले आहे की, आरोपी म्हणत आहे की त्याला तुरुंगाच्या रक्षकांनी मारहाण केली. तो रुग्णालयात आहे आणि मला त्याच्या प्रकृतीविषयी माहिती नाही. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करायचे आहे.
त्याला सोडले जाईल हा विचार खूप त्रासदायक आहे. गेल्या आठवड्यात नवीन महिला न्यायाधीश नेमल्या आहेत. त्यामुळे आशा आहे की त्या या खटल्याला गती देतील.
डॅनिएल, आयर्लंडच्या बुंकराना येथील असून, मार्च 2017 मध्ये गोव्यातील काणकोण येथील सुट्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या एका निर्जन ठिकाणी ती मृतावस्थेत आढळून आली होती. तिचे वय तेव्हा 28 वर्षे होते.
बलात्कार करून खून करण्यापूर्वी तिला बाटलीने मारहाण करण्यात आली होती.
ती गोव्यात योगाचे प्रशिक्षण घेणार होती. तिच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी काणकोण बीचजवळ होळीच्या पार्टीत ती सहभागी झाली होती.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीच या प्रकरणात न्यायालयाने त्वरीत निर्णय द्यावा, अशी विनंती ब्रिटीश उपउच्चायुक्त अॅलन गेमेल आणि कॉन्सुल जनरल ऑफ आयर्लंड अनिता या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.
या खटल्यात न्यायालयाचा निकाल येणे हे ब्रिटिश आणि आयरिश सरकार तसेच मॅक्लॉफ्लिनच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले होते. आम्ही हे प्रकरण संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून मांडले आहे.
खटल्याच्या गतीबद्दल आणि डॅनियलच्या कुटुंबावर त्याचा होत असलेला परिणामाबद्दल आम्हाला चिंता वाटते. म्हणून आम्ही एकत्रितपणे गोव्यात आलो आहोत, असे त्यांनी सांगितले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.