
मडगावकरांचे ग्रामदैवत असलेला श्री दामोदर या देवाचे मंदिर जांबावलीला असले तरी मडगावसह वास्को शहरातही त्याची सासाय असल्याचे मानले जाते. विठ्ठल जसा पंढरीच्या वारकऱ्यांचा विठू तसा मडगावकर आणि त्याच्या अन्य भाविकांसाठी तो फक्त दामबाब. जणू घरचीच एक वडीलधारी व्यक्ती त्यामुळे त्याचे भक्त लहान-सहान कामासाठी आपल्या या दामबाबाला साकडे घालतात आणि त्याच्या कौलाशिवाय त्यांचे पानही हालत नाही.
या देव दामोदराबद्दल असंख्य आख्यायिका आहेत. त्याचे मूळ स्थान धरून सगळ्याच बाबतीत. मुळातच हा दामबाब खरेच देव हाेता की तो एक माणूस होता आणि नंतर त्याला दैवत्व प्राप्त झाले, याबद्दलही कित्येक प्रवाद आहेत. त्यामुळे दामबाबासंदर्भांतील आख्यायिका हा नेहमीच भक्तीचा विषय तर झालाच आहे. मात्र त्याहीपेक्षा त्याच्याबद्दल कुतूहलही तेवढेच अाहे.
‘मडगाव: गोव्याची सांस्कृतिक मर्मभूमी’ या लेखात श्री दामोदराचे मंदिर फाताेर्डा येथील म्हाड्ड या परिसरात असल्याचे सांगितले जाते. आज तिथे दामबाबाचे लिंग देवस्थान उभे आहे. रुई गोमीश परेरा यांच्या ‘हिस्ट्री ऑफ गोवा’ या पुस्तकात असलेल्या उल्लेखाप्रमाणे, मडगावचे मंदिर मखजी दामोदर याला अर्पित केले होते.
गोमीश परेरा यांच्या पुस्तकातील या उल्लेखाप्रमाणे हा मखजी दामाेदर म्हणजे, मडगावातील देसायाचा पुत्र हाेता. केळशीच्या गावकर्याच्या मुलीशी लग्न करुन परत येत असताना चिंबलच्या एका ब्राह्मणाने पाठविलेल्या मारेकऱ्याकडून मडगावच्या वेशीवर त्याची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मखजीच्या नावे मंदिर उभारण्यात आले. नंतर त्याला ग्रामदेवाचे स्थान प्राप्त झाले.
या निवेदनाला जाेडून आणखी एक आख्यायिका आहे ती अशी, आज जरी दामबाब हे सारस्वताचे दैवत्व असले तरी कुंकळ्ळी येथील ‘लोकाकाली’ या वांगडाचे देसाई, दामबाबाचा संबंध आपल्या मूळ पुरुषाशी असल्याचा दावा करतात. स्वातंत्र्य सैनिक स्व. शाबू देसाई यांचे घरचे लोक अजुनही दामबाब आपला मूळ पुरुष असून भिंवसा-कुंकळ्ळी येथे या मूळ पुरुषाचे स्थान असल्याचे अभिमानाने सांगतात.
ही आख्यायिका अशी की, मडगावच्या या देवळाचा कारभार पूर्वी हेमण नाईक हे देसाई चालवायचे. त्यांनी पालखीचे ‘रोंत’ (लाकडी काठी) हाती घेतल्यावर दामोदर पालखी बाहेर सरायची. मात्र एके दिवशी एका सारस्वताने हेमण नाईक याला एका म्हाल्याकडे गुंतवून ठेवले आणि पालखीचे ‘रोंत’ आपल्या हाती घेतले आणि तेव्हापासून हेमणचा देवस्थानवरील अधिकार संपला.
हा हेमण लोकाकाली वांगडाचा असे सांगितले जाते. नंतर या वांगडाचे देसाई कुंकळ्ळीला स्थायिक झाले. मात्र कुंकळ्ळीतील या लोकाकाली वांगडाच्या लोकांनी अजूनही मडगावात रात्र काढायची नाही, असा संकेत असून कुंकळ्ळीचे हे देसाई अजूनही तो पाळतात.
रुई गोमीश परेरा यांच्या ‘हिस्ट्री ऑफ गोवा’ या पुस्तकातील ‘द ओल्ड काँक्वेस्ट : सालसेत’ या प्रकरणात जो उल्लेख आहे त्यानुसार मडगावात पोर्तुगीजांनी असंख्य मंदिरे पाडली त्यात दामोदरच्या मंदिराचाही समावेश होता. मडगावच्या दामोदराची आणखी एक आख्यायिका आहे ती अशी, की धार्मिक छळाला कंटाळून सर्व हिंदूंनी मडगावातून परागंदा व्हायचे ठरविले. त्यामुळे देवही त्यांनी हलविले.
मडगावातील दामाेदराचे लिंग कापून ते जांबावलीला हलवले. याबद्दल आणखी एक आख्यायिका आहे, ती अशी, हे लिंग चार तुकडे करून कापण्यात आले. तेव्हा म्हणे देवाने एका महाजनाच्या स्वप्नात येऊन साक्षात्कार दिला, की हे चार तुकडे सात दिवस अन् सात रात्री एका बंद खाेलीत ठेव. महाजनाला कुतूहल हाेते. त्यामुळे सातवी रात्र उलटण्यापूर्वीच त्याने खोलीचे दार उघडले त्यामुळे या लिंगाचे तुकडे जोडले गेले तरी त्या लिंगाला एक लहानशी चीर उरलीच. आज जांबावलीत जे लिंग आहे त्या लिंगालाही चीर असून या चीरेत गंध भरले जाते.
ज्या म्हाड्ड गावातून हे लिंग कापून नेले, असे सांगण्यात येते ती जागा म्हणजे आजचे फाताेर्डा स्टेडियमजवळ दामाेदर लिंग मंदिर असलेली जागा. या भागातील वयस्कर मंडळी सांगतात त्याप्रमाणे, पूर्वी या जागी कुठलीही खूण नव्हती.
मात्र एक दिवस गुरे चरायला घेऊन जाणाऱ्या गवळ्याला या जागी एक लिंग प्रकट झालेले दिसले. त्याने ही गोष्ट लोकांना सांगितली. लोकही लिंग पहायला जमले. तेथे गुरे जाऊ नयेत यासाठी कुंपण घालण्यात आले. नंतर त्या जागी देऊळही उभे झाले. असे म्हणतात, या लिंगाची उंची सतत वाढत असते. गवळ्यांनी कदाचित या लिंगाचा शोध लावल्यामुळे असेल फाताेर्डातील या गवळ्यांना दिवाळीवेळी जांबावलीत पालखी वाहून नेण्याचा मान आहे. जांबावली गुलालाच्या आदल्या दिवशी फाताेर्डातील गवळी आजही जांबावलीला जाऊन मेळ खेळतात.
पाेर्तुगीजांच्या धर्म छळाला कंटाळून लोकांनी मडगाव साेडल्यामुळे याचा विपरित परिणाम येथील अर्थव्यवस्थेवर झाला. लोकच नसल्यामुळे व्यापार उदिम थांबला. शेतीही थंडावली. सरकारचा कर घटला. त्यामुळे गाव सोडून गेेलेल्यांना पुन्हा मानाने मडगावात बाेलावण्यात आले.
या लोकांनी पुन्हा शहर उभे केले पण त्यांचा देव असलेला दामबाब जांबावलीत पोचला होता. मडगावात पुन्हा दामबाबाचे मंदिर बांधण्यासाठी ग्रामस्थांनी जांबावलीला जाऊन कौल घेतला असता, आता मडगावात आपली सासाय राहिलेली नाही असा कौल देवाने दिल्याने मडगावात पुन्हा दामोदराचे मंदिर उभे झाले नाही.
पूर्वी गावातील निर्णय घेण्यासाठी ज्या दहाजणांच्या बैठका व्हायच्या त्या देव मंदिरात व्हायच्या. पण मडगावात देवमंदिरच नसल्याने या बैठका घ्यायच्या कुठे हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी पांडुरंग नायक पुढे आले. त्यांनी आपल्या घराच्या दालनात बैठकांना परवानगी दिली. हीच जागा पुढे दामबाबाचे साल म्हणून सर्वतोमुखी झाली. १८८४ मध्ये मडगावात प्लेगची साथ आली होती. यातून फक्त दामबाबाच बाहेर काढणार, अशी श्रद्धा असल्याने मडगाव ग्रामस्थ जांबावलीला जाऊन राखणेच्या प्रसादाचे श्रीफळ घेऊन मडगावात आले.
या दामबाबाच्या सालात एका चांदीच्या कलशात घालून हे श्रीफळ ठेवण्यात आले. नंतर या कलशावर देवाचे मुखही चढविण्यात आले.मडगावात प्लेग पसरला. तेव्हा लोक घरे बंद करून दुसरीकडे जायचे. अशावेळी या बंद घराची राखण दामबाबच करतो, असा लोकांत विश्वास होता.
रात्री श्री दामाेदर आपल्या घोड्यावर बसून मडगावात फेरी मारतो, असा विश्वास असल्याने पूर्वी ज्या मुख्य रस्त्याने दामोदराची पालखी फिरत असे तिथे पाच किंवा सात वातीची समई पेटविण्याची प्रथा रुढ झाली. आजही मडगावात जुनी घरे आहेत तिथे दर साेमवारी समई पेटविण्याची प्रथा आहे.
वास्कोशीही श्री दामोदराचा संबंध आला तो प्लेगमुळेच. १९ व्या शतकाच्या अखेरीस वास्कोतही प्लेगची साथ आली होती. त्यामुळे वास्कोतीलही ही साथ निवळायची असेल तर दामबाबाचा काैल घ्यावा असा निर्णय घेण्यात आला.
वास्कोतील प्रतिष्ठीत सुब्राय जोशी अाणि दामूशेट लोटलीकर यांनी या शहरातील प्रतिनिधींना घेऊन जांबावली गाठले. तिथे देवाला प्लेग निवारण्याचे गाऱ्हाणे घातले. त्यावेळी देवाचा राखणेचा कौल घेऊन ही सर्व मंडळी वास्कोला आली. हा कौल जोशी यांच्या घरात स्थापन करण्यात आला. वास्कोतीलही प्लेगची साथ संपली. दामबाबाच्याच कृपेने हे अरिष्ट निवारले गेले असा समज झाल्याने त्याचे उपकार फेडण्यासाठी या शहरात २४ तासांचा भजनी सप्ताह सुरू झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.