Damodar Saptah: जय जय रामकृष्ण हरी! दामोदर भजनी सप्ताह; 24 तास साखळी पद्धतीने भजनाची परंपरा
वास्को: श्री दामोदर भजनी सप्ताहाला बुधवारपासून प्रारंभ होत असल्याने येथे उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सप्ताहाची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी उत्सव समिती तसेच प्रशासन जातीने लक्ष देत आहे. सात दिवसांच्या फेरीसाठी विविध विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून आजपासून विक्रीलाही प्रारंभ झाला आहे.
मंगळवारी सकाळी जोशी कुटुंबातर्फे महारूद्र अनुष्ठान व इतर धार्मिक कार्य करण्यात येणार आहे. मंदिरात चालणाऱ्या धार्मिक कार्याचा लाभ भाविकांना घेता यावा यासाठी मंदिराच्या बाहेर सीसीटीव्हीची सोय केली आहे. बुधवारी दुपारी देव दामोदर समोर श्रीफळ ठेवल्यावर चोवीस तासांच्या भजनी सप्ताहाला आरंभ होणार आहे. चोवीस तास साखळी पद्धतीने भजन करण्यात येणार आहे.
यात वास्कोतील विविध भजने पथके सहभागी होतील. गुरुवारी खारीवाडा येथे समुद्रात श्रीफळ विसर्जित करून आल्यानंतर मंदिरात गोपाळकाल्याने या भजनी सप्ताहाची समाप्ती होईल. कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी येथील पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी मुरगाव, वेर्णा पोलिस स्थानकावरील पोलिस तसेच राखीव दलाच्या पोलिसांना बंदोबस्तासाठी बोलाविण्यात आले आहे.
सप्ताहानिमित्त फेरीत थाटण्यात आलेली दुकाने पंधरा दिवसापर्यंत ठेवण्यात येणार आहेत. भजनी सप्ताहाच्या काळात स्वातंत्र्य पथ व फादर वाझ मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असतील. या मार्गावरील वाहतूक एफ. एल गोम्स मार्गाने वळविण्यात आली आहे. अवजड वाहनांना सोमवारपासून चोवीस तास शहर भागात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वाहने पार्क करण्याची सोय करण्यात आली आहे.
विश्वजीत बोरवणकर यांची आज मैफल
सप्ताहाच्या पूर्व संध्येला श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव समितीतर्फे उद्योजक श्रीपाद शेट्ये व संजय शेट्ये यांच्या सौजन्याने प्रसिद्ध गायक विश्वजीत बोरवणकर यांची खास मैफल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला दामोदर मंदिरासमोर होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी ७ वा. मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या मंडपात बोरवणकर यांचा संगीत मैफलीचा कार्यक्रम होणार आहे. तबल्यावर संकेत खलप, पखवाजवर किशोर तेली, हार्मोनियमवर दत्तराज म्हाळशी, टाळ आदित्य गांवकर, की-बोर्ड विष्णू शिरोडकर तर हॅण्डसोनिक अवधूत च्यारी साथसंगत करतील. निवेदनाची जबाबदारी अनुश्री फडणीस देशपांडे सांभाळतील.
प्रशासनाची जय्यत तयारी
दुकाने थाटण्यासाठी सुमारे १०५२ अर्ज मुरगाव पालिका कार्यालयात विक्रेत्यांनी अर्ज दाखल करून परवाने नेले आहे. इतर आज व उद्यापर्यंत आपले परवाने नेतील.
पाणी पुरवठा विभागातर्फे पिण्याची पाण्याची सोय करण्यात येणार आहे.
कचरा उचलण्यासाठी यंदा लहान पिकअपचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्वरित कचरा उचल होण्यास मदत होणार आहे.
सप्ताहासाठी येणाऱ्या लोकांसाठी फिरते शौचालयांची सोय करण्यात आली आहे.
पोलिसांसह कमांडो तैनात
पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी योग्य ती उपाययोजना केली आहे. स्वातंत्र्यपथ व फादर वाझ मार्गावर नऊ वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. तसेच सुमारे ५०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. काही महत्त्वाच्या ठिकाण कमांडो तैनात करण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.