Goa Congress: कॉंग्रेस नेते विजय भिके हे मायकल लोबो भाजपवासी झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. भाजप प्रवेशावेळी त्यांनी लोबोंवर बरेच तोंडसुख घेतले होते. आताही त्यांना लोबो यांच्यावर आगपाखड करण्यासाठी नवा विषय सापडला आहे. गेले काही दिवस कळंगुट किनारी भागात सुरू असलेल्या डान्स बारचा विषय घेऊन लोबो यांनी त्यावर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
विशेष म्हणजे स्थानिक राजकारणात विळ्या-भोपळ्याचे सख्य असलेले कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा हेही लोबो यांच्या मुद्याशी सहमत होऊन त्यांच्यासोबत राहिले होते. पण मुद्दा तो नाही. डान्स बारकडून कमिशन मिळत नसावे किंवा कमी मिळत असावे, असा आरोप करत भिके यांनी लोबो यांच्यावर शरसंधान साधलेच. खरे तर डान्स बार सुरू राहिले असते, तरीही भिके यांनी टीका केलीच असती. म्हणजे, काहीही करा, लोबोंवर टीकाही होतच राहणार, असे दिसते.
ताम्हणकर काय करणार?
बसमालक संघटनेचे सुदीप ताम्हणकर हे सध्या बसमालकांपेक्षा टॅक्सीवाल्यांच्याच प्रश्नावर अधिक आक्रमक झालेले दिसतात. मात्र, टॅक्सीवाल्यांकडून वास्कोत जी आगळीक वा मुजोरी घडली, त्याबद्दल त्यांनी भाष्य केलेले वा दिलगिरी व्यक्त केलेली दिसून आलेली नाही.
गुरुवारी मुरगाव बंदरात या टॅक्सीवाल्यांनी अमेरिकन पर्यटकांप्रती जे वर्तन केले, त्याचा सर्व थरांतून निषेध होत आहे; पण ताम्हणकर वा पर्यटन उद्योगाबाबत सदैव पत्रकारांसमोर गळा काढणारे आता गप्प का, अशी विचारणा होऊ लागली आहे.
साहेब नव्या इनिंगसाठी सज्ज!
लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वयाचे बंधन लागत नाही. जर काम करण्याची इच्छा असेल तर उतार वयातही आपण लक्ष्य साध्य करू शकतो. कुंकळ्ळीचे सुपुत्र तथा सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस हे तसे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. ते जरी आज उतारवयात पोहचले आहे तरी त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. खरे तर टोनीसाहेबांची आमदार व्हायची इच्छा होती.
मात्र, सरकारी सेवेत असल्याने ती पूर्ण होऊ शकली नाही. आता म्हणे टोनीसाहेब नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. टोनीसाहेब स्थानिक सोसिएदाद या गावकरी संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत. आव्हान तसे तगडेच आहे; परंतु आता पाहूया साहेबांचा चाहता वर्ग किती उपयोगी ठरतो ते!
रेड्या-पाड्याची झुंज
कोकणीत एक म्हण आहे की, ‘रेड्या-पाड्याची झुंज आनी आड्याचेर काळ.’ याचा अर्थ असा की, दोघा मोठ्यांच्या भांडणात कुणीतरी बारीक माणूस अडकणे. सध्या याचा प्रत्यय एमपीटीच्या आगारात अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरना आला असेल. लोकांनी प्रदूषण होते म्हणून बॉक्साईट आणि कोळसावाहू ट्रक अडविले.
त्यामुळे वाहतूक बंद झाली; पण त्यापूर्वी आगारात जे ट्रक अडकले, त्यावरील चालकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्यांना धड जेवण नाही आणि आंघोळ करण्याचीही सोय नाही. या नसत्या भानगडीत आम्ही कसे अडकलो, या विवंचनेत ते पडले आहेत. कुणीतरी येऊन आमची सुटका करावी, अशी विनंती सध्या ते करत आहेत. कुणी आहे का त्यांना मदत करणारा?
प्रोव्हिजनल दाखल्याचा असाही वापर
फोंडा तालुक्यात सध्या व्यवसायासाठी कोण कुठल्या थरावर जातो, हे कळायला मार्ग नाही. काही दिवसांपूर्वी बोरी - बायथाखोल भागात केवळ चार खांब उभारलेल्या वास्तूला चक्क पंचायतीने घरक्रमांक दिल्याचे प्रकरण उघडकीस आले असतानाच राज्यात पंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या प्रायोगिक तत्त्वावरील अर्थातच प्रोव्हिजनल दाखल्याचा गैरवापर होत असल्याचेही समोर आले आहे.
कुर्टी - खांडेपार पंचायतीने तर सरकारी जमिनीत व्यवसाय करण्यास काहीजणांना हा प्रोव्हिजनल दाखलाही दिला आहे; पण इतर खात्यांचे दाखले नकोत का...! कायद्याचा दुरुपयोग होतो तो हा असा.
बिचाऱ्या साहेबांना फटका!
किनारपट्टी भागात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या संगीत रजनींबाबत उच्च न्यायालयाने जे निर्बंध घातले, त्यातून गेल्या आठवडाभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. आता सरकारने नवा आदेश जारी करून संगीत वाजवण्याच्या मुदतीत वाढ केलेली असली तरी त्याचा फटका बिचारे विज्ञान-पर्यावरण खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांना बसल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
गुरुवारी सकाळी जो आदेश जारी केला, त्यात वेळेची गफलत झाली व ती लक्षात येताच नवा आदेश काढून दुरुस्ती केली गेली. त्यानंतर रेडकर यांना त्या पदावरून तडकाफडकी हटवले गेले. त्यामुळेच या चर्चेला उधाण आले आहे.
कोण हा पानवेलकर आमदार?
विधानसभेकडून आमदारांसाठी दिले जाणारे स्टिकर्स सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ज्यांचा विधानसभेशी काडीमात्र संबंध नाही वा ते आमदारही नाहीत, असे काही लोक आपल्या आलिशान चारचाकी गाड्यांवर हे आमदारांसाठीचे स्टिकर्स लावून फिरताना दिसत आहेत.
याबाबत आज सभापतींनी आक्रमक भूमिका घेत विधानसभा सचिवांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना आणखी एका गाडीवर असे स्टिकर आढळून आले आहे. या कारचा क्रमांक जीए-07-एन-0606 असा असून ही कार विष्णू नाईक पानवेलकर यांच्या नावावर वाहतूक खात्याकडे नोंद आहे.
हा विष्णू एका मंत्र्यांच्या जवळचा असल्याची माहिती आहे. मात्र, तो आमदार कधी झाला, असा प्रश्न विचारत ‘आरजी’च्या मनोज परब यांनी ‘ट्विट’ केले आहे. सध्या तरी विधानसभेत असा कोणी पानवेलकर नावाचा आमदार नाही. मग हा 41 वा आमदार कुठून अवतरला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
किती काढणार खनिज?
राज्यातील खनिज खाणी पुन्हा सुरू होत आहेत, ही चांगली बाब असली तरी पर्यावरणाचे रक्षण करण्याची हमी कोण देणार, असा पर्यावरणप्रेमींचा रोकडा सवाल आहे. सरकार म्हणते, अमूक टन खनिज माल उत्खननासाठी परवानगी देण्यात येणार आहे.
पण ही परवानगी दिली तरी प्रत्यक्षात किती टन खनिज माल काढला, त्याची वाहतूक करताना नियमांचे पालन योग्यरीतीने होते की नाही, हे पाहणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण पोलिसांवर तर लोकांचा विश्वासच नाही. आता हेच पहा. रेतीचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात चालला आहे. पण सुरक्षा यंत्रणा साफ काणाडोळा करते.
केवळ न्यायालयाने फटकारल्यानंतर कारवाईच्या नावाखाली एक-दोन ठिकाणी छापे टाकले जातात. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’. पण खाण उद्योगाच्या बाबतीत तर करोडो रुपयांचा मामला आहे. त्यामुळे येथे ‘सेटिंग'' होणार नाही, कशावरून, असा प्रश्न आम्ही नव्हे, लोकच विचारत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.