पणजी: कला अकादमीच्या प्रवर कला राखण मांडने पुन्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. २ जुलै रोजीच्या पत्रात उपस्थित केलेल्या मुद्यांवर काही उपाय काढण्यात आला नसून कला अकादमीची स्थिती आणखी गंभीर बनल्याचे मांडच्या सरचिटणीस सेसिल रॉड्रिग्ज यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की राज्यातील कलाकारांच्यावतीने हे पत्र लिहीण्यात आले आहे. कला अकादमी संकुल पूर्ववत करण्याबाबत काही मुद्दे यापूर्वी उपस्थित करण्यात आले होते. ते सोडवण्याचे आश्वासन देऊनही परिस्थिती जैसे थे राहण्याऐवजी आणखीन बिघडली आहे. विधानसभेत या प्रश्नी सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.
मात्र, प्रत्यक्षात त्याची पूर्ती करण्यात आलेली नाही. कला अकादमी निकृष्ट बांधकाम, सदोष ध्वनीशास्त्र, अयोग्य पद्धतीने आवाज कमी करणे, निकृष्ट प्रकाश उपकरणे अशा समस्यांनी घेरली गेली आहे. हे प्रश्न सोडवणे अपेक्षित असताना त्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते. मोठा निधी खर्चूनही हे प्रश्न न सोडवले जाणे हे सरकारचे तीव्र अपयश आहे,असेही सेसिल यांनी पत्रात म्हटले आहे.
ध्वनी व प्रकाश योजनेच्या उपकरणांवर २ कोटी रुपये आणखीन खर्च केले जाऊ नयेत. यासाठी नवा सल्लागार नेमला जाऊ नये. कला अकादमीत निकृष्ट, डुप्लीकेट उपकरणे बसवण्यास उपकंत्राटदार जबाबदार आहे,असे नमूद करून सेसिल रॉड्रिग्ज यांनी पत्रात म्हटले आहे, की विधानसभेत आश्वासन दिल्याप्रमाणे मांडच्या सदस्यांसह कलाकार आणि चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशनचे सदस्य यांचा समावेश असलेली समिती कला अकादमीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केली जावी. याप्रश्नी चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.