पणजी: दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या गैरव्यवस्थेबद्दल आवाज उठवणाऱ्या कलाकारांना कला अकादमी देत असलेल्या सुडाच्या वागणुकीबद्दल ‘गोवा कलाराखण मांड’ने पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. असे प्रकार भविष्यात सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी कला अकादमीला दिला.
एप्रिल महिन्यात ‘गाव जाला जाण्टो’ या नाट्यप्रयोगादरम्यान नाट्यकलाकार राजदीप नाईक यांनी नूतनीकरण झालेल्या कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहातील तांत्रिक ढिसाळपणाबाबत नाट्यगृहातच प्रेक्षकांच्या समोर आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांनी ३० एप्रिल रोजी या साऱ्या तांत्रिक गैरव्यवस्थेसंबंधी कला अकादमीला पत्राद्वारे आपले निवेदनही सादर केले होते.
त्यानंतरही राजदीप नाईक यांनी पुढील काळात या नाटकाचा आणखी एक प्रयोगही या नाट्यगृहात सादर केला. मात्र, त्याच नाट्यगृहात १६ ऑगस्ट रोजी सादर होणाऱ्या तिसऱ्या नाट्यप्रयोगाला चुकीच्या पद्धतीने अडथळा आणण्याचा व प्रयोग रद्द करण्याचा डाव रचला, असा आरोप गोवा कला राखण मांडने या पत्रकार परिषदेत केला. राजदीप नाईक यांनी कला अकादमीबरोबर झालेले यासंबंधीचे सारे पत्रव्यवहार गोवा कला राखण मांडला सादर केले होते.
पत्रकार परिषदेत हे सारे पत्रव्यवहार पत्रकारांना सादर करून कशाप्रकारे कला अकादमी, तिच्यातील गैरव्यवस्था लोकांपुढे मांडणाऱ्या कलाकारांचा छळ करण्यास पुढे सरसावली आहे याचे दाखले दिले. ‘गाव जाला जाण्टो’ या आपल्या नाटकाच्या तिसऱ्या प्रयोगासाठी राजदीप नाईक यांनी २ ऑगस्ट रोजी कला अकादमीला आपला अर्ज दिला होता.
१६ ऑगस्ट रोजी त्यांना हा प्रयोग दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सादर करायचा होता. मात्र, या नाट्यप्रयोगाला वेगवेगळ्या प्रकारे अडथळा आणत कला अकादमीने हा नाट्यप्रयोग सादर करण्यास शेवटच्या क्षणी परवानगी दिली. हा सारा प्रकार पाहता कला अकादमीने राजदीप नाईक यांच्याविरुद्ध आकसाने केलेली ही कारस्थानी कारवाई होती, असेच गोवा कला राखण मांडचे म्हणणे होते.
‘गोवा कलाराखण मांड’चे सिसील रॉड्रिग्स, संदेश प्रभुदेसाई, कुलदीप कामत, फ्रान्सिस कुएल्हो आणि ज्ञानेश मोघे यांनी या पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित केले.
कला अकादमीची ध्वनियंत्रणा दोषपूर्ण असूनदेखील आपल्या नाट्यप्रयोगासाठी राजदीप नाईक यांना स्वतःची ध्वनियंत्रणा आणण्यासाठी कला अकादमीने प्रतिबंधित केले होते. कला अकादमीची ध्वनियंत्रणा सोडून बाहेरची यंत्रणा वापरण्यास मनाई आहे, असा नवीन नियम कला अकादमीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्यादिवशी सांगितला. मात्र, दोन दिवसांपूर्वीच दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या एका कार्यक्रमासाठी निर्मात्यांना त्यांची स्वतःची ध्वनियंत्रणा वापरण्याची सवलत कला अकादमीने दिली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.