Colvale Police Arrests Burgalar: गोव्यातील बार्देश तालुक्यातील रेवोरा येथे झालेल्या घरफोडीचा पोलिसांनी चोवीस तासांत छडा लावला आहे. कोलवाळ पोलिसांनी ही कामगिरी केली. पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
त्याच्याकडून 10 लाख रूपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. सुधीर रमेश सिंग (वय 23) असे त्याचे नाव आहे.
म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी विनोद विठ्ठल लोकरे यांनी तक्रार दाखल केली होती.
ते सालचेभाट रेवोरा येथील रहिवासी आहेत. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 ते 11.00 वाजण्याच्या दरम्यान काही अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि त्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
एकूण 196 ग्रॅम वजनाचे हे दागिने होते. त्याची एकूण किंमत 10 लाख रूपये इतकी होती. याशिवाय 1500 रूपयांची रोकडही चोरट्यांनी पळवून नेली होती.
या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गावातून बाहेर पडण्याचे सर्व मार्गांवर नाकाबंदी केली आणि रेवोरा गावातील सर्व स्थलांतरीतांची तपासणी केली. त्यानंतर सुधीर रमेश सिंग याला पोलिसांनी अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
त्याच्याकडून चोरीचे सर्व 196 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 10 लाख रूपये किंमतीचे दागिने वसूल करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगड्या, हार, चेन, मंगळसूत्र, अंगठ्या, कानातल्या दागिन्यांच्या पाच जोड्या याचा समावेश आहे.
तक्रारीनंतर अवघ्या 24 तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतूक होत आहे. पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन, म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली कोलवाळ पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक सोनम वेर्णेकर या पुढील तपास करत आहेत.
पोलिस निरीक्षक विजय राणे, पोलिस उपनिरीक्षक रोहन मडगावकर, पोलिस उपनिरीक्षक सोनम वेर्णेकर, हेड कॉन्स्टेबल रामा नाईक, रुपेश कोरगावकर, पांडुरंग नाईक, पोलिस कॉन्स्टेबल सुलेश नाईक, रामेश्वर गावस, निखिल नाईक, रोहित शेटगावकर यांचा या तपास पथकात समावेश होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.