Goa Politics: खरी कुजबुज, तुरुंगात ‘जॅमर’ चा प्रस्ताव अन् मलई

Khari Kujbuj Political Satire: गोवा फलोत्पादन विकास महामंडळ शेतकऱ्यांकडून २६ प्रकारच्या भाज्या घेते. २० दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही जमा करते.
Goa Latest Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

तुरुंगात ‘जॅमर’ चा प्रस्ताव अन् मलई

कोलवाळ कारागृहातील एकाच खोलीत असलेल्या एका कैद्यावर दुसऱ्या एका कैद्याने हल्ला करण्याचा प्रकार घडला. या कारागृहात अशा प्रकारचे हल्ले नेहमी होतच असतात. मात्र तुरुंग अधिकाऱ्यांकडून ही प्रकरणे पोलिसात तक्रारी दाखल न करताच दडपण्याचे प्रकार सुरू आहे. मोबाईल्स किंवा ड्रग्ज सापडले तरी त्याची वाच्यता कोठेच केली जात नाही. उलट ही माहिती लपवण्यात येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याला दुजोरा दिला जात नाही. घडलेल्या घटनांबाबतही माहिती देण्याबाबत अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याचे सांगून टोलवाटोलवी केली जाते. त्यामुळे कारागृहात घडणाऱ्या या घडणाऱ्या घटनांना अधिकाऱ्यांचाच आशिर्वाद आहे की काय अशा संशय येऊ लागला आहे. कारागृहात मोबाईल्स तस्करी होण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत. तपासणीसाठी सुरक्षाचे तीन कवच पार करावे लागते तरी या तस्करीचा शोध लागलेला नाही. ‘जॅमर’ बसवण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, त्याबाबत कोणालाही स्वारस्य नाही. हा ‘जॅमर’ बसवल्यास या कारागृहात असणाऱ्या काही अधिकाऱ्यांपासून ते सुरक्षारक्षकांची मलई बंद होण्याची भीती आहे. ∙∙∙

मग बाजारात भाज्या कशा?

गोवा फलोत्पादन विकास महामंडळ शेतकऱ्यांकडून २६ प्रकारच्या भाज्या घेते. २० दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही जमा करते. महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांनीच ही माहिती दिली आहे. सरकारकडून खरेदी होत असल्यास आणि पैसेही वेळेवर मिळत असल्यास शेतकरी खुल्या बाजारात भाज्या का विकत असावेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्षभर एकाच दराने भाजी खरेदी केली जात असताना बाजारातील दरातील चढ उताराला शेतकरी सामोरे का जातात, या प्रश्नाच्या उत्तरातच सरकारी योजनेचे यशापशय दडल्याची चर्चा आहे. ∙∙∙

जॉन अब्राहम अन् पर्वरीत ‘नोमोझो’

पर्वरीत पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांच्या पुढाकाराने ‘नोमोझो’चा सहावा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाने गर्दी खेचली ती खास उपस्थित राहिलेल्या अभिनेता जॉन अब्राहममुळे. जॉन अब्राहमला पाहण्यासाठी लोक आले होते. विशेष म्हणजे जॉनला पाहिल्यानंतर काही स्वतःलाही पारखत असावेत. अब्राहमला पाहून काहींनी जीम जॉईनही केली असावी. परंतु एका अर्थी पणजीत ‘नोमोझो’चा पाया रचला असला तरी शहराबाहेर पर्वरीत तो सिलसिला कायम राहत आहे, ही नक्कीच चांगली बाब म्हणावी लागेल. ∙∙∙

‘स्वस्थ पोलिस- सशक्त पोलिस’

पोलिस खात्यातर्फे मंगळवारी ‘स्वस्थ पोलिस-सशक्त पोलिस’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमावेळी वैद्यकीय उपकरणे उत्तर गोवा पोलिस स्थानकांना देण्यात आली. या उपकरणांचा वापर याचे प्रशिक्षण उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आले. यावेळी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी रक्तदाब तसेच इतर चाचण्या या उपकरणांबाबत करून घेतल्या. नेहमी अशा उपक्रमांमधून किंवा कार्यक्रमामधून वरिष्ठ अधिकारीच अधिक फायदा घेत असतात. पोलिस स्थानकांना देण्यात येणारी उपकरणे नादुरुस्त झाल्यावर त्या बदलून मिळणार का, अशी शंका काही पोलिसांच्या मनात चुकचुकली. पोलिस खात्याची आल्तिनो येथे जीम आहे. ती पोलिसांसाठी असताना तेथे अधिक तर आयपीएस व आयएएस अधिकारी येतात. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांऐवजी त्याचा लाभ हे अधिकारीच घेतात. या अधिकाऱ्यांच्या सकाळी व संध्याकाळी ठराविक वेळा असतात. त्यावेळी इतर पोलिसांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे पोलिस खात्याच्या नावाखाली हे अधिकारीच फायदा घेतात, हे सर्वश्रुत आहे. ∙∙∙

तीन महिने तुझे, तीन महिने माझे!

पंचायत निवडणुकीनंतर गावात विकास होईल, असे लोकांना वाटते. मात्र, सध्या सरपंचपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी ‘अलिखित करारां’चा जोर वाढल्याने विकासाऐवजी राजकीय गणितेच जुळवली जात आहेत, अशी चर्चचा राज्यभर सुरू झाली आहे. गोव्यात सध्या ‘तीन महिन्यांचे सरपंच’ हा फॉर्म्युला ट्रेंडमध्ये आहे! पंचायत राज कायद्यात ज्या तरतुदी आहेत, त्यांचा गैरवापर करून, काही पंचांत ‘समजूतदार करार’ ठरत आहेत. एकाने सरपंचपद घेतल्यावर ठरलेल्या मुदतीनंतर तो राजीनामा देईल आणि दुसऱ्याचा नंबर लागेल, अशा ‘वाटाघाटी’ पंचायत पातळीवर होत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गावकऱ्यांना गटार, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारख्या प्राथमिक सोयी-सुविधांची अपेक्षा आहे. पण सरपंच आणि पंचांमध्ये विकासाच्या कामांपेक्षा खुर्चीच्या बदलांवरच अधिक चर्चा होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे यंत्रणेत स्थिरता नसेल, तर योजनांची अंमलबजावणी कशी होणार? हा प्रश्न सामान्य नागरिकांना सतावू लागला आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; तानावडेंची महाकुंभात डुबकी

देवस्थानातही आता ‘राजकारण’

राज्यातील देवस्थानांच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. काही ठिकाणी तरी इतक्या अटीतटीच्या झाल्या की, कोणाला वाटावे पालिका वा पंचायतीच्या निवडणुका आहेत. आता हा खटाटोप देवसेवेकरता का, स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता हे कळायला मार्ग नसला तरी बऱ्याच महाजनांत तशी चर्चा मात्र सुरू होती.‘देव भावाचा भुकेला’, असे म्हटले जाते. पण आता देवस्थानात शिरलेले राजकारण पाहून त्या ‘भावाचे’ रूपांतर परिस्थितीनुरूप आता राजकारणात तर झालं नाही ना, असे बऱ्याच भक्तांना वाटायला लागले आहे, एवढे मात्र खरे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; बापरे ! पाच वर्षात गोव्यात एकशे साठ खून !

गैरसोय नाही हो!

प्रयागराज येथे सरकारच्या मोफत रेल्वेच्या माध्यमातून गेलेल्यांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागले नाही, याची जणू स्पर्धा लागली आहे. तेथे जाणारी व्यक्ती ही आध्यात्मिक ओढीने गेलेली असल्याने तिला तो त्रास जाणवणे शक्य नाही, हे समजता येते. परंतु तेथे असलेल्या व्यवस्थेतील त्रुटींची चर्चा करायचीच नाही असे म्हणणे चुकीचे असल्याची चर्चा आहे. रेल्वेला पोचण्यास झालेला उशीर आणि करावी लागलेली पायपीट यापुरतीच चर्चा यापूर्वी मर्यादित होती. प्रत्यक्ष संगमस्थळावरील परिस्थिती बाबत बोलून कोणी भावना दुखावण्याचा प्रयत्नही केला नसताना गैरसोयी नव्हत्या, असे सांगण्यामागे कोणती तरी अदृश्य शक्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com