Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांना धीरयो कशा दिसत नाहीत?

Goa Political News: काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली, की ही ‘दोस्ती’ टिकते की त्याच्यावरचे कवच गळून पडते, हे तेव्हाच कळणार आहे.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

पोलिसांना धीरयो कशा दिसत नाहीत?

पूर्वीचे पाेलिस असे होते, की ज्‍यांना मनाची लाज नसली तरी जनाची लाज होती. त्‍यामुळे धीरयोसारखे प्रकार होत होते पण ते लपून छपून. आणि या संदर्भात कुठलीही बातमी आली तर धीरयोंच्‍या आयोजकांवर कारवाई करण्‍याचे किमान नाटक तरी व्‍हायचे. मात्र, आताचे पोलिस पाहिल्‍यास त्‍यांना ‘जनाचीही लाज नाही अन् मनाचीही’ असे म्‍हणावे लागेल. कारण गोव्‍यात कित्‍येक ठिकाणी दिवसा ढवळ्या चालू असलेल्‍या धीरयो. कोलवा पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत या धीरयो रोज चालू असतात. पण जोपर्यंत कुणाला गंभीर इजा हाेत नाही, तोवर कुणावरही गुन्‍हा नोंद केला जात नाही आणि प्रसार माध्‍यमांनी या संबंधीच्‍या बातम्‍या प्रसिद्ध केल्‍या तरी असे प्रकार झालेच नाहीत, असे ठेवणीतले उत्तर त्‍यांच्‍याकडून मिळते. या धीरयोंपासून पोलिसांना असे काय मिळते, ज्‍यामुळे त्‍यांचे डाेळे आणि तोंड नेहमीच बंद असते? ∙∙∙

पिक्चर अभी बाकी है!

फोंड्यात डॉ. केतन भाटीकर यांचा काँग्रेस प्रवेश मोठा दणक्यात झाला. यावेळी केलेल्या भाषणात भाटीकरांनी आपण आणि फोंड्याचे काँग्रेस नेते राजेश वेरेकर हे बालपणापासूनचे मित्र असल्याचे सांगून त्यांची स्तुतीही केली. तत्पूर्वी झालेल्या भाषणात राजेश वेरेकरांनीही या ‘दोस्ती’चा उल्लेख केला होता. आता हे एकमेकांवरचे प्रेम पाहून भाटीकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ नये म्हणून राजेश वेरेकरांच्या कार्यकर्त्यांनी केलेले ‘प्रयत्न’ हे नाटक होते की काय, अशी चर्चा उपस्थितांत सुरू झाली. मात्र या नाटकाचा ‘खरा क्लायमॅक्स’ पुढे येणार आहे. काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली, की ही ‘दोस्ती’ टिकते की त्याच्यावरचे कवच गळून पडते, हे तेव्हाच कळणार आहे. हे आम्ही नाही बोलत उपस्थित कार्यकर्तेच असे बोलताना दिसत होते. म्हणजे ‘पिक्चर अभी बाकी है’ हेच खरे. नाही का...? ∙∙∙

...म्‍हणून भाटीकरांना प्रवेश

फोंड्यातील पोटनिवडणुकीबाबत मगो पक्षाने घेतलेल्‍या भूमिकेला विरोध करीत पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्‍या केतन भाटीकर यांनी अखेर मंगळवारी काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला. प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आदींच्‍या उपस्‍थितीत भाटीकर काँग्रेसवासी झाले. त्‍यामुळे फोंड्यात काँग्रेसची उमेदवारी मिळण्‍याची शक्‍यता असलेल्‍या राजेश वेरेकर यांच्‍या गोटात नाराजी पसरली आहे. वेरेकर यांना उमेदवारी देऊनही ते पराभूतच होतात. त्‍यामुळेच यावेळी काँग्रेसने भाटीकरांना उमेदवारी देऊन फोंड्यात विजय मिळवण्‍याच्‍या हालचाली सुरू केल्‍याच्‍या चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहेत. ∙∙∙

...मग गब्बर कुणीकडे?

हातात हात घालून फोटो सेशन केले म्हणजे एकी होत नाही. एकी मनातून व्हायला हवी. कार्निव्हल ला फातोर्ड्यात विजय आणि मनोज परब यांनी हातात हात घालून फोटो काढला आणि शिगमा सुरू होण्यापूर्वी दोघे शत्रू बनले. युरी आलेमाव यांच्या वाढदिनी सर्व विरोधकांनी हातात हात घालून ‘ग्रँड ऑपोजिशन एलायन्स’ ची घोषणा केली होती. ती झेडपी निवडणुकीत विरली होती. आता डॉ. केतन भाटीकर व राजेश वेरेकर यांची काँग्रेस पक्षातील ‘जय-वीरु’ची जोडी भाजपच्या गब्बरला मारणार, असा दावा युरी यांनी भाटीकरांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशावेळी बोलताना केला.युरीबाब पोट निवडणूक जाहीर होईपर्यंत थोडी कळ काढा. तिकीट जाहीर झाल्यानंतर ही जोडी तुटली नाही, म्हणजे मिळविली. अन्यथा काँग्रेसला भाजपच्या ‘गब्बर’ साठी ठाकूर साहेब बघावा लागणार! ∙∙∙

फोंड्यात अवतरले जय-विरू!

फोंड्यातील केतन भाटीकर यांच्या काँग्रेस प्रवेशावेळी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केतन भाटीकर आणि राजेश वेरेकर यांना जय आणि वीरुची उपमा दिली. ‘शोले’मधील जय आणि विरुची जोडी बरीच गाजली होती, त्याची आठवण करून देताना आता फोंडा काबीज करण्यासाठी केतन आणि राजेश यांच्या रुपाने पुन्हा एकदा फोंड्यात ‘शोले’ची पुनरावृत्ती होणार असून गब्बरला मारण्यासाठी जय आणि विरू एकजुटीने काम करतील, अशी ग्वाही युरीबाबने दिली. सध्या फोंड्यात चार चार ‘गब्बर’ असल्याची माहितीही युरीने दिली. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: मनोज-विजय यांच्यात आरोप - प्रत्यारोप! आंदोलनादरम्यान नेमके काय घडले? Watch Video

‘त्‍या’ विधेयकावर चर्चा होणार?

राज्‍यातील शेतजमिनींचे रक्षण करण्‍याच्‍या हेतूने माजी न्‍यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी विधेयक तयार करून ते विरोधी आमदारांना सादर केलेले आहे. हे विधेयक येत्‍या ६ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात सादर केले असल्‍याचे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी स्‍पष्‍ट केले. त्‍यातच विरोधी आमदारांनी जरी हे विधेयक मांडले, तरी सरकार त्‍यावर चर्चा करणार नसल्‍याचा दावा करीत, आरजीपीचे अध्‍यक्ष मनोज परब यांनी आपल्‍या ‘पोगो’ विधेयकाचाही दाखला दिला. त्‍यामुळे मनोजचा दावा खरा ठरणार? की रिबेलोंमुळे सरकार त्‍यांच्‍या विधेयकावर चर्चा करणार? याकडे जनतेचे लक्ष आहे. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: 'वीरेश बोरकरना पोलिसांनी का हटवले'? CM सावंतांनी दिले उत्तर; लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याबाबत केले आवाहन

युरी आलेमाव यांची लोकशक्ती

पणजीतील आझाद मैदानात होणाऱ्या ‘करो या मरो’ आंदोलनात सोमवारी सुमारे ५ हजार लोक जमणार, अशी घोषणा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली होती. आता विरोधी पक्षाचे नेतृत्व करणारे युरीबाब आपल्या कुंकळ्ळी मतदारसंघातून किमान एक हजार लोक आणतील, अशी अपेक्षा आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या नेत्यांना वाटत होती. परंतु, दक्षिण गोव्यातून येणाऱ्या बसेस पोलिसांनी अडविल्या आणि जनतेला आतील गोष्ट कळली. त्याचे असे झाले की बसेस अडविल्यानंतर कुंकळ्ळीत सुमारे २०-२५ लोकांना बरोबर घेऊन कॉंग्रेसचे गटाध्यक्ष आसिस नोरोन्हा यांनी पत्रकारांसमोर व्यथा मांडली. त्यामुळे तेथून केवळ ३ बसेस पणजीला जाणार होत्या, असे सांगितले. आता ५ हजार लोकांमध्ये कुंकळ्ळीचे केवळ २०-२५ लोक म्हणजे महासागरात काही थेंब, अशी चर्चा आंदोलकच करीत आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com