Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Codli Mining Public Hearing: कोडली येथील ३७७.०८८१ हेक्टर क्षेत्रातील खनिज ब्लॉकमध्ये प्रतिवर्षी ३५ लाख टन लोहखनिज उत्पादन करण्याचा प्रस्ताव कंपनीने मांडला आहे.
Codli Mining Public Hearing
Codli Iron Ore MineDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: धारबांदोडा तालुक्यातील कोडली येथील लोहखनिज खाण पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यावरण दाखला द्यावा की नाही, यावर गुरुवारी झालेल्या सार्वजनिक सुनावणीत रोजगाराची अपेक्षा व पर्यावरणीय चिंतांचा संघर्ष स्पष्टपणे समोर आला. खाणकाम पुन्हा सुरू झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, ट्रकमालकांना व्यवसाय मिळेल आणि गेल्या १४ वर्षांपासून खाणबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

मात्र, खाणकामामुळे जलस्रोत, शेती, दूधसागर नदी, पर्यावरण आणि स्थानिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत अनेक वक्त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे ‘जेएसडब्ल्यू’ स्टील लिमिटेडच्या प्रस्तावित खाणकामाला पाठिंबा मिळत असतानाच, पर्यावरणीय अटींची पूर्तता आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याची मागणीही जोर धरत असल्याचे सुनावणीच्या इतिवृत्तातून स्पष्ट होते. धारबांदोडा येथील उपजिल्हाधिकारी विमोद दलाल आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शास्त्रज्ञ ‘क’ डॉ. मोहन गिरप यांच्या सहीने हे इतिवृत्त तयार केले आहे.

Codli Mining Public Hearing
Goa Weather Update: काणकोणमध्ये वादळी पावसाचा तडाखा! चावडीत झाड कोसळून वाहतूक कोंडी; शेळेरमध्ये घराचे अडीच लाखांचे नुकसान

कोडली येथील ३७७.०८८१ हेक्टर क्षेत्रातील खनिज ब्लॉकमध्ये प्रतिवर्षी ३५ लाख टन लोहखनिज उत्पादन करण्याचा प्रस्ताव कंपनीने मांडला आहे. याशिवाय, प्रतिवर्षी ८१.२१ लाख टन ओव्हरबर्डन म्हणजेच खनिज उत्खननादरम्यान निघणारा वरचा माती-दगडाचा थर व कचरा हाताळण्याचे नियोजन आहे. त्यामुळे एकूण उत्खननाची प्रस्तावित क्षमता प्रतिवर्षी १ कोटी १७ लाख १० हजार टन असेल. या प्रकल्पात चार क्रशर, ६०० टन प्रतितास क्षमतेचा कोरडा प्रक्रिया व चाळणी प्रकल्प आणि प्रत्येकी ३०० टन प्रतितास क्षमतेचे दोन ओले खनिज समृद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहेत.

स्थानिकांना नोकऱ्या द्याव्यात!

गणेश गावकर, विलास देसाई, किशोर देसाई, रूपेश देसाई आणि इतर अनेक वक्त्यांनी खाणकामाला पाठिंबा दर्शविला. मात्र, हा पाठिंबा बिनशर्त नसल्याचे त्यांच्या निवेदनांतून दिसून आले. स्थानिकांना प्रथम प्राधान्याने नोकऱ्या द्याव्यात, पूर्वीच्या खाणीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी द्यावी आणि स्थानिक ट्रकमालकांना वाहतुकीच्या कामात सहभागी करून घ्यावे, अशी मागणी केली.

पाणीटंचाई, शेती, दूधसागर नदीचा प्रश्न

खाणकामाला पाठिंबा देणाऱ्या वक्त्यांनीही पाणीटंचाई आणि शेतजमिनींच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली. खाणीतून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे शेतांत गाळ साचत असल्याचे त्यांनी सांगितले. खाणकामामुळे विहिरींच्या पाणीपातळीवर आणि दूधसागर नदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. खाणीत तयार होणारे खड्डे भरून काढावेत, नदीपासून योग्य अंतर राखावे, वर्षभर पाण्याचे सर्वेक्षण करावे आणि प्रभावित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

Codli Mining Public Hearing
Goa Agriculture: डिचोलीत परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका! मयेतील भातपीक आडवे, बळीराजा चिंतेत

ग्रामस्थांत जनजागृतीचा अभाव

सार्वजनिक सुनावणीपूर्वी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवालाचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार करण्यात आली. करमणे येथील ॲड. संजित देसाई यांनी ८५२ पानांचा अहवाल अभ्यासण्यासाठी पुरेसा वेळ दिला नसल्याचा आरोप केला. सुनावणीबाबत ग्रामस्थांमध्ये आवश्यक जनजागृती झाली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. सावर्डेचे संकेत भंडारी यांनी कंपनीचे सादरीकरण आधी उपलब्ध करून दिले असते, तर ग्रामस्थांना प्रस्तावाचा अभ्यास करून प्रश्न विचारता आले असते, असे सांगत प्रक्रियेवर आक्षेप घेतला.

वाहतुकीच्या सुरक्षिततेची चिंता

कोडलीतील प्रीतेश गावकर यांनी खाणीपासून घर केवळ ५० मीटर अंतरावर असल्याचे सांगत धूळ, ध्वनिप्रदूषण आणि पाणीसमस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली. जिल्हा पंचायत सदस्य रूपेश देसाई यांनी खाणवाहतुकीतील अपघात रोखण्यासाठी ट्रकना ‘जीपीएस’, वेगमर्यादा आणि चालकांची मद्यपान तपासणी आवश्यक असल्याचे सांगितले. ॲड. राजेश गावकर यांनी खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग आणि समर्पित खाण कॉरिडॉरची मागणी केली.

Codli Mining Public Hearing
Goa Unseasonal Rain: गोव्यात अवकाळीचा तडाखा! सत्तरीत घरावर झाड कोसळले; 40 सुपारी आणि 60 केळीची झाडे मोडली

५१० जणांची उपस्थिती

सुनावणीच्या अधिकृत इतिवृत्तानुसार, एकूण ५१० व्यक्ती उपस्थित होत्या. सुनावणीदरम्यान १० सूचना मांडण्यात आल्या, दोन लेखी आक्षेप प्राप्त झाले आणि १,७६४ लेखी पाठिंबे मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. सुनावणी सकाळी १० वा. सुरू होऊन सायं. ६.४० वा. संपली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com