पणजी: गोव्यात देशभरातील लोक स्थायिक होण्यासाठी आज येतात. त्याऐवजी पोर्तगीजांच्या अत्याचारामुळे गोवा सोडून गेलेले गोमंतकीय परत आले असते तर बरे झाले असते, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे काढले.
भारतीय विचार साधना आणि राष्ट्रीय स्वधर्म संस्कार मंडळ यांनी आयोजित केलेल्या स्व. रंगा हरी यांच्या ‘गोव्यातील धर्मांतर कथा आणि व्यथा’ या पुस्तकाच्या सुनेत्रा जोग यांनी मराठीत केलेल्या भाषांतराचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. गोव्यातील एक हजारहून अधिक मंदिरे पोर्तुगीजांनी पाडली याचा दस्तावेज गोवा मुक्तीनंतर प्रथम आपणच करवून घेतला, असेही त्यांनी अभिमानाने नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले, ब्रिटीश, फ्रेंचांनी देशावर केवळ आर्थिक सत्तेसाठी आक्रमण केले तर पोर्तुगीजांनी गोव्यावर केलेले आक्रमण हे वैचारिक व सांस्कृतिक आक्रमण होते. विदेशी शक्तींविरोधातील देशातील पहिला उठावही गोव्यातच कुंकळ्ळीत झाला होता. आता त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर सरकारच्या प्रयत्नांमुळे घेतली गेली आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले. यावेळी मंचावर मंडळाचे प्रमुख राजेंद्र भोबे व विचार साधनेचे काशिनाथ देवधर होते.
मुख्यमंत्री म्हणाले, नव्या पिढीची धर्मांतर व धर्मछळाविषयी उत्सुकता शमवणारे हे पुस्तक आहे. कुंकळ्ळीतील महानायकांना सरकारी सलामी दरवर्षी १५ जुलै रोजी मिळेल. पोर्तुगीजांच्या छळामुळे अनेकजण गोवा सोडून केरळपर्यंत आणि सिंधुदुर्गात गेले.
त्यांनी गोव्याची संस्कृती तेथे टिकवून ठेवली आहे. केरळमधील धालो गीतांत आजही ‘गोंयच्यान आमी आयले खरे, गोंयची याद आमका येता’ असे शब्द आहेत.
रंगा हरी यांचे सहकारी रमेश पै म्हणाले, केरळमध्ये आजही लहान मुलांना घास भरवताना कावळा गोव्याला गेला बघ, गोव्यात कावळ्याला मामा दिसला का, अशी वाक्ये तोंडी येतात. गोव्याऐवजी मुंबई, मंगळूर म्हणता आले असते पण तेथील आजची पिढीही गोव्याशी असलेले नाते विसरू शकत नाही हेच सत्य आहे. तेव्हा सात्विक हिंदू समाजावर पोर्तुगीजांनी अत्याचार केले.
जोग म्हणाल्या, धर्मांतराच्या कथा व्यथा वाचताना सुन्न व्हायला होत असे. भाषांतर करताना प्रत्येक शब्द हृदयात शिरत असे. भाषांतर सुरू करण्यापूर्वी काही कारणाने आत्मविश्वास गमावला होता, तो या पुस्तकांतील विचाराने परत मिळाला.
सामाजिक कार्यकर्त्या शेफाली वैद्य म्हणाल्या, धर्मांतरासाठी आजचे ख्रिस्ती जबाबदार नाहीत. त्यांच्या पूर्वजांना सक्तीने धर्मांतर करावे लागले, या न्यायाने तेही बळी आहेत. मात्र असे असताना ते धर्मांतर करणाऱ्यांच्या बाजूने ते का बोलतात, हे समजत नाही. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या बाबतीत काय घडले होते ते आधी समजून घ्यावे. इतिहास विसरला तर इतिहासाची पुनरावृत्ती होते. गोव्यतील हिंदूंना जसे ख्रिस्ती व्हा किंवा परांगदा व्हा किंवा मारले जाल, असे पर्याय दिले होते, १९९० मध्ये काश्मीरमध्येही तसेच पर्याय दिले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यातील धर्मांतर बंद पडले हा इतिहास आहे. काही जण अज्ञानापोटी छत्रपतींचा आणि गोव्याचा काय संबंध असे विचारतात, त्यांनी इतिहास अभ्यासावा. राज्य सरकार पोर्तुगीजांनी पाडलेल्या एक हजाराहून अधिक मंदिरांचे स्मरण रहावे यासाठी एक प्रतिकात्मक मंदिर बांधणार आहे.
प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.