

पणजी: भारताने आयुर्वेद हे मानवतेला दिलेले मोठे योगदान आहे. आयुर्वेद ही जीवनपद्धती आहे. गोव्यात सरकारकडून नेहमीच आयुर्वेदिक प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात येईल. गोवा पर्यटनासोबतच आयुर्वेदाचेही केंद्र व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सांताक्रुझ येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियम येथे इंडिया इंटरनॅशनल आयुवर्वेद आणि व्हेलनेस एक्स्पोच्या उद्घाटनसमयी ते बोलत होते. यावेळी पंतजलीचे आचार्य बालकृष्ण, खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्यसचिव व्ही. कांदावेलू, जीसीसीआयच्या अध्यक्ष प्रतिमा धोंड, स्नेहा भागवत व इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, डॉ. सावंत म्हणाले की, योग घराघरात पोहोचविण्याचे कार्य योगगुरू रामदेवबाबा यांनी केले, परंतु जगभरात योगाला सन्मान देण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आयुष डॉक्टरांना आज जगभरात सन्मान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय तत्त्वज्ञानात शारिरीक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य दिले आहे. दोहोंच्या संतुलनाचा विचार आयुर्वेद व्यक्त करते. गोवा वेलनेस, आयुर्वेद आणि योग धोरण २०२६ चे आज अनावरण करण्यात आले आहे.
गोव्यात इतर आजार तुलनेने कमी आहेत परंतु प्रत्येक चार व्यक्तीमागे एकाला मधुमेह आहे. येत्या काळात तो दोघांवर जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी योगावर भर देणे गरजेचे आहे. संतुलित जीवन पद्धतीने मधुमेहाला दूर करणे शक्य आहे. त्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे असल्याचे आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले.
गोवा ही संस्कृती, आयुर्वेदाची भूमी आहे. आयुर्वेद ही जगातील सर्वात प्राचीन चिकित्सा पद्धती आहे. जिच्यातूनच इतर चिकित्सापद्धती जन्माला आल्या आहेत. ही आमच्या ऋषींनी जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे. परंतु अनेकजण आयुर्वेद, योग यांना धर्माशी जोडतात परंतु या मानवतेला समर्पित अमूल्य देणग्या असल्याचे आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.