

पणजी : पंचायत क्षेत्रात येणाऱ्या २४ पेक्षा अधिक फ्लॅटच्या इमारतींना मलनिस्सारण प्रकल्पानंतरच बांधकाम परवाने आणि ऑक्युपन्सी प्रमाणपत्र देण्याचा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिला. शिवाय पंचायती, हॉटेल्स आणि औद्योगिक वसाहतींतील कंपन्यांनी आपला कचरा निश्चित केलेल्या कंत्राटदारांकडेच द्यावा. त्यांच्यावर यापुढे ‘जीपीएस’ प्रणालीद्वारे नजर ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंचायत राज दिनानिमित्त बुधवारी पणजीत आयोजित विकसित गोवा पंचायत संमेलनात ते बोलत होते. पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो, संचालक महादेव आरोंदेकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सध्या कचरा, सांडपाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या समस्येवर मात करणे गरजेचे असून, त्यासाठी पंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कचरा व्यवस्थापनासाठी सरकारने कंत्राटदार निश्चित केलेले आहेत. तो कुठे नेऊन टाकतात? त्यांच्याकडून कचरा प्रकल्पांना देण्यात येतो की नाही? यावर यापुढे जीपीएस प्रणालीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.
राज्यात भटकी गुरे आणि कुत्र्यांचाही प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या गुरांचे मालक त्यांना बाहेर सोडतात. त्यांच्यामुळे अनेक अपघात होत असून, त्यात काहींचे बळीही जात आहेत. अशा प्रकारांना गुरे जबाबदार नसून, त्यांचे मालक जबाबदार आहेत. त्यामुळे अशा गुरांबाबत पंचायतींनी तत्काळ निर्णय घ्यावा. राज्यात सुरू असलेल्या गोशाळांशी त्यांनी सामंजस्य करार करावा आणि भुटक्या गुरांची व्यवस्था तेथे करावी, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
प्रलंबित पंचायत खात्यात प्रशासकीय किंवा इतर बदल करण्यासंदर्भात सूचना सादर करण्याचा प्रत्येक पंचाला अधिकार आहे. त्यांनी त्याबाबतच्या सूचना पंचायत मंत्री, पंचायत संचालकांना कराव्या. त्यातून पंचायतींचा कारभार सुधारण्यास मदत मिळेल. पंचायतींनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला घर तसेच कचरा कर जमा करण्याबाबतही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय नागरिकांकडून विविध प्रमाणपत्रांबाबत येणाऱ्या अर्जांवर १५ दिवसांत निर्णय घेणेही आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.
पंचायत खात्यामार्फत मे महिन्यानंतर प्रत्येक पंचायतीत तांत्रिक सहाय्यकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे मंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले. सर्वच पंचायतींनी लवकरच कामकाजाबाबत एआयवर आधारित अटेंडन्स प्रणाली व अशाप्रकारच्या इतर तंत्रज्ञानाचा वापर सुरू करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.