पणजी : जे पक्षात येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करीत आहोत. लोकशाहीमध्ये विरोधक सक्षम असणे गरजेचे आहे, असे सांगत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात उभारल्या जात असलेल्या साधनसुविधा पाहता आयडॉल महाराष्ट्र पुरस्काराने गौरविलेल्या उद्योजकांना आपल्या व्यवसाय विस्तारासाठी गोव्यात व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले.
सकाळ समूहाच्यावतीने कदंब पठारावरील तारांकित हॉटेलमध्ये शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या आयडॉल महाराष्ट्र या पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर जीनो उद्योग समुहाचे प्रमुख दिलीप साळगावकर, मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले, दै. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, वेदान ग्रुपचे डॉ. अमिर मुराद यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मुंबई सकाळचे संपादक गडपाले यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
गोव्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, महाराष्ट्रात नेटवर्क फुल्ल असले, तरी गोव्यात मात्र नेटवर्क फ्री आहे आणि त्यामुळे कितीही सीमकार्ड चालू शकतात. आपल्यावर लोकांनी विश्वास ठेवला. त्यामुळेच 13 वरून आम्हाला 20 जागा मिळाल्या. 2007 मध्ये राजपत्रित नोकरी असतानाही आपण राजकारणात पाऊल टाकले, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी आपणास राजकारणात आणले. वडील, आई, पत्नीच्या पाठिंब्याने यशस्वी झालो.
‘पर्यटन क्षेत्रात नव्या संधींचे आमचे ध्येय’
पर्यावरणाचा समतोल राखून आम्ही शाश्वत विकास साधत आहोत. पुढील पाच वर्षांचा विचार केला, तर मोपा विमानतळ, खासगी विद्यापीठे, झुआरीचा तिसरा पूल, स्वयंपूर्ण गोवा आणि पर्यटन क्षेत्रात मानव संसाधन क्षेत्राद्वारे नव्या संधी उपलब्ध करण्याचे आमचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
‘ॲप बेस टॅक्सी सेवा सुरू करणारच’
ॲप बेस टॅक्सी सेवा करणे ही काळाची गरज आहे. त्यास विरोध झाला तरी आम्ही ती करणारच आहोत. पर्यटकांच्या आणि येथील व्यावसायिकांच्याही हिताचा विचार केला पाहिजे. लोकांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आयडॉल महाराष्ट्र पुरस्कार विजेत्या उद्योजकांना गोव्यातही व्यवसाय विस्ताराचे आवाहन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.