पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोवा माईल्सचा काऊंटर हटवा या प्रमुख मागणीसाठी पेडण्यातील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी गेले पाच दिवस आंदोलन करूनही ही मागणी मात्र मान्य झाली नाही.
अॅपवर आधारीत टॅक्सीसेवेला सरकारचा पाठिंबा आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी स्पष्ट केले होते. आजही त्यांनी त्याच भूमिकेवर ठाम राहत ही मागणी फेटाळून लावली. केवळ स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसाठी विमानतळावर स्वतंत्र काऊंटर ही मागणी मान्य झाल्याने टॅक्सी व्यावसायिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
त्यांना विमानतळावर गोवा माईल्स, गोवा टॅक्सी, ब्लू कॅब यांच्याशी स्पर्धा करतच व्यवसाय करावा लागणार आहे.
पेडणेतील टॅक्सी आंदोलकांच्या वतीने १६ जणांच्या शिष्टमंडळाने आज (२६ ऑगस्ट) अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. परंतु त्यांनी मांडलेल्या सहा मागण्यांपैकी पाच मागण्या मान्य करण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर हे शिष्टमंडळ अद्याप पेडण्यातील आंदोलनस्थळी पोहचले नसल्याने आणि गोवा माईल्स काऊंटर हटवण्याची मागणी मान्य करण्यात न आल्याने टॅक्सी व्यावसायिकांच्या एकंदर आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मोपा पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक, जीएमआरचे अधिकारी आणि इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते. टॅक्सी आंदोलकांचे १६ जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना सोमवारी भेटले. याच शिष्टमंडळासोबत पुन्हा एकदा संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिले आहे.
आंदोलन मागे घ्या : मुख्यमंत्री
गोवा माईल्स टॅक्सीचालक ग्राहकांना चांगली सेवा देत आहेत. त्यामुळे ही मागणी मी मान्य करू शकणार नाही, हे त्यांना कळवले आहे. टॅक्सी आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती देखील मी केली असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.