मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या! खरी कुजबूज

सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या निवडणुकीमध्ये मोठे यश मिळवले आहे.
Goa cm visit delhi
Goa cm visit delhiCm meet Gadkari

मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या

सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या निवडणुकीमध्ये मोठे यश मिळवले आहे. मुख्यमंत्रिपदाचा प्रभार घेतल्यानंतर चार वेळा ते दिल्लीला गेले. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करत दिल्लीचा निधी गोव्याकडे मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. मात्र, त्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढले आहेत अशी चर्चा सुरू आहे, काही का असेना मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या विविध योजना राज्यात लागू केल्याने जनतेचे भले होत असेल, तर त्याला प्रोत्साहनच द्यावे लागेल.∙∙∙

जमीन रूपांतरणाचा वाद

हडफडे येथील प्रकार उघडकीस आल्यानंतर आता सरकारने व खास करून नगरनियोजन मंत्र्यांनी शेतजमिनीचे बिगर शेतजमिनीत रूपांतर होऊ देणार नाही असे स्पष्ट केले आहे, पण मुद्दा तो नाहीच मुळी. गेल्या काही वर्षांत राजकारण्यांच्या सांगण्यावरून इतक्या मोठ्या प्रमाणात अशी रूपांतरे झालेली आहेत की काही भागात शेतजमीनच शिल्लक उरलेली नाही व म्हणून मंत्र्यांच्या त्या घोषणा या भागासाठी निरर्थक ठरत आहेत. काही भागात तर कुळ कायद्याखाली कुळांना मिळालेल्या शेतीतही इमले उभे ठाकलेले आहेत. त्यांचे काय असे सवाल उपस्थित केले जात आहेत. ∙∙∙

भाविक चोर

देवाविषयी आदर नसलेली माणसे तशी नगण्यच. अनेकांच्या मनात देवाविषयी भक्तिभाव असतो. हे भक्तिपुराण येथे सांगण्याचे कारण म्हणजे, चोरांनीही मंदिरात चोरी करण्यापूर्वी देवाला नमस्कार करून चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून याची चर्चा राज्यात जागोजागी सुरू आहे. केपे येथील दत्त मंदिरात फंडपेटी पळवून नेऊन त्यातील ४० हजारांची रोकड चोरांनी लंपास केली. या चोरीचा संपूर्ण प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपला गेला आहे. मंदिराच्या दरवाजाचे गज कापून एका चोराने आत प्रवेश केला. नंतर आत जाऊन दरवाजा उघडून इतर सहकाऱ्यांना आत घेतले. फंडपेटीला हात घालण्यापूर्वी त्यांनी देवाला मनोभावे नमस्कार केला आणि मगच चौर्यकर्माला हात घातला. कोणत्याही अभिलाषेने नव्हे, तर आम्ही परिस्थितीशरण होऊन हे कृत्य करत आहोत, देवा आम्हाला माफ कर, असेही हे चोर मनात म्हणाले असतील, असाही काही ठिकाणी चर्चेचा सूर होता. खरे-खोटे देव जाणे! ∙∙∙

केंद्राचा दिलासा

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रत्येकी ९.५० रु. व ७ रुपयाने कपात करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे प्रतिलिटर ८ रुपये आणि ६ रुपये कपात केली आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेल स्वस्त झाले आहे, परंतु या दर कपातीमुळे गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली महागाई कमी होणार आहे का? खाद्य तेल, डाळी, औषधांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्याची झळ दररोज सर्वसामान्यांना बसत आहे. खरे तर, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्यानंतर इतर वस्तूंच्या दरात आपोआप घट व्हायला हवी, परंतु तसे होताना दिसत नाही. कारण ४ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क ५ रुपयांनी व डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले होते. तेव्हा कोठे झाली होती महागाई कमी? उलट ती वाढली. पेट्रोल, डिझेल दरात घट झाल्यानंतर इतर वस्तुंचे दर जेव्हा घटतील तेव्हाच महागाई कमी झाली असे म्हणता येईल, अन्यथा नाही. केवळ येणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही दर कपात आहे का? किंवा निवडणुकीनंतर पुन्हा पेट्रोल, डिझेलचा भडका उडेल का अशी शंका मात्र उपस्थित होताना दिसत आहे.∙∙∙

(CM Pramod Sawant Delhi visit increased)

Goa cm visit delhi
गोवा गुन्हेगारी मुक्त करण्यास सहकार्य करा : पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना

पालिकेचा वादग्रस्त दंड

अशिक्षित व अनाड्यांनी चूक केली तर आपण समजू शकतो. मात्र, शिक्षित माणसे तेही लोकप्रतिनिधी जेव्हा चुकीचे वागतात, तेव्हा प्रश्न पडतो या शिक्षणाचा उपयोग काय? काल रविवारच्या बाजारात कुंकळ्ळी पालिकेच्या नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवकांनी बाजारात चारचाकी गाडीवर रेडिमेट गारमेन्ट विकणाऱ्या एका विक्रेत्याला मोबाईल स्टॉल उभारल्याचे कारण सांगून दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, दुसऱ्या गाडीला दंड न आकारताच सोडले. हे सर्व घडले नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांच्या उपस्थितीत. कहर तर तेव्हा झाला जेव्हा पालिकेने हा दंड कचरा कायद्याचा भंग केल्याचे कारण सांगून गोळा केला. विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण खात्याच्या लेटरहेडवर कोणताही सरकारी शिक्का न वापरता एका कारकुनाच्या सहीने पालिकेने बेकायदेशीर दंड गोळा केला. परिणाम बाजारात लोकांना मोफत तमाशा पाहण्याची संधी मिळाली.∙∙∙

पहिल्याच पावसात ‘शॉक’

गेले दोन-तीन दिवस राज्यात काही ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार सलामी दिली. अनेक ठिकाणी पडझड झाली. नेहमीप्रमाणे पहिल्या सलामीतच राज्यातील वीजवाहिन्या, खांब यांची प्रचंड पडझड झाली आणि अतोनात आर्थिक नुकसानही झाले. यामुळे खासकरून ग्रामीण भागातील लोकांना बराच त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी लोकांचा संयम सुटला आणि त्यांनी वीज खात्याच्या कार्यालयावर धडक दिली. अपुरे मनुष्यबळ, वाहने व संसाधनांची कमतरता, अशा वीज खात्याच्या अनेक मर्यादा या निमित्ताने उघडकीस आल्या. ग्रामीण भागातील जंगल पर्यायाने मोठ्या झाडांमुळे हे प्रकार दरवर्षी होतात, असे वीज खात्यामार्फत सांगितले जाते. त्याला भूमिगत वीजवाहिन्या हा चांगला पर्याय आहे. जर जनतेने त्यासाठी सरकारवर दबाव आणला तर ही समस्या कायमची सुटू शकते. नवे वीजमंत्री या समस्येबाबत कसा पुढाकार घेतात, हे आता पाहावे लागेल. ∙∙∙

गोविंद गावडे को गुस्सा क्यों आता है?

कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी कला अकादमीच्या नुतनीकरणासंदर्भात चार्लस् कुरय्या फाउंडेशनचे आरोप फेटाळून लावताना, कुठले चार्लस् कुरय्या फाउंडेशन? त्यांना काय अधिकार? तसेच आपने पत्रकार परिषद घेऊन, कला अकादमीत काय चालले आहे ते जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार लोकांना आहे असे म्हटले होते. त्यासंबंधी पत्रकारांशी बोलताना ज्या पध्दतीने भाषा वापरली त्याचा समाचार घेणारा ‘वासंती फेम’ राजदीप नाईक यांचा व्हिडिओ सध्या बराच गाजत आहे. राजदीप म्हणतात, ज्या लोकांच्या पैशांवर कला अकादमीचे नूतनीकरण चालले आहे. त्यासंदर्भात जाणून घेण्याचा लोकांना पूर्ण अधिकार आहे. कला व संस्कृतीमंत्री ज्या पध्दतीने बोलताहेत ती वृत्ती संस्कृती मंत्र्याला शोभत नाही. फोंडा येथील राजीव कला मंदिरातील कोट्यवधी रुपये खर्चून बसवलेली ध्वनी व्यवस्था नादुरुस्त झाली आहे. त्यासंदर्भात गावडे म्हणतात, ती कोणी चोरून नेली त्याची सदस्य सचिवावंर वा अध्यक्षांवर पोलिसांत तक्रार करावी. याचा समाचार घेताना राजदीप म्हणाले, की ही तक्रार खुद्द सदस्य सचिवांनी करायला हवी याचेही मंत्र्यांना भान नाही. त्यांना अहंकार जडला आहे. (त्यांच्या भाषेत ‘मद मारला’) व या निवडणुकीत मताधिक्य घटले आहे ते याचमुळे. योग्यवेळी गोविंद गावडे यांना योग्य ते दाखवून देईन असेही सांगायला राजदीप विसरले नाहीत. ∙∙∙

नवोदित कलाकारांना द्या संधी

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरातर्फे खूप छान उपक्रम केले जातात. त्यातीतलच विविध नाट्य स्पर्धा हे काही उपक्रम आहेत. अर्थातच हे उपक्रम मंत्री गोविंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली होतात हे वेगळे सांगायला नको, पण खटकणारी गोष्ट म्हणजे या नाट्य स्पर्धेत सहभागी काही कलाकार हे थेट कला अकादमीशी संबंधित आहेत. म्हणजे कला अकादमीचे नोकरदार. आता या प्रतिथयश कलाकारांनी स्पर्धेत भाग घेणे तसे गैर नाही, पण या कलाकारांना बक्षिसेही जाहीर झाली म्हटल्यावर सरकारी सेवेत आणि त्याच खात्यात असलेल्यांना कशी काय बुवा बक्षिसे मिळतात असा मुद्दा उपस्थितांनी काढला. वास्तविक या कलाकारांनी सहभाग जरूर घ्यावा, पण बक्षिसांसाठी या कलाकारांचा विचार न करता नवोदितांचा व्हायला हवा. बरोबर ना..! उगीच आपले सगळीकडेच अडवून बसतात.∙∙∙

भर बाजारात पालिका मंडळाचा तमाशा!

कुंकळ्ळी बाजारात तसे मासळी विक्रेत्यांचे भांडण लोकांनी अनेकवेळा पाहिले आहे. मात्र, काल रविवारच्या बाजारात पालिकेच्या नगरसेवकांचा मोफत तमाशा जनतेने पाहिला. बाजाराच्या पाहणीच्यावेळी विक्रेत्यांना दंड देण्यावरून नगरसेवक उदेश देसाई व नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांच्यात वाद पेटला. लक्ष्मण नाईक व उदेश देसाई यांनी केवळ वादच केला नाही, तर भर बाजारात दोघांनी एकमेकांच्या विरोधात अपशब्दांचाही वापर केला. या तू तू मै मै च्या वादावेळी नगरसेवक राहुल, जॉन, रेमंड व उपनगराध्यक्ष अँथनी उपस्थित होते. गेले दीड वर्ष जो तमाशा पालिकेत होत होता तो अखेर बाजारात पोचला. म्हणतात ना डिग्री माणसाला सुसंस्कृत बनवीत नाही त्याचेच हे उदाहरण.∙∙∙

बाळ्ळीकर म्हणतात, स्थिर पंचायत मंडळ हवे!

‘गरम दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकर मारून पितात’ असे एक बोधवाक्य आहे. अनुभवाने माणूस शहाणा होतो. बाळ्ळीकर आता शहाणे होणार आहेत, असे म्हणतात. गेल्या वेळी बाळ्ळीकरांनी स्वच्छ प्रशासन व गावाच्या विकासासाठी युवा पंचांना निवडून दिले होते. मात्र झाले भलतेच. ज्यांना निवडून दिले होते, त्यांनी पंचायतीत केवळ संगीत खुर्चीचा खेळ केला. एका एका पंचाने तीन तीन महिने सरपंचपद वाटून घेतले. सरपंच म्हणून खुर्चीवर बसून काम हाती, घेतो तोपर्यत दुसरा सरपंच खुर्चीवर हजर. गेल्या पाच वर्षांत पंचायत मंडळाचे सर्व नऊही पंच सरपंच बनले. या संगीत खुर्चीच्या खेळात विकास राहिला बाजूलाच. आता बाळ्ळीकरांनी प्रण केला आहे, पुढे स्थिर पंचायत मंडळ निवडून आणण्याचा. आता पाहूया पुढे काय होते!∙∙∙

वारे फिरले

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोवा हे नावाजलेले पर्यटनस्थळ आहे. मात्र, सध्या येथे पर्यटकांची वर्दळ खूपच मंदावली आहे. खरे तर येथील स्वस्त मद्य, सुंदर रूपेरी किनारे, पर्यटकांना सुखासीन वैभवाचा आनंद देणाऱ्या पंचतारांकित सुविधा असतानाही पर्यटकांनी गोव्याकडे पाठ का फिरवावी, याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. कोरोनानंतर विदेशी पर्यटक गोव्यात जवळपास बंदच झाले आहेत. याउलट गोव्याएवढेच क्षेत्रफळ असलेल्या बाजूच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे देशी पर्यटकांचे लोंढे वाहू लागले आहेत. तेथे गोव्यासारखे स्वस्त मद्य नसले, तरी स्वच्छ, नितळ किनारे, दाट निसर्ग आणि वाजवी दरात मिळणारी आदरातिथ्य सेवा यांमुळे पर्यटक तेथे पुन्हा पुन्हा जाण्यास उत्सुक असल्याचे दिसून येते. गोव्यात प्रवासी सेवेपासूनच पर्यटकांना लुटण्यासाठी स्पर्धा सुरू होते. किनारी भागात अव्वाच्या सव्वा दराने वस्तू विकल्या जातात. त्यामुळे पर्यटनाचे वारे फिरण्यापूर्वी याचा विचार होणे गरजेचे आहे, अशी चर्चा केली जात आहे. ∙∙∙

अखेर मुहुर्त मिळाला

मडगाव नगरपालिका क्षेत्रातील नाले उपसा कामासाठी अखेर मुहुर्त मिळाला आहे. मात्र, जलस्रोत खाते किमान आठवडाभराने काही लाखांचे हे काम हाती घेणार आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पालिकेने या कामाच्या प्रस्तावाला विलंब लावला, तर पालिका या प्रकरणात निवडणूक आचारसंहितेवर बोट दाखवते. सांगण्याचा मुद्दा एवढाच की पावसाने कृपा केली, तर ठीक अन्यथा धो धो पावसात हे काम करावे लागणार आहे. जलस्रोताचे काय त्याला ठरलेले लाख मिळतील व पालिका नाले उपसा झाल्याचे समाधान मानेल एवढेच. पण उपसा व्यवस्थित होणार का?∙∙∙

बिचारे रेजिनाल्ड

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपशी सोयरीक केलेल्या कुडतरीच्या रेजिनाल्डबाबांची आता बरीच कुचंबणा झालेली पाहायला मिळते. काँग्रेसमध्ये असताना त्यांना सरकारवर म्हणजेच भाजपवर उघड उघड टीका वा कोणताही मुद्दा घेऊन हल्लाबोल तरी करता येत होता, पण आता भाजप मित्र बनल्यापासून तेही करता येईनासे झाले आहे व एकप्रकारे त्यांची घुसमटमार होत चालल्याचे त्यांचे मतदारच बोलू लागले आहेत. त्याचमुळे असेल कदाचित दयानंद सामाजिक सुरक्षा वा अन्य सामाजिक योजनांतील लाभार्थ्यांना विनाविलंब लाभ द्यावा अशी विनंतीवजा मागणी त्यांनी केली आहे. तेच जर ते काँग्रेसमध्ये असते, तर त्यांनी सरकारला दे माय धरणी ठाय करून सोडले असते.∙∙∙

Goa cm visit delhi
‘मंदिर वही बनायेंगे’; मुख्यमंत्र्यांचा नारा

तानावडेंची बडदास्त

सदानंद शेट तानावडे हे गोव्याच्या निवडणुकीतील भाजपच्या विजयाचे एक शिलेदार. गोव्यात सत्ता मिळवून देण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. आपल्या कारकीर्दीत भाजप सत्ताधारी पक्ष बनला याचा आनंद त्यांना वारंवार होत असेलच. तानावडेंच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यामुळेच राष्ट्रीय नेत्यांमध्ये तानावडेंची बडदास्तही दिसून आली. जयपुरी स्टाइलमध्ये विमानतळावर तानावडेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. भाजपच्या या मेळाव्यात तानावडे यांनी राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यासोबत वेळही घालविला. त्यांच्याकडून अनुभवाचे दोन शब्द ऐकून घेतले. राज्याच्या राजकीय स्थितीची माहितीही त्यांनी वरिष्ठांच्या कानावर घातली. एकंदरीत, तानावडेंची पक्षातील वाटचाल ही वाढता वाढता वाढे... अशीच आहे. त्यामुळे तानावडेंना गोव्याचे अमित शहा म्हटले तर वावगे ठरू नये.∙∙∙

गोवा रंगू लागला...

गोवा राज्य हिरवेगार म्हणून जरी प्रसिद्ध असले, तरी आता दर दिवसा होणारे खून पाहता गोवा रक्तरंजित होऊ लागला आहे. खुन्यांना पोलिसांनी पकडले म्हणून गेलेल्यांच्या जीव परत मिळत नाही. सध्या गोव्यात होणारे खून पाहता ना पोलिसांचा धाक ना सरकारचा पोलिसांवर वचक. सगळे काही बिनधास्त चालल्याप्रमाणे खुनी खून करतात आणि मागाहून पोलिस त्यांना पकडतात. बक्षीसही मिळवितात, पण बिचाऱ्याचा हकनाक बळी जातो त्याचे काय? विरोधी पक्षात पावसाआधीच गारवा निर्माण झाला आहे. अशा परिस्थिती राज्यात जे काही घडतंय तें बिंदास रामदास प्रमाणे ∙∙∙

गोव्याचा असाही बहुमान

मद्य विक्रीतच नव्हे, तर मद्यप्राशनातही गोवा अव्वलस्थानी असल्याच्या राष्ट्रीय परिवार आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालामुळे या व्यवसायांतील अनेकांची मान ताठ झाली तर नवल नाही. तसे पाहिले तर मद्य व गोवा याचे पुरातन नाते. आता तर केवळ मद्याची चव चाखण्यासाठी गोव्यात येणारे जास्त आहेत व त्याचा प्रत्यय गोमंतकीय घेत आहेत. मात्र, ताज्या अहवालावरून वेगळाच निष्कर्ष निघतो. हे कारणही बहुमान असल्याचे मिरवणारे असतीलच. ∙∙∙

अवजड वाहतूक हवीच का?

चोर्ला घाट रस्ता दुरुस्त झाला आणि पुन्हा वाहतूक कोंडी, अपघाताचे सत्र सुरू झाले. अवजड वाहतूक बंद होती, तेव्हा सर्वकाही सुरळीत होते, पण अवजड वाहतुकीला शासनाने हिरवा कंदील दाखवला आणि घाट रस्त्यावरील डोकेदुखी वाढली. रस्ता अरूंद असूनही अवजड वाहतूक का केली जाते? रस्ता यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा खड्ड्यात टाकायचा संबंधितांचा विचार आहे का? अशी चर्चा प्रवासी वर्गात सुरू आहे. अनेक वर्षे दिवसभर पूर्णपणे बंद असलेली अवजड वाहतूक पुन्हा सुरू झाली आणि लांब पल्ल्याच्या प्रवासी लक्झरी गाड्याही वाढल्या. त्यामुळे हा रस्ता नकोसा वाटू लागला आहे.∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com