CM Pramod Sawant On Goa Accidents: गोव्यातील रस्ते अपघात हे 2021 च्या तुलनेत 2022 आणि 2023 मध्ये जास्त प्रमाणात वाढले असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. वाहनचालकांचा बेदरकारपणा, निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांचे सतत होणारे उल्लंघन हेच वाढत्या अपघातांचे कारण असल्याचे वाहतूक विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.
विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले की...
यावर आज विधानसभेच्या आठव्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाष्य केले. काल गोव्यात झालेल्या अपघातांबद्दल त्यांनी विधानसभेत माहिती दिली. ते म्हणाले की, सध्या गोव्यात दिवसाला कमीत-कमी 5 ते 6 अपघात होतात. याचे मुख्य कारण म्हणजे वाहनचालकांचे 'रफ ड्रायव्हिंग' हेच आहे.
वेगाचे भान न ठेवता वाहनचालक गाड्या चालवतात आणि मग अपघातांना निमंत्रण देतात. यातीलच अजून एक गोष्ट म्हणजे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे. यामध्ये प्रामुख्याने तरुणांचा सहभाग आहे. यामुळेही गोव्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गोव्यात सध्या अशी स्थिती आहे की, दिवसाला रस्ते अपघातात कमीत-कमी एक बळी जातोच. यात तरुण जास्त प्रमाणात आढळून आले आहेत.
कोरोना महामारीच्या काळात जेव्हा गोव्यात कोरोनामुळे दिवसाला एकाच मृत्यू व्हायचा, तीच गोष्ट आमच्यासाठी अतिशय भयावह होती; आणि आता हीच परिस्थिती रस्ते अपघातात दिसून येत आहे. हे बळी नक्कीच मनाला चटका लाऊन जाणारे आहेत. त्यामुळे यावर नक्कीच लवकरात लवकर तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे. वाहनचालकांनी सर्व वाहतूक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
गोव्यातील खणलेल्या रस्त्यांचे काय?
विधानसभेत ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अपघात आणि त्यामागील कारणांवर भाष्य केले, तेव्हा त्यांनी गोव्यातील रस्त्यांच्या अवस्थेकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसले. सध्या गोव्यात मॉन्सूनपूर्व कामे सुरू आहेत. पण त्याचे नियोजन कुठेतरी चुकले असल्याचे मत राज्यभरातील वाहनचालकांकडून व्यक्त केले जात आहे.
ही मॉन्सूनपूर्व कामे खरंतर जानेवारीमध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र या कामांना तब्बल 2 महीने उशीर झाला आहे. त्यात एकाच वेळी सगळीकडचे रस्ते खणल्यामुळे चालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना सध्या रोजच करावा लागत आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली रस्त्याची कामे, खराब रस्ते हे सुद्धा राज्यातील अपघाताचे एक कारण आहे, याचा उल्लेखच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात केला नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.