खरी कुजबुज: माजी आमदार क्लाफास खूश!

Khari Kujbuj Political Satire: फोंड्यात भंडारी समाजाचा स्नेह मेळावा आयोजित करून रवींनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे
Khari Kujbuj Political Satire: फोंड्यात भंडारी समाजाचा स्नेह मेळावा आयोजित करून  रवींनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

माजी आमदार क्लाफास खूश!

आनंद व दुःख हे क्षणभंगुर असते, असे म्हणतात. कुंकळ्ळीचे माजी आमदार क्लाफास डायस प्रथम आमदार बनल्यावर खूश होते. मात्र, दुसऱ्यावेळी त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आमदार दुःखी बनले होते. मात्र, आता क्लाफास बाब ‘दुख के दिन बिते रे भैया , सुख के दिन आयो रे’ हे गीत आळवू लागले आहेत. कारण म्हणजे येणाऱ्या विधानसभेत आमदाराची संख्या वाढणार व क्लाफास डायस यांना फायदेशीर ठरेल, असा पारोडा मतदार संघ म्हणे अस्तित्वात येणार आहे. आपल्या मनासारखे झाले, तर वालंकिनी सायबिणीला आंगोण करायचे त्यांनी म्हणे ठरविले आहे. ∙∙∙

पोलिसांकडून चोरीवर पांघरुण?

कोंबडे कितीही झाकून ठेवले तरी दिवस उजाडायचा रहात नाही, असे म्‍हणतात. अशीच बाब दक्षिण गाेव्‍यातील पोलिसांची झाली आहे. दक्षिण गोव्‍यातील पोलिसांची एकेक कुकर्मे बाहेर येऊ लागल्‍यामुळे त्‍यांची नाचक्‍की होऊ लागली आहे. याच पार्श्‍वभूमीवर आता कुठल्‍याही पोलिस स्‍थानकाच्‍या कक्षेत जर मोठा गुन्‍हा घडला तर त्‍याची माहिती वृत्तपत्रांना देण्‍याऐवजी ती माहिती लपवून ठेवणं पोलिस पसंत करतात. याचा प्रत्‍यय परवा रविवारी आला. लोटली या भागात ११ लाखांची चोरी झाली हाेती. मात्र, दक्षिण गोवा पोलिसांकडून पत्रकारांना गुन्‍ह्याची माहिती देणारे जे पत्रक दरदिवशी जारी केले जाते, त्‍यात या चोरीचा कुठलाही उल्‍लेख नव्‍हता. का बरे या चोरीच्‍या कृत्‍यावर पोलिसांना पांघरुण घालावेसे वाटले, याचे कुणी उत्तर देईल का? ∙∙∙

रवींचा ‘मास्टर स्ट्रोक’

फोंड्यात भंडारी समाजाचा स्नेह मेळावा आयोजित करून रवींनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे. या मेळाव्याद्वारे त्यांनी आपले भंडारी समाजावर असलेले वर्चस्व तर सिद्ध केलेच. शिवाय मुख्यमंत्र्यांना इशारा देण्याचेही काम केले. होऊ घातलेल्या मंत्रिमंडळाच्या फेररचनेत रवींच्या मंत्रिपदाला हात घालणार,असा कयास व्यक्त केला जात होता. पण परवा सनग्रेस गार्डन मध्ये एकत्रित झालेली ‘शक्ती’ पाहता मुख्यमंत्र्यांना रवींच्या पदाला हात लावण्यापूर्वी दहा वेळा तरी विचार करावा लागेल, असे दिसून आले. यालाच म्हणतात रवींचा ‘मास्टर स्ट्रोक’. ∙∙∙

मग फोन करू नका?

मध्यंतरी म्हापसा पालिकेने गाजावाजा करुन अतिक्रमण मोहीम शहरात राबवली होती. याविषयी तत्कालिन मुख्याधिकार्‍यांसोबत पालिका मंडळावर सुरवातीला टीका झाली होती. परंतु, कालांतराने बाजारपेठेत शिस्त आली. मात्र दिवस उलटले व पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती आहे. त्यानंतर पालिकेने तशी तीव्र मोहीम अद्याप राबवलेली नाही. परिणामी, भाजी व मासळी मार्केट बाहेर घाऊक विक्रेत्यांकडून अतिक्रमण होत असल्याचे काही व्यापऱ्यांनी नगरसेवकांच्या नजरेस हा विषय आणून दिला. त्यामुळे अतिक्रमणाबाबत कारवाई झाली पाहिजे, असे काही नगरसेवकांचे मत. याला काहींची सकारात्मक तर काहींची नकरात्मक प्रतिक्रिया. कारण, कारवाई केल्यास ती सर्वांना एकसमान लागेल. अनेकदा कारवाई करताना, तो माझा वोटर आहे,असे म्हणून नगरसेवक फोन करून संबंधितास सोडून देण्यास सांगतात, असे काही अधिकारी अन् नगरसेवकांचे मत. सोमवारी पालिका मंडळातील सत्ताधारी गटातील नगरसेवकांच्या बैठकीत हा विषय म्हणे गाजला. अशात पालिका कारवाई करते, की ही बाब बैठकीतील चर्चेपूर्तीच मर्यादित राहते, हे पुढे समजेलच.∙∙∙

सुट्टीच्या दिवशीही तलाठी ‘ऑन ड्युटी’

राज्यातील डोंगर कापणी आणि भराव घालण्याच्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासह अहवाल देण्यासाठी तलाठ्यांना शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशीही निरीक्षण करण्याची सक्ती राज्य सरकारने केली आहे. म्हणजे आता तलाठी २४ x ७ कामावर असतील. एरव्ही कामाच्या दिवसात तलाठ्यांना शोधण्यासाठी कचेरीत गेलो तर ते कधी उपलब्ध नसतात. केवळ पहाणी करण्यासाठी गेल्याचे, दुसऱ्या कुठल्यातरी खात्यात गेल्याचे, मामलेदारांना भेटायला गेल्याचे, मिटींगसाठी गेल्याचे अशी अनेक कारणे तेथील कर्मचारी सांगत असतात. आता डोंगर कापणी आणि भराव घालण्याच्या प्रकारांवर लक्ष देण्यास गेल्याचे हे आणखी एक कारण त्यांना मिळणार आहे असे लोक बोलू लागले आहेत. ∙∙∙

सरकारी अधिकारी ‘टार्गेट’

राज्यातील महत्त्वाच्या पदांवर असलेल्या सरकारी अधिकारी, विविध खात्याच्या संचालक, माजी संचालक यांच्या नावे समाजमाध्यमांवर बनावट अकाऊंटस् ओपन करून पैसे मागण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून घडत आहेत. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नावे खाते उघडून त्यांच्या विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना संदेश पाठवून पैसे मागण्याचे प्रकार होत आहेत. राज्यातील अधिकाऱ्यांना टार्गेट करून पैसे उकळण्याचा त्यांचा प्रयत्न कितपत साध्य होत आहे, हे माहीत नाही. परंतु अशा प्रकारे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची माहिती मिळवून गुन्हे करणे राज्याच्या हिताचे नाही. आज कदाचित पैसे मागत असतील, उद्या एखादी माहिती, काही महत्त्वाची शासकीय माहिती मागून काही भलतेच केले, किंवा त्यांच्या नावावरून भलतीच माहिती समाज माध्यमात प्रसृत केली, तर त्याला जबाबदार कुणाला धरावे, असा प्रश्‍न चर्चेत आला आहे. सायबर यंत्रणेने हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी अधिकाऱ्यांत चर्चा आहे. ∙∙∙

वायनाड भूस्खलनग्रस्तांच्या मदतीला तवडकर

पंढरपूरचा पांडुरंग विटेवर उभा राहून वर्षानुवर्षे भक्तांची वाट पाहत आहे. मात्र, काणकोण मधील हा पांडुरंग पडलेली घरे श्रमदानातून वीट-वीट जोडून घरे बांधत आहे. सभापती रमेश तवडकर यांच्या वाढदिवस सोहळ्यात पेडणेतील एका साहित्यिकाने त्यांना पांडुरंगाची उपमा देऊन दीर्घ कविता सादर केली. पाडुरंग जसा भक्तांचा भुकेला आहे त्याचप्रमाणे तवडकरजी कार्यकर्त्यांचे भुकेले आहेत,अशीही स्तुती त्यांनी केली.श्रमधाम अंतर्गत त्यांनी एक हजार कार्यकर्त्यांची फौज उभारली आहे. आता भूस्खलन झालेल्या वायनाड येथे ही कार्यकर्त्यांची फौज घेऊन जाणार आहेत, त्यामुळे भक्तांच्या हाकेला धावून जाणारा पांडुरंग असा भाव त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांचा झाला आहे.त्याला सार्थ प्रतिसाद देण्यासाठी हल्लीच सपत्निक त्यांनी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले आहे.त्यांनी आपल्या बरोबर कार्यकर्त्यांचे भले करण्याचे साकडे पाडुरंगाला घातले असेलच. ∙∙∙

डबल काम...

म्हापसा शहरापासून राज्यातील रस्त्यांची अवस्था आता कुणापासून लपून नाही. तसेच, म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळाच्या आवारातील रस्त्यांवरही खड्डे पडले होते. अशावेळी इस्पितळात येणाऱ्या रुग्णांची होणारी गैरसोय पाहता, या खड्ड्यांमध्ये माती भरून खड्डे बुजविले होते. एका नगरसेवकाने हा पुढाकार घेतला. परंतु, ही माती इस्पितळासाठी डोकेदुखी ठरली, कारण पावसामुळे चिखल झाला व ही माती इस्पितळाच्या दारापर्यंत पोहचली. परिणामी येथील कर्मचाऱ्यांवर ही माती पाण्याने स्वच्छ धुवून काढण्याची वेळ ओढवली. बिचाऱ्या लोकप्रतिनिधीने चांगल्या हेतूने प्रयत्न केला खरा, मात्र डबल काम लागले. सरकारने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वीच बुजवले असते, तर ही स्थितीच उद्भवली नसती,असे लोक बोलताहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: फोंड्यात भंडारी समाजाचा स्नेह मेळावा आयोजित करून  रवींनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे
खरी कुजबुज: विधानसभेतील महिला आमदार

मडगावात प्रतीक्षा ‘संडे डायलॅाग’ची

गोवा फॅारवर्डचे विजय सरदेसाई यांचे ‘संडे डायलॅाग’ सध्या बरेच चर्चेत आहेत. रविवारी कुडचडे येथे पार पडलेला ‘संडे डायलॅाग’ केवळ कॉंग्रेसच नव्हे तर भाजपासाठीही अडचणीचा ठरला आहे. काहींना तर हा कार्यक्रम ‘इंडिया’त विसंवाद घडविणार असल्याचे वाटू लागलं आहे. पण, विजय यांनी ज्या मडगाव मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे, तिथे कधी हा ‘डायलॅाग’ होणार अशी प्रतीक्षा अनेकजण करत आहेत. त्यात जसे कॉंग्रेसवाले आहेत, तसेच भाजपासमर्थकही आहेत. आता हे भाजपवाले बाबांची तळी उचलून धरणारे खात्रीनेच नसणार, तर मूळ भाजपवाले म्हणवून घेणारे आहेत, हे ओघानेच आले. गेल्या वर्ष दीड वर्षात असे अनेकजण कमळापासून अंतर राखून आहेत, हे भाजप नेतृत्वालाही चांगलेच माहीत आहे. त्यामुळे मडगावात हा ‘डायलॅाग’ झाला तर राजकारणात उलथापालथ होईल, असे अनेकजण म्हणू लागलेत व म्हणूनच ते या ‘डायलॅाग’ची प्रतीक्षा करताहेत. पण बाबा मात्र नेहमीप्रमाणे निश्‍चिंत आहेत, हेही तेवढेच खरे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: फोंड्यात भंडारी समाजाचा स्नेह मेळावा आयोजित करून  रवींनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे
खरी कुजबुज: मुख्‍यमंत्र्यांना प्रेमाचे भरते?

सुदिनरावांची माणुसकी

बऱ्याचदा उच्च पदावर पोहचल्यानंतर बऱ्याच जणांना वास्तवाचे भान राहत नाही. व्यग्रतेमुळे होते असे कधी कधी...! पण वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यग्र जीवनातही माणुसकीचे दर्शन घडवले. वीज कर्मचाऱ्यांचा मोठा कार्यक्रम फोंड्यात होता, सुदिन ढवळीकर घरातून निघाले खरे, पण काही अंतरावर गेल्यानंतर त्यांच्यासमोरच एका दुचाकीला अपघात झाला. जखमीला वेळेत वैद्यकीय मदत मिळणे आवश्‍यक होते. सुदिनरावांनी, जखमीला गाडीत घालून थेट फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात नेले. जखमीला ॲडमीट करूनच सुदिनराव कार्यक्रमाला गेले अन् वेळेवर पोचले. गाडीत सीटवर रक्ताचा सडा पडलेला होता, पण सुदिनरावांच्या चेहऱ्यावर होते समाधान... ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com