

पणजी: तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ सणामुळे राज्यात सध्या मोठी लगबग आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. वर्षातील सर्वांत आनंददायी सणांपैकी एक असलेल्या नाताळच्या स्वागतासाठी गोमंतकीय सज्ज झाले आहे. शहरांपासून गावांपर्यंत सर्वत्र चैतन्य पसरले असून रस्ते, चर्च परिसर, घरे आणि बाजारपेठा आकर्षक सजावटीने उजळून निघाल्या आहेत.
घरोघरी नाताळच्या तयारीला वेग आला असून साफसफाई, रंगरंगोटी आणि सजावटीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. अनेक घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने नाताळचे तारे (स्टार), कंदील, विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांच्या सजावटी केल्या जात आहेत.
काही ठिकाणी तर अंगणात मोठे ख्रिसमस ट्री उभारण्यात आले असून त्यावर रंगीबेरंगी दिवे, शोभेच्या वस्तू आणि सजावटीचे खेळणी लावले जात आहेत. मुलांमध्ये विशेष उत्साह असून सांताक्लॉजच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही नाताळचा काळ गोव्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.
देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल होत असून हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे जवळपास भरलेले आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर विशेष कार्यक्रम, संगीत मैफिली आणि सणानिमित्त आयोजित उपक्रमांमुळे पर्यटकांमध्येही उत्साह आहे. एकूणच, नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले असून हा सण शांतता, प्रेम आणि एकतेचा संदेश देत सर्वांना एकत्र आणत आहे. आगामी तीन दिवसांत हा उत्सव अधिकच रंगत जाणार असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.
दरम्यान, बाजारपेठांमध्येही प्रचंड वर्दळ दिसून येत आहे. नाताळसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. केक, मिठाया, ड्रायफ्रूट्स, सजावटीच्या वस्तू, कपडे, खेळणी आणि भेटवस्तूंच्या दुकानांत खरेदीदारांची गर्दी वाढली आहे. विशेषतः पारंपरिक नाताळ केक, कुकीज आणि मिठायांना मोठी मागणी असून बेकरी आणि घरगुती उद्योजकांकडे ऑर्डर्सचा ओघ वाढला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून या काळात व्यवसायाला चांगली चालना मिळत असल्याचे ते सांगतात.
चर्चमध्येही नाताळपूर्व तयारी जोमात सुरू आहे. चर्च परिसराची स्वच्छता, रंगसंगती आणि विद्युत रोषणाई करण्यात आली असून येशू ख्रिस्ताच्या जन्माचे दृश्य साकारणारी ‘क्रिब’ (जन्मदृश्य) उभारण्याचे काम अनेक ठिकाणी पूर्ण झाले आहे.
नाताळच्या पूर्वसंध्येला आणि मुख्य दिवशी होणाऱ्या मध्यरात्रीच्या प्रार्थना (मिडनाईट मास) आणि विशेष धार्मिक विधींसाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी चर्च प्रशासनाकडून आवश्यक त्या सोयीसुविधांची तयारी केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.