म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी 'सावळ' यांची लवकरच बदली

म्हापशाचे आमदार प्रयत्नशील असल्याचा बोलबाला
MAPUSA MUNICIPAL COUNCIL
MAPUSA MUNICIPAL COUNCILDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांचे पुत्र असलेले म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी दीपेश ऊर्फ सीताराम सावळ हे सध्या स्थानिक आमदार ज्योशुआ डिसोझा तसेच पालिकेवर सत्तारूढ असलेल्या भाजपपुरस्कृत मंडळाला भलतेच पुरून उरलेले आहेत. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने मुख्याधिकारी सावळ नेहमीच नियमांवर बोट ठेवून संबंधितांवर यथायोग्य कारवाई करीत असल्याने त्याचा धसका सध्या सत्ताधारी गटाने घेतलेला आहे. त्यामुळे त्यांची अन्यत्र बदली करून स्वत:च्या मर्जीतील अधिकाऱ्याची त्या ठिकाणी वर्णी लागावी यासाठी म्हापशाचे आमदार प्रयत्नशील असल्याचा बोलबाला सध्या म्हापशात आहे. कायदेशीर नियमांचे परिपालन करून सावळ यांनी हल्लीच्या काळात पालिका कामकाजाच्या बाबतीत काही धाडसी निर्णय घेतलेले आहेत, परंतु ते निर्णय सत्ताधारी भाजप गोटातील नगरसेवकांना रुचलेले नाहीत. त्यामुळे लवकरच सावळ यांच्या बदलीचा आदेश जारी होणार असल्याचेही ऐकिवात आहे.

MAPUSA MUNICIPAL COUNCIL
गोव्यात कंत्राटी परिचारिकांची सेवा खंडित

दोतोर बनले आक्रमक!

‘सिधी उंगली से घी नहीं निकलता है, तो उंगली टेडी करनी पडती है’ अशी हिंदीत एक म्हण आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मऊ मिळमिळीत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यात बाणेदारपणा नाही, अशी टीका दोतोर प्रमोद सावंत यांच्यावर राजदीप सरदेसाईपासून अनेकांनी केली होती. गेल्यावेळी दोतोर सावंत यांनी ‘भिवपाची गरज ना’ हे घोषवाक्य दिले होते. मात्र, ‘लो प्रोफाईल’ राहून राज्य कारभार हाकला. या नव्या इनिंगमध्ये मात्र दोतोर बरेच ‘अग्रेसीव’ झाले आहेत. पोर्तुगीजांनी पाडलेली मंदिरे उभी करणार व राज्यात धर्म परिवर्तन खपवून घेणार नाही अशी गर्जना मुख्यमंत्र्यांनी करून आपल्या आक्रमकतेची धमक दाखवली आहे. दोतोर प्रमोद यांनी प्रो हिंदू नीती स्पष्ट करून आपल्या भविष्यातील नीतीचे सरळ संकेत दिले आहेत. ∙∙∙

शुभेच्छा की लांगुलचालन?

सर्व धर्म समभाव ही खरी काँग्रेस पक्षाची मूलधारा. मात्र, या पक्षाच्यावतीने फोंडा तालुक्यातील एका मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या एका उमेदवाराला त्याची माहिती आहे का हा प्रश्न पडावा असे त्यांचे शुभेच्छा फलक पाहिले तर वाटते. या उमेदवाराने तालुक्यातील लोकांना मोहरमच्या शुभेच्छा दिल्या. ईस्टरच्याही दिल्या. मात्र, हनुमान जन्मोत्सव आणि रामनवमीच्या शुभेच्छा देण्यास ते विसरले. त्यामुळे फोंड्यात हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. कदाचित फोंड्यात हिंदुत्ववादी समर्थक जास्त असल्याने त्या उमेदवाराने ही वेगळी वाट चोखाळली तर नाही ना? ∙∙∙

अण्णांनंतर कोण?

व्ही. एम. प्रभुदेसाई नुकतेच गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक म्हणून निवृत्त झाले. क्रीडा क्षेत्रातील लोक त्यांना ‘अण्णा’ म्हणून ओळखत. आता अण्णांच्या जागी कोण याची उत्सुकता या खात्यातील कर्मचाऱ्यांना लागली आहे. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनाही आता चांगला अधिकारी पाहिजे. गावडे यांनी क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मनाची पक्की तयारी केली आहे. त्यासाठी त्यांना या क्षेत्रातील सखोल ज्ञान असलेला अधिकारीही लागणारच. पर्रीकरांसोबत काम करणाऱ्या अण्णांना आता पर्याय कोण, अशी चर्चा रंगू लागली आहे. आपल्याला संधी मिळणार, असे एक दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटूही लागले आहे. त्यामुळे हे अधिकारी मंत्र्यांशी जवळीक साधू लागले आहेत. मात्र, नव्या क्रीडामंत्र्यांच्या मनात काय आहे देव जाणे... ∙∙∙

राजेश वेरेकरांची समाजसेवा

आगामी विधानसभा निवडणुकीला पाच वर्षे काळ असला, तरी फोंड्यात काहीजणांनी आतापासूनच समाजसेवेला सुरवात केली आहे. काहींनी आपली अपुरी राहिलेली समाजसेवा नव्याने पुनर्जिवित करायला सुरवात केली आहे. फोंड्याचे काँग्रेसचे उमेदवार राजेश वेरेकर हे यापैकीच एक. या निवडणुकीत त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाल्यामुळे त्यांनी आशा सोडलेली नाही असेच वाटते. नुकतेच त्यांनी फोंड्याच्या कुर्टी पंचायतीतील बाबल्या खळीत निवडणुकीपूर्वी वचन दिल्याप्रमाणे संरक्षक भिंत बांधायला सुरवात केली आहे. बाबल्या खळी हा प्रामुख्याने मुस्लिम बहुल भाग असल्यामुळे तो भाग काँग्रेसची ‘व्होट बॅंक’ म्हणून गणला जातो. आता ही ‘व्होट बॅंक’ सुरक्षित ठेवण्याकरिता का वाढविण्याकरिता राजेशने ही समाजसेवा सुरू केली आहे. यावर सध्या फोंड्यात चर्चा सुरू असून त्यावर मल्‍लीनाथीही केली जात आहे. आता बघूया राजेशांची ही समाजसेवा त्यांना काय फळ देते ती. अर्थात हे समजायला आणखी पाच वर्षे थांबावे लागणार आहे हे मात्र खरे. ∙∙∙

लोकसभेसाठी कॅप्टन

काँग्रेसचे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी जरी आपला दावा सोडला नसला तरी यावेळी पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते कॅप्टन विरीयातो फर्नांडिस यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे नक्की केले आहे. नवीन आणि आक्रमक चेहरा काँग्रेस त्यांच्या रूपाने पुढे आणू पाहात आहे. या कॅप्टनना यावेळी काँग्रेसने दाबोळी मतदारसंघात उमेदवारी दिली होती. त्यांनी तिथे चमकदार कामगिरी करून दाखविताना दुसरा क्रमांक प्राप्त केला. या कॅप्टनच्या एंट्रीमुळे आपमधून काँग्रेस पक्षात सामील झालेल्या एल्विस गोम्स यांची व्हिकेट गेल्यात जमा झाली आहे. ∙∙∙

उत्तर गोव्याची खासदारकी

उत्तर गोव्यात आता सहाव्यांदा म्हणे भाजपचे श्रीपाद नाईक लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. वास्तविक श्रीपाद नाईक हे मूळचे दक्षिण गोव्याचे, पण उत्तरेतील लोकांनी त्यांना स्वीकारले. तब्बल पाचवेळा त्यांच्यावर विश्‍वासही ठेवला. मात्र, मागच्या वर्षी जुलै महिन्यात आलेल्या महापुरावेळी श्रीपाद नाईक हे पूरग्रस्त भागात पोचू शकले नाहीत. केवळ जुजबी भेट देऊन श्रीपाद नाईक यांनी फॉर्मेलिटी केली, पण खरे म्हणजे ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले, त्यांच्यावर आपत्ती आली असेल तर प्रत्येक पूरग्रस्त भागात त्यांनी जायला नको होते का, पण भाऊंना वेळ नव्हता. जाऊ दे. आता सहाव्यांदा भाऊ मतांसाठी उत्तर गोव्यात जाणार आहेत, त्यामुळे लोकांच्या समस्यांविषयीच्या अशा गोष्टी ध्यानात ठेवा म्हणजे झाले, लोकच बोलतात हे...! ∙∙∙

बाणावलीतील अशांतता

सासष्टीतील बाणावली हा एक वेगळ्या मानसिकतेचा भाग आहे. तेथील रहिवासी नेहमीच भयगंडावस्थेत असतात व त्यामुळेच एक पर्यटन समृध्द भाग असूनही तेथे पर्यटनासाठीच्या अत्यावश्यक सुविधा उभ्या ठाकू शकलेल्या नाहीत. याच मानसिकतेतून त्या भागातून जात असलेला पश्चिम बगलरस्ता रखडला आहे व आता कोलवा मलनिस्सारण प्रकल्पाची तीच गत होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण साधे आहे. त्या प्रकल्पाचे प्रक्रिया केलेले सांडपाणी साळ नदीत सोडले, तर ती प्रदूषित होईल असा दावा ते करत आहेत. याचाच अर्थ त्यांना नवे काहीच नको असा होतो. यावर सरकार तरी काही उपाय काढू शकेल का?∙∙∙

MAPUSA MUNICIPAL COUNCIL
‘गोव्यातील वीज कमतरतेमुळे उद्योजकांची पाठ’

काणकोण भाजपात आतले-बाहेरचे!

काणकोण भाजपात सध्या बाहेरचे म्हणजे अन्य पक्षांचे समर्थक असा वाद सुरू झाला आहे. मुळात हा वाद सुरू करण्यास पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी जबाबदार आहेत. सध्याचे सभापती रमेश तवडकर यांना डावलून २०१७ साली माजी मंत्री विजय पै खोत यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवारी दाखल करून तवडकर यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला हरविले. हे शल्य आजही पै खोत यांच्या मूळ भाजप कार्यकर्त्यांना आहे. एवढ्यावरच भाजपचा राजकीय सोस थांबला नाही, तर एका रात्रीत काँग्रेसच्या आमदारांना भाजपवासीय करून भाजपचा कार्यक्रम राबविण्यास भाग पाडले. मात्र, तेच या कॉंग्रेसचे भाजपवासीय झाले होते त्यांना न घरका न घाटका अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची चर्चा आहे. ∙∙∙

खेळ समजून घेताना

क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्यातील क्रीडा प्रकल्पांच्या तयारीचा आढावा घेतला. क्रीडा खात्यातील काही अडचणीही समजून घेतल्या. काही अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना गेल्या पाच वर्षांत काय काय झाले हे सांगितले म्हणे... त्यामुळे गत क्रीडामंत्र्यांनी या खात्याची कुठपर्यंत ‘प्रगती’ केली याची जाणीवही विद्यमान मंत्र्यांना झाली. त्यामुळेच की काय, खात्यात आमुलाग्र बदल झाल्याशिवाय खेळ व खेळाडूंना न्याय मिळणार नाही, असे त्यांना वाटू लागले. ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना आता मैदानात उतरून काम करावे लागेल. खेळाडूंप्रमाणेच अधिकाऱ्यांनीही निष्ठेने काम करा, असा सल्लाही आज मंत्री महोदयांनी दिला. ∙∙∙

गोवा डेअरीची धोक्याची घंटा!

‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या धोरणावर सुरू झालेले सहकार क्षेत्र सहकारातून स्वाहाकाराकडे गेल्याने राज्यातील मोठमोठ्या संस्था डबघाईस आल्या. मडगाव अर्बन, म्हापसा अर्बननंतर आता गोवा डेअरी ही त्याच मार्गाने जाते काय? असा प्रश्न पडायला लागला आहे. राज्यातील दूध उत्पादक आता समूलला दूध घालायला लागला आहे. गोवा डेअरी योग्य भाव देत नाही म्हणून दूध उत्पादक समूलकडे वळले आहेत. आता म्हणे समूल गोव्यात प्रकल्प उभा करीत आहे. समूलचा दूध प्रकल्प गोवा डेअरीच्या मुळावर आला नाही म्हणजे मिळवले. शिरोडकर साहेब गोविंदाने घातलेला गोंधळ निस्तरा अन्यथा ‘चिडीया चुग गयी खेत अब पछतावे काहे’ म्हणण्याची पाळी येणार आहे. ∙∙∙

शॅडो कौन्सिलची सक्रियता

मडगावातील विशेषतः नगरपालिकेशी संबंधित विविध प्रश्नाप्रती शॅडो कौन्सिल भलतेच सक्रिय असते. त्याने केलेल्या तक्रारींची संबंधित यंत्रणांनी दखल घेतलेली नसली, तरी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने ती घेतली. त्यामुळे मडगाव पालिकेला आपल्या निविदासुध्दा मागे घ्याव्या लागलेल्या आहेत. पालिकेच्या दारोदार कचरा संकलनाचे असेच आहे. त्यातील गैरप्रकाराबाबत तर रान उठविले गेले आहे, पण त्याचे कोणालाच काही पडून गेलेले दिसत नाही. ∙∙∙

म्हापशातील ‘शॅडो कौन्सिल’ निद्रावस्थेत!

म्हापसा पालिका मंडळावर भाजप नगरसेवकांची सत्ता स्थापित झाल्यानंतर त्या पालिका क्षेत्रात होणाऱ्या अनागोंदी कारभाराबाबत तसेच पालिकेच्या कार्यपद्धतीवर वचक ठेवण्यासाठी संजय बर्डे यांच्या नेतृत्वाखाली शॅडो कौन्सिलची निवड करण्यात आली होती. त्या समितीवर म्हापशातील सामाजिक क्रियाशील कार्यकर्ता सुदेश तिवरेकर हेदेखील अग्रक्रमाने कार्यरत आहेत, परंतु त्या काउंसिलच्या स्थापनेवेळी म्हापसा पालिकेच्या अनागोंदी कारभाराबाबत आक्रमकतेने आवाज उठवल्यानंतर गेल्या सुमारे वर्षभरात ही संघटना निद्रावस्थेत असल्याचा बोलबाला सध्या म्हापशात आहे. त्या संघटनेत विविध राजकीय पक्षांतील स्थानिक नेत्यांचा समावेश असून त्या पदाधिकाऱ्यांची तोंडे विविध दिशांनी असल्यानेच त्या संघटनेचे कार्य मंदावले असल्याची चर्चाही ऐकावयास मिळते. ∙∙∙

युरीबाब कचरा प्रकल्पाची पाहणी कधी?

कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार युरी यांनी सध्या मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. युरीबाब सध्या मतदारसंघ फिरून अडकून राहिलेल्या व अपूर्ण असलेल्या विकासकामाचा व ज्या प्रकल्पाची दुर्दशा झाली आहे त्याची पाहणी करून अभ्यास करण्यात मग्न आहेत. मात्र, आमदार महाशयांना कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण व कचरा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी वेळ कधी मिळणार? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. युरीबाब आधी लगीन कोंडाण्याचे समजलात... ∙∙∙

आयटीआयसाठी पुन्हा प्रयत्न

काणकोणमधील राजकारणाने कूस बदलल्यानंतर तेथे आयटीआय आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत, पण अजून त्याने जोर पकडलेला नसला, तरी त्याला पंचायत निवडणुकीनंतर वेग येईल असे संकेत मिळतात. सहा सात वर्षांपूर्वी या प्रस्तावाला जो विरोध होता तसा तो आता राहिलेला नाही. त्या मागील कारणे अनेक आहेत, पण बदललेले राजकारण हे एक प्रमुख आहे. सरकारनेही दक्षिण गोव्यात सांगे वा काणकोण येथे हा प्रतिष्ठेचा प्रकल्प उभा करावयाचाच असा निर्धार केला आहे. ∙∙∙

MAPUSA MUNICIPAL COUNCIL
गोव्यात अतिरिक्त 'वीज' दर देण्यास उद्योजकांची मान्यता

सोनसोडोची साडेसाती

सोनसोडो ही मडगावसाठी साडेसाती ठरलेली आहे. एरवी साडेसाती ही साडेसात वर्षे रहाते असे म्हणतात, पण मडगावची ही साडेसाती गेली पन्नास वर्षे तशीच आहे. ही समस्या सोडविण्यासाठी या काळात प्रचंड खर्च केला गेला, पण समस्या सुटली तर नाहीच. ती अधिक बिकट झालेली आहे. तेथील प्रकल्प गेली दोन वर्षे बंद आहे व कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. सर्व यंत्रणांसाठीचे ते एक आव्हान आहे. या नव्या सरकारला तरी हे सोनसोडो सफाईचे आव्हान पेलेल का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com