साखळी: भारत देश हा आज सर्व क्षेत्रांमध्ये प्रगत व बलशाली होत चालला असताना या देशाला बाहेरील देशांकडून कोणाताही धोका नाही. कारण आमचे सर्व सैन्यदल सक्षम आहेत. परंतु आज देशाला अंतर्गत शक्तींकडून जास्त धोका आहे. जे आज या देशात राज्य, प्रांत, धर्म, जाती, भाषा या मुद्द्यांवर विभाजन करू पाहत आहे. या कारस्थानांना बळी न पडता या देशाचा संघटितपणा राखण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी येथे गोवा राज्य क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ब्रिटिशांच्या तावडीतून भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशात विविध संस्थानांचे राज्य चालत होते. या सर्व राज्यांचा खालसा करून एक अखंड भारत देश करण्याचे मोठे कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. व खऱ्या अर्थाने देशाला संघटित करण्याचे काम केले. परंतु गोवा त्याचवेळी स्वतंत्र झाला नाही. काही राजकीय शक्तींच्या नाकार्तेपणामुळे गोव्याची मुक्ती ही तब्बल चौदा वर्षे लांबली.
देश स्वतंत्र झाला तरीही जम्मू काश्मीर हे एका वेगळ्या राष्ट्राप्रमाणे वावरत होते. तेथे वेगळा झेंडा, वेगळे संविधान होते. तर त्यांचा मुख्यमंत्री हा तेथील पंतप्रधान म्हणून वावरत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या २०१९ साली जम्मू काश्मीरला भारताचा भाग बनवला. तरीही काश्मीरचा एका भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात आहे. तोही भारतात येणे आवश्यक आहे,असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते बावटा दाखवून या एकता दौडला साखळीच्या रवींद्र भवन येथून सुरूवात करण्यात आली. ती साखळी बसस्थानकापर्यंत गेली. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही विद्यार्थ्यांबरोबर बसस्थानकापर्यंत दौड लावली. बसस्थानकावर या दौडची सांगता झाली.
गोव्यातुल हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन बांधव हे एक असून एकत्रितपणे नांदत आहेत. हेच दर्शवणारी हि एकता दौड आहे. गोव्यातील लोकांमध्येही संघटीतपणाची भावना निर्माण करण्यासाठी गोव्यातील सर्व भागांमधून सर्व प्रकारच्या लोकांचा या ‘एकता दौड’मध्ये सहभाग आहे. यावरूनच गोव्याची एकता अबाधित असल्याचा संदेश मिळतो, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.