CM Pramod Sawant: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्लीत थडकले आणि गोव्यात राजकीय चर्चांना उधाण आले. सभापती रमेश तवडकर यांनी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावर आरोपांची सरबत्ती केल्याच्या काही तासांतच मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात पडसाद उमटणे स्वाभाविक होते.
दिल्लीत पोचल्यावर मुख्यमंत्र्यांना झालेला घोळ लक्षात आला आणि त्यांनी आपण केवळ राजकीय बैठकीसाठी दिल्लीत आल्याची माहिती ‘गोमन्तक’ला दिली. मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा निश्चितपणे पूर्वनियोजित नव्हता.
त्यांना दुपारी भाजपच्या दिल्ली मुख्यालयातून लोकसभा निवडणूक उमेदवारांविषयी चर्चा करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचा निरोप मिळाला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे संसदेत होते.
मुख्यमंत्री दिल्लीला पोचले आणि तानावडे गोव्यात येण्यास निघाले होते. त्यांची विमानतळावरच चुकामूक झाली. त्यामुळे शुक्रवारी रात्री झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्री उपस्थित राहिले. त्यांनी सांगितले की, ही संघटनात्मक बैठक होती. त्यातील तपशील हा सार्वजनिक करण्यासाठी नाही.
उत्तर व दक्षिण गोवा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ मताधिक्याने जिंकायचे आहेत. त्यामुळे उमेदवारीसह अनेक बाबींचा आढावा बैठकीत घेण्यात आला. संघटनात्मक पातळीवर केंद्रीय पातळीवरून तयारीविषयी माहिती घेण्याची व्यवस्था आहे. त्याचा राजकीय अर्थ या बैठकांत लावण्यात आला.
राज्यपालांचा दौरा पूर्वनियोजित
मुख्यमंत्री दिल्लीत पोचण्यापूर्वी काही मिनिटे आधी राज्यपाल दिल्लीत पोचले होते. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. केरळमधील एका कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांना निमंत्रित करण्यासाठी राज्यपाल दिल्लीत पोचले होते. त्यांनी धनकड यांची भेटही घेतली. राज्यपाल उद्या (शनिवारी) सकाळी केरळला जाणार असून तेथून रविवारी गोव्यात पोचणार आहेत.
अन् अनेकांच्या भुवया उंचावल्या
मुख्यमंत्री आणि राज्यपाल दिल्लीत पोचल्याने साहजिकच राजकीय वर्तुळातील लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मात्र, मुख्यमंत्री हे पक्षाच्या कामासाठी, तर राज्यपाल पूर्वनियोजित उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेल्याची माहिती रात्री मिळाल्यावर गोेव्यातील राजकीय चर्चेचा जोर ओसरला. मुख्यमंत्री शनिवारी सकाळी गोव्यात पोचणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.