
आयकरात १२ लाख रुपयांपर्यंतची सूट ही तरतूद स्वागतार्ह असली तरी बाकी बाबतीत निराशाच दिसते. गृहनिर्माण क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही. गोव्यासाठीही काही दिलेले नाही. ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य असाच आहे असे म्हणावे लागेल.
- दत्ता दामोदर नायक, उद्योजक
मध्यम आणि निम्न उत्पन्न वर्गातील लोकांसाठी १२ लाख रुपयांपर्यंतची आयकर सूट ही या अर्थसंकल्पातील खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. करदात्यांच्या हातात अधिक पैसे येतील. परिणामी खर्च, बचत आणि गुंतवणूक वाढेल.
- डॉ. संजय देसाई,
(प्राचार्य-दामोदर वाणिज्य महाविद्यालय)
देशाच्या अर्थव्यवस्थेचा मध्यमवर्गीय हाच महत्त्वाचा घटक आहे. पण त्यालाच डावलले आहे. गोव्यात नोकरीसाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. प्रामाणिक महिला अधिकाऱ्यांची कदर केली जात नाही. पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांची बदली हे त्याचेच उदाहरण.
कॅ. विरियातो फर्नांडिस, खासदार
हा अर्थसंकल्प अर्थहीन आहे. नवी दिल्लीत होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. केवळ धूर व आरशाचा हा खेळ आहे. आरोग्य, शिक्षण, वाहतूक, कृषी व आयटी ही क्षेत्रे महत्त्वाची असताना त्यांना न्याय दिलेला नाही. या क्षेत्रांचे महत्त्वच नाहीसे करून टाकले आहे.
- व्हेंझी व्हिएगस, (आमदार-बाणावली)
या अर्थसंकल्पाने सर्वांचीच निराशा केली आहे. गोवा हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असूनही काहीच दिलेले नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मेट्रोबाबत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? म्हादईप्रश्नी गोव्याला अतिरिक्त निधी हवा.
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
करमुक्त उत्पन्न मर्यादा १२ लाखांपर्यंत वाढवल्याने करदात्यांना दिलासा मिळेल आणि खर्चाला चालना मिळेल. कृषी कर्जवाढ, विमा क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवणे, औषधांवरील सीमाशुल्क सूट या बाबी महत्त्वपूर्ण आहेत.
- प्रा. डॉ. शेखर सावंत (बोरी)
गुंतवणुकीसह कृषी, लघु उद्योग आणि अन्नप्रक्रिया यांसारख्या कामगारकेंद्रित क्षेत्रांना चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. १२ लाखांपर्यंत करात सवलत देण्यात आली आहे, त्यामुळे मध्यमवर्गीयांना उभारी मिळेल. टीडीएस आणि लघुद्योगांना चालना देण्यासंबंधीच्या सूचना गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने केल्या होत्या, त्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वीकारल्याचा आनंद आहे.
- श्रीनिवास धेंपे (अध्यक्ष-गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री)
हा अर्थसंकल्प गोव्यासाठी लाभदायक आहे. आस्थापनांच्या भाड्याची टीडीएस मर्यादा ६ लाखांपर्यंत वाढवल्याने ज्यांनी खोल्या किंवा इतर आस्थापने भाड्याने दिली आहेत, अशा गोमंतकीयांना लाभ होणार आहे. भांडवली प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्ज, शेतकरी आणि मच्छीमारांसाठी सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गोव्यासाठी आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळेल.
- संजय आमोणकर, (महासंचालक, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स)
लहान उद्योजक, पर्यटन, जहाज, कृषीला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. १२ लाखापर्यंतच्या मिळकतीवर करमाफ ही घटना अनपेक्षित आनंदाचा धक्का देणारी आहे. . युवकांनी लघुद्योग सुरू केल्यास त्यांना याचा लाभ होईल.
- प्रतिमा धोंड,
(उपाध्यक्षा-गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री)
आजच्या देशाच्या अर्थकारणाची नाडी सरकारला चांगल्या प्रकारे समजली असल्याने सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. तो भारतीय अर्थकारणाला उभारी देणारा, जागतिक स्तरावर अर्थकारणाला मजबुती देणारा ठरणार आहे.
- मिलिंद शिरोडकर (अध्यक्ष-आयसीए गोवा)
गोव्याच्या अनुषंगाने विचार केल्यास अर्थकारणासाठी हा महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. कृषी उत्पादन वाढविण्यासाठी राज्याने या संधीचा लाभ करून घेणे गरेजेच आहे. आरोग्य, शिक्षणाच्या अनुषंगाने तरतूद करण्यात आली आहे. करात सवलत देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होईल, गुंतवणूक वाढेल, रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
- मांगिरीश पै रायकर, अर्थतज्ज्ञ
हा अर्थसंकल्प शेती, लघू आणि मध्यम उद्योग, गुंतवणूक आणि निर्यात या चार स्तंभांवर केंद्रित आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या वर्गीकरणातील बदल या क्षेत्राची वाढ होण्यास मदत करेल. शिक्षणासाठी ५०० कोटी रुपयांची विशेष तरतूद, एआयसाठी उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणे, लहान आणि मध्यम उद्योगांसाठी निर्यात प्रोत्साहन परिषद, २ टियर शहरांमध्ये ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर स्थापन करण्यासाठी आराखडा हे प्रस्तावित उपक्रम देखील कौतुकास्पद आहेत.
- डॉ. सागर साळगावकर (सहअध्यक्ष-असोचॅम गोवा)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.