

गोव्यात सगळीकडे काल शनिवारपासून कार्निव्हल सुरू झाला असून मडगाव येथे त्यानिमित्ताने रविवारी चित्ररथ मिरवणूक होणार आहे. पूर्वी मडगाव पालिकेवर विजय व दिगंबर या दोघांचे राज्य असताना विजयने हा कार्निव्हल आपल्या फातोर्डात नेला होता. मात्र दिगंबर कामत भाजपात आल्यानंतर ही चित्ररथ मिरवणूक पुन्हा मडगावात आली. तरीही विजय मागे हटलेले नाहीत. विजयरावांनी काल आपल्या ‘व्ही फॉर फातोर्डा’ या संघटनेमार्फत शनिवारी फातोर्डात हा उत्सव साजरा केला. एक दिवस आधी हा उत्सव साजरा करून एका अर्थाने त्यांनी बाजीही मारली असेच म्हणावे लागेल ना! ∙∙∙
सरकारने मोठ्या थाटात आदेश काढला सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी गळ्यात ओळखपत्र घालणे बंधनकारक!. फाईल फिरली, शिक्कामोर्तबही झाले. पण काही कार्यालयांत मात्र ओळखपत्र अजूनही ड्रॉवरमध्येच विश्रांती घेताना दिसते म्हणे! एवढंच काय, पणजीतील आझाद मैदानाजवळच्या काही कार्यालयातील कर्मचारी तर दुपारच्या सुमारास ‘फिल्ड व्हिजिट’वरच असतात अशी चर्चा. मात्र फिल्ड म्हणजे फाईल नव्हे, तर थेट आझाद मैदान! कुणी सावलीत गप्पा, कुणी चहा, तर कुणी मोबाईलवर ‘महत्वाच्या’ चर्चेत व्यस्त. गमतीची बाब म्हणजे, काहीजणांच्या गळ्यात ओळखपत्र लटकत असल्यामुळेच लोकांना हे लक्षात आले. यामुळे आता सरकारी कर्मचारी कामचुकार असतात, अशी जुनी समजूत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र सगळ्यांनाच एकाच मापात मोजणे योग्य आहे का? हा प्रश्नही काहीजण विचारतात. तरीही आझाद मैदानाची ही ‘दुपारची शाखा’ चर्चेचा विषय ठरली आहे. ∙∙∙
तुये येथे सरकारने गोमेकॉ सलग्न इस्पितळ सुरु केले. पेडणेवासीयांची मागणी पूर्ण झाली म्हणून ते स्वस्थ बसलेले नाहीत. विशेषतः पेडणे तालुका नागरिक समितीने जागल्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी स्वेच्छेने काम करू इच्छिणाऱ्या नागरिकांची मदत घेत इस्पितळातील त्रुटी नजरेस आणणे सुरू केले आहे. कोणता डॉक्टर या आठवड्यात नसणार याची आगाऊ माहिती न देता तो डॉक्टर कामावर गैरहजर असण्यापासून इस्पितळातील स्वागत कक्ष कुलूपबंद असण्यापर्यंतच्या समस्या समितीने उघडकीस आणणे सुरू केले आहे. लोकप्रतिनिधींनी करावयाचे काम समिती करत आहे. राज्यभरातील नागरिकांनी असे वागणे सुरू केले तर गैरकारभाराला जागाच राहणार नाही असे बोलले जात आहे. ∙∙∙
‘व्हॅलेंटाईन-डे’ हा आपले दुसऱ्यांवर किती प्रेम आहे, हे प्रदर्शित करण्याचा दिवस. मग ते प्रेमप्रेमी युगुलांचे असो किंवा मुलांचे आणि पालकांचे असो. सेलिब्रिटी मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी या दिनानिमित्त आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात पेले यांना त्यांची मुलगीच थेट समुद्रकिनारी जाऊन व्हॅलेंटाईन सदिच्छा देताना दिसते. या ‘क्यूट’ अशा व्हिडिओला कित्येकांनी लाईक केलेले तुम्हाला दिसेल. निरागसरित्या आपल्या वडिलांबद्दल असणारे प्रेम कसे व्यक्त करता येते, हे पेलेच्या मुलीने दाखवून दिले आहे. ∙∙∙
घोगळ येथील मशिदीचे टाळे खोलून धार्मिक रीतीरिवाजासाठी ही मशीद खुली करावी, अशी मागणी आता या भागातील मुस्लीम धर्मीयांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडे केली आहे. दामूंच्या निवासस्थानी धाव घेऊन त्यांची मनधरणी केली आहे. गोवा हज समितीचे अध्यक्ष उर्फ़ान मुल्ला यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मशिदीच्या आवारात खुनाची घटना घडल्यानंतर प्रशासनाने मशिदीला टाळे ठोकले होते. यापूर्वी येथील मुस्लीम समुदायाने स्थानिक आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्याशीही शब्द टाकला होता. मात्र मशिदीवरील टाळे काही निघाले नाही. आता या भागातील लोकांना दामू हाच शेवटचा भरोसा असे वाटू लागले आहे. बघूया दामूबाब काय तोडगा काढतात ते. तूर्त ‘वेट अॅण्ड वॉच.’ ∙∙∙
पणजी महापालिका निवडणूक नेमकी होणार, हे अधिकृत जाहीर झालेले नाही. एका दिवसापूर्वीच महापालिकेतील प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले व पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात तसेच त्यांचे पुत्र रोहीत मोन्सेरात यांनी लगेच आपल्या तिसही प्रभागातील उमेदवारांची नावे जाहीर करुन टाकली. हा नेमका प्रकार काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवार निश्र्चित करण्यासाठी कमीत कमी चार ते पाच दिवस लागायला नको होते का? प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांना विश्र्वासात घ्यायला हवे होते. पण बाबूश यांनी अचूक पूर्वनियोजन केल्याप्रमाणे यादी जाहीर केली. पण विरोधक मात्र शांतच राहिले. आत्ता विरोधक किती? आणि ते कोणते उमेदवार देणार की नाही? याबाबत पणजीत भलतीच चर्चा सुरू आहे. ∙∙∙
माजी मंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्याने फोंड्यात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी रवींचे ज्येष्ठ सुपुत्र रितेश नाईक यांना संधी देण्याचा विचार सुरू केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या मनात सध्या तरी राजेश वेरेकरच आहेत. पण, अनेक वर्षे राहून मगोचा त्याग केलेले केतन भाटीकर काँग्रेसमध्ये येण्याबाबत चर्चा सुरू झाल्याने काँग्रेस नेमकी उमेदवारी कुणाला देणार? याकडे फोंडावासीयांचे लक्ष लागून आहे. गत विधानसभा निवडणुकीत रवींनी अवघ्या काहीच मतांनी भाटीकरांचा पराभव केलेला होता. त्यामुळेच विजयाच्या आशा पल्लवित झालेल्या भाटीकरांनी फोंडा पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. पण, आता काँग्रेस वेरेकरांना घेऊन पुढे जाणार की भाजपच्या पराभवासाठी भाटीकरांना मैदानात उतरवणार? हे पुढील काहीच दिवसांत दिसेल. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.