
डिचोली: यंदा काजू पीक काहीसे लांबणीवर पडले असले, तरी डिचोलीतील गावोगावी आता लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावोगावी दारुभट्ट्यांही पेटल्या असून, सर्वत्र दारु गाळणीचा व्यवसाय सुरू झाला आहे. दारुभट्ट्यांमुळे मजूरवर्गालाही रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यंदाच्या मोसमातील ‘हुर्राक’ही सर्वत्र उपलब्ध झाले आहे.
असंतुलित हवामानामुळे यंदा काजू पिकावर परिणाम होणार असे काहीसे चित्र सुरवातीला दिसून येत होते. मात्र आता काजूला अपेक्षेप्रमाणे नसला तरी समाधानकारक बहर आला आहे. त्यामुळे सुरवातीला आलेली मरगळ बाजूला सारून गावोगावी काजू बागायतदार व्यवसायात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
काजू हा डिचोलीतील बहुतांश भागातील एक प्रमुख व्यवसाय. तालुक्यातील गावोगावी काजूच्या बागायती आहेत. भूखंड विकसितच्या नावाखाली काही काजू बागायती नामशेष झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात आजही काजूची झाडे दिसून येतात. काजू पिकाच्या हंगामात तालुक्यातील सर्वण, मये, कारापूर, नार्वे, धुमासे, कुडचिरे, उसप आदी भागात दरवर्षी काजू बोंडूपासून दारू गाळणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असतो.
काजू बोंडूपासून सर्वत्र हुर्राक, फेणी गाळण्यात येते. डिचोलीतील दारू उत्पादकांनी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातून बोंडू आयात करण्याकडे लक्ष दिले आहे. स्थानिक बागायतींमधून उपलब्ध होणाऱ्या काजूसह महाराष्ट्रातील वझरे, माटणे, दोडामार्ग आदी भागातून काजू बोंडूंची आयात करण्यात येते. महाराष्ट्रात बोंडूंना तेवढा भाव नसतो.
सध्या सर्वत्र यंत्रांद्वारे काजू बोंडू मळणे आदी कामे करण्यात येत असली तरी दारूच्या भट्ट्यांवर कुशल मजुरांची आजही गरज लागते. दारुभट्टी पेटवली की दारु गाळणी प्रक्रियाकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज लागते. त्यामुळे प्रत्येक दारूभट्टीवर मेहनतीने काम करणाऱ्या मजुरांची आवश्यकता असते. काजू पीक हंगामात दरवर्षी राज्याबाहेरुन काही मजूर डिचोलीत येतात. तीन महिने या मजुरांना रोजगार मिळतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.