
वाळपई: सत्तरी तालुक्यात काजू पीक हे महत्त्वाचे आहे. सध्या बागायतदार वर्ग बोंडू गोळा करणे, बिया वेगळ्या करणे, बोंडू रसाचा रस काढणे अशा कामात व्यस्त आहे. सकाळी, दुपारी, सायंकाळी बागायतदार काम करताना दिसत आहेत.
पारंपरिक पद्धतीने बोंडूचा रस हा पायाने मळून काढला जातो. आता त्याचबरोबरच यंत्राद्वारेही रस काढला जातो. नंतर शिल्लक बोंडूचा चोथा हा दाब मशीनमध्ये घालून पूर्ण रस गाळला जातो. हा रस भाटीमध्ये मडकीत घालून अग्नीच्या साहाय्याने हुर्राक, फेणी काढली जाते. पूर्वी रस वाफविण्यासाठी पिंपांना पाईप जोडला जायचा. त्याजागी पाण्यासाठी सिमेंटची टाकी बांधली गेली आहे व त्या टाकीत पाणी घालून फेणी करण्याची प्रक्रिया केली जाते.
त्याचबरोबर यंत्राद्वारे देखील आता फेणी तयार करण्याची प्रक्रिया केली जाते. अधिक काजू उत्पन्न घेणारे काजू बागायतदार आधुनिक यंत्रणेचा वापर करतात. पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिकतेची जोडही लोकांनी अंगीकारली आहे. त्यामुळे फेणी व्यावसायिक उत्पादकांना लाभ मिळतो आहे. या यांत्रिकी मशीनने बोंडूंचा रस काढल्याने पूर्ण रसाचे गाळप होते. रसाची नासाडी होत नाही.
यंत्रातून रस निघाल्यानंतर बोंडूंचा शिल्लक चोथा पुन्हा यंत्रात घालून दाब दिला जातो. हा पूर्ण गाळलेला रस मडकीत घालून फेणी करण्याची प्रक्रिया केली जाते. काजू बागायतदार आपापल्या जागेत बोंडू रस काढून फेणी भट्टीवर (स्थानिक भाषेत आवार) आणून देतात. काहीजण केवळ बोंडू फळांची विक्री करतात. दररोज बागायतीत जाऊन बोंडू फळे गोळा करण्याची कामे नित्यनेमाने करत आहेत. काजू हे चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. पण मागील काही वर्षांत काजूबियांना १०० ते १३० रुपये या फरकाने दर मिळाला होता. यंदा मात्र दरात वाढ होऊन प्रतिकिलो १६२ रुपये दर काजूबियांना देण्यात आला आहे.
आमचा ओंकार कृषी यंत्रनिर्मिती उद्योग आहे. बागायती कामांसाठी मागणीनुसार विविध यंत्रे तयार केली जातात. काजू बोंडू रसाचे पूर्ण मळून चांगले गाळप होण्यासाठी बागायतदारांना आम्ही यंत्रे तयार करून देत आहोत. त्यामुळे बोंडू फळांचा पूर्णपणे रस निघतो. हे यंत्र खरेदीसाठी शेतकी खात्याचे अनुदानही बागायतदारांना मिळते आहे. लोकांना बोंडू रस कसा गाळप करायचा याचे प्रात्यक्षिकही दाखवितो.
संदीप केळकर, ब्रह्मकरमळी-सत्तरी
काजू बागायतीत आम्ही गेल्या अनेक दशकांपासून काम करत आहोत. त्यासाठी बरीच मेहनत, कष्ट घ्यावे लागतात. काजू हे लोकांचे प्रमुख उत्पन्न आहे. पूर्वी पायाने मळून रस काढला जायचा. आता यंत्रांद्वारे बोंडू फळांचा रस काढला जातो. शिल्लक राहिलेला गर पुन्हा यंत्रात घालून पूर्ण रस काढला जातो. यंत्रामुळे कामे सुटसुटीत झाली आहेत.
बारकेलो उस्तेकर, उस्ते-सत्तरी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.