

चावडी: काणकोण तालुक्यात चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर काणकोण पोलिसांनी तातडीने कारवाई करत २४ वर्षीय संशयिताला अटक केली. याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला काणकोण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी बजावली.
त्यामुळे पोलिसांना संशयिताचा ताबा मिळाला असून, त्याच्याकडून अधिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. १० नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान काणकोण येथील एका भाड्याच्या खोलीत ही घटना घडली. पीडित चिमुरडीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ६५(२), गोवा बालक कायद्यातील कलम ८(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) मधील कलम ४, ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी हुसेन (वय २४, मूळ रा. बहादूरपूर, दरभंगा, बिहार) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक थेरॉन डिसोझा आणि काणकोणचे उपअधीक्षक नीलेश राणे यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.
पीडित मुलीचा जबाब ठरणार महत्त्वपूर्ण
याप्रकरणी पीडित मुलीचा जबाब मडगाव येथील पीडित साहाय्यता कक्षाच्या सहकार्याने आवश्यक कायदेशीर प्रक्रियेनुसार नोंदविण्यात आला. तसेच दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. पीडित अल्पवयीन मुलीची ओळख उघड होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.