

मडगाव: काब द राम खोल येथील किनारपट्टीजवळ असलेल्या आणि पर्यावरणदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या टेकडीचा २०१२ पासून खुलेआम विध्वंस चालू असून यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यासह सीआरझेड प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी यांच्या लक्षात हा विध्वंस आणून देऊन सुद्धा मागची १३ वर्षे राज्य प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारीची भूमिका निभावल्याचे आता २०२५ मध्ये उघडकीस आलेल्या ‘केप गोवा’ रिसॉर्ट प्रकरणाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने अशी कुंभकर्णाची भूमिका घेण्यामागे कुणाचा स्वार्थ दडला होता. जेणेकरून या संबंधीच्या तक्रारीची गोव्याच्या पर्यावरण मंत्र्यांनीही दखल घेतली नाही. हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
सीआरझेड प्राधिकरणाच्या विकास प्रतिबंधित क्षेत्रात पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून केप गोवा हे रिसॉर्ट कसे बांधले गेले हे आता जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या पथकाच्या पाहणीतून उघड झाले आहे.
या पार्श्वभूमीवर या रिसॉर्टचा बेकायदेशीर विस्तार पाडण्यात यावा आणि ज्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले ती जागा पूर्वीच्या स्थितीत आणावी. एवढेच नव्हे तर पर्यावरणाची हानी केल्यामुळे केप गोवाच्या मालकांना दंडही ठोठावावा, यासाठी दक्षिण गोवा उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सीआरझेड प्राधिकरण या दोन्ही अधिकारिणींना पत्र लिहिले आहे.
त्यामुळे पुढील कारवाई काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मात्र या ठिकाणी फक्त एका केप गोवा हॉटेलनेच बेकायदेशीर विस्तार केलेला असे नव्हे तर याच पट्ट्यात एकूण सात अशी रिसॉर्टस् उभी आहेत. ज्यानी काब द रामच्या डोंगरकपारीचे काळीज फोडून आपले विस्तार केले आहेत.
पर्यावरणाबद्दल जागृती करणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कामत यांनी ‘दै. गोमन्तक’ला या परिसरातील वेगवेगळ्या काळातील गुगल इमेजिस उपलब्ध करून दिल्या असून त्यावरुन २०१२ पासून या विध्वंसाला सुरुवात झाल्याचे दिसून येते.
डिसेंबर २०१२ मध्ये जी इमेज आहे त्यात या टेकडीवर घनदाट झाडी दिसत असून फेब्रुवारी २०१३ मध्ये घेतलेल्या इमेजमध्ये या भागातील माडांचे शेंडे कापून टाकल्याचे दिसून येत आहे. एप्रिल २०१४ मधील इमेजमध्ये या परिसरात काही झोपड्या उभारल्याचे दिसून येत आहे, तर मार्च २०१५ च्या इमेजमध्ये झाडी कापून हॉटेलसाठी पायवाट तयार केल्याचे दिसते.
जानेवारी २०१६ मध्ये हॉटेल प्रकल्पाच्या चार मोठ्या शेडस् उभ्या झाल्याचे दिसत असून जानेवारी २०१७ च्या इमेजमध्ये हॉटेलच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू असलेले दिसत आहे. सप्टेंबर २०२० मध्ये या भागात हॉटेलचे भक्कम बांधकाम झालेले दिसून येते. तर डिसेंबर २०२५ मध्ये या जैवसंवेदनशील अशा टेकडीवर मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी झाल्याचे दिसून येत आहे.
(ही सर्व छायाचित्रे गोमंतककडे उपलब्ध आहेत) ज्या क्षेत्रात कुठलेही बांधकाम उभे करता येत नाही, तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे कशी उभी झाली आणि ही बांधकामे उभी होत असताना स्थानिक पंचायत, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी, सीआरझेड प्राधिकरण, पर्यावरण खात्याचे मंत्री आणि ओघानेच मुख्यमंत्री काय करीत होते हा प्रश्न उभा झाला आहे. काब द राम येथे झालेला हा बेकायदेशीर विस्तार म्हणजे सर्व संमतीच्या भ्रष्टाचारातून उभे केलेले पर्यावरणाचे थडगे असेच म्हणावे लागेल.
२०२१ साली या टेकडीवर मोठ्या प्रमाणावर माड कापून तसेच दगड फोडून किनाऱ्यावर जाण्यासाठी वाट केली जात आहे, हे लक्षात आल्यानंतर डॉ. नंदकुमार कामत यांनी दक्षिण गोव्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी रुचिका कटियाल यांच्याकडे तक्रार केली होती. शनिवार-रविवार असे प्रशासकीय सुटीचे दिवस असताना हे काम केले जात होते. काब द राम ही जागा मडगावपासून ३० कि.मी. अंतरावर असताना जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याची तसदी घेतली नाही. यामुळे कुणाचा तरी वरदहस्त असल्यामुळेच प्रशासनाने अशी सुस्त भूमिका घेतली होती अशी शंका घेण्यास भरपूर वाव आहे.
काब द राम किनाऱ्यावर जी टेकडी आहे आणि तिथे जी वनस्पती आहे त्या सर्वांचे एकूण वयोमान ९ कोटी वर्षांपेक्षा जास्त असल्याची माहिती डॉ. नंदकुमार कामत यांनी दिली. मात्र मागच्या दहा वर्षांत या सर्व जैवसंपदेची अक्षरश: कत्तल चालू असून यासंदर्भात संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार करूनही त्याकडे डोळेझाक केली गेली असे ते म्हणाले. माजी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याही लक्षात मी हा विध्वंस आणून दिला होता, पण त्यांनीही काही केले नाही असे डॉ. कामत यांनी सांगितले.
हडफडे येथे दुर्घटना झाल्यानंतर सीआरझेड प्राधिकरणाचे अध्यक्ष असलेले पर्यावरण खात्याचे सचिव अरुण कुमार मिश्रा यांचे नाव चर्चेत आले होते. बर्च नाईट क्लबचे पूर्ण बांधकाम धोकादायक असल्याचे सीआरझेड प्राधिकरणाच्या समितीने लेखी कळवूनही मिश्रा यांनी या क्लबवर कुठलीही कारवाई न करता हे प्रकरण तसेच भिजत ठेवले होते. २०२१ साली एका पत्रकाराने काब द राम येथे टेकडीवर हजारो माड कापून जो पर्यावरणाचा विध्वंस केला जात होता, त्यासंबंधी तत्कालीन मुख्य सचिव परिमल राय यांना सतर्क केले होते. राय यांनी ही माहिती कुमार यांना पाठवून यासंबंधीची खातरजमा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यावेळीही कुमार यांनी या तक्रारीकडे दुर्लक्षच केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.