

सासष्टी: गेल्या पाच दिवसांपासून मडगावच्या रवींद्र भवनात सुरू असलेला लहान मुलांचा किलबिलाट १६ रोजी थांबणार आहे. चौथ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवाचा मनीष सैनी दिग्दर्शित ‘द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो’ या हिंदी चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल.
गोवा सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याने अंतरंग प्रॉडक्शनच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. समारोपाचा सोहळा सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. कला व संस्कृतीमंत्री रमेश तवडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, तर सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर जी. नाईक यांचीही विशेष उपस्थिती असेल.
या सोहळ्यात महोत्सवातील सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा करण्यात येणार असून, गेल्या पाच दिवसांत आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली जातील. पुणे येथील एन्जल्स डान्स अकादमीच्या कलाकारांचे नृत्य हे समारंभाचे खास आकर्षण असेल. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता लक्ष्मण नाईक यांच्या सादरीकरणातून ‘द रॉकर्स बँड’ हा संगीत कार्यक्रम रंगणार आहे. चित्रपट, कला, नृत्य आणि संगीत अशा विविध उपक्रमांनी महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाची सांगता होणार आहे.
‘पुकम पुकाय’चे सादरीकरण!
शुक्रवारी महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सकाळी ९ वाजता अभय पंजाबी दिग्दर्शित ‘पुकम पुकाय’ हा हिंदी चित्रपट दाखविण्यात येईल. सकाळी ११.३० वाजता नाझारिया फिल्म्सने तयार केलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन आणि चर्चासत्र होणार आहे. याशिवाय चार ते पाच लघुपट दाखविण्यात येणार असून, सकाळी रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.