

कळंगूट: गोव्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कळंगूट येथील एका हॉटेलमध्ये ५१ वर्षीय ब्रिटीश पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मृत पर्यटक गेल्या काही दिवसांपासून या हॉटेलमध्ये मुक्कामास होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत परदेशी नागरिकाची ओळख पटली असून जेम्स डॅनियल बेनमोर (वय ५१) असे त्याचे नाव आहे. तो युनायटेड किंगडममधील (UK) ब्लॅकबर्न येथील रहिवासी होता. १७ मे रोजी त्याची प्रकृती अचानक खालावल्याने त्याला तातडीने म्हापसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले.
कळंगूट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेम्स बेनमोर हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता आणि त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. पोलिसांनी मृतदेहाची प्राथमिक पाहणी केली असून, सध्यातरी या घटनेत कोणताही घातपात किंवा संशयास्पद बाबी आढळून आलेल्या नाहीत. असे असले तरी, मृत्यूचे अचूक कारण शोधण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गोवा पोलीस प्रशासन पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण करत आहे. मृत पर्यटकाच्या नातेवाईकांना आणि संबंधित ब्रिटीश दूतावासाला (British Embassy) या घटनेची माहिती देण्यात आली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील आवश्यक प्रक्रिया राबवली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.