

बोरी: लाखो रुपये खर्च करून बाह्यरंग बदललेल्या बोरी पुलाचे बिघडलेले अंतरंग आता पुन्हा समोर येऊ लागले आहे. पहिल्याच पावसात पुलावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
झुआरी नदीवरील बोरी पूल २७ ऑगस्ट १९८६ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. जवळपास चार दशकांची वाटचाल करणाऱ्या या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, कालांतराने पुलाचा कमानीचा भाग तसेच पृष्ठभागही नादुरुस्त झाला. त्यामुळे पुलावर वेळोवेळी दुरुस्तीची कामे करण्यात आली.
या दुरुस्तीवर मूळ पुलबांधणीच्या खर्चापेक्षाही अनेकपटीने अधिक खर्च झाल्याचे सांगितले जाते. अलीकडेच रात्रीच्या वेळी वाहतूक बंद ठेवून पुलाच्या खालच्या भागाची दुरुस्ती करण्यात आली होती. तसेच पुलावरील खड्डे बुजवून हॉटमिक्सद्वारे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, पहिल्याच पावसात पुन्हा खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी डांबरीकरण वाहून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
टाइल्स पावसामुळे निसरड्या
पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांवर बसविण्यात आलेल्या गुळगुळीत टाइल्स पावसामुळे निसरड्या झाल्याने नागरिक घसरून पडण्याच्या घटना घडत असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात महिनाभरापूर्वीच ‘गोमन्तक''ने ‘बाह्यरंग बदलले; अंतरंगाचे काय?’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करून पुलाच्या अंतर्गत स्थितीकडे लक्ष वेधले होते. त्याची प्रचिती आता येऊ लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.