काँग्रेसमुक्त गोवा; भाजपचा इरादा

भाजपने काँग्रेसच्या बऱ्याच आमदारांना फोडून भाजपमध्ये पावन करून घेतले
 BJP VS Congress
BJP VS CongressDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: गोवा काँग्रेसमुक्त करण्याच्या इराद्याने भाजपने काँग्रेसच्या बऱ्याच आमदारांना फोडून भाजपमध्ये पावन करून घेतले; पण याचा परिणाम म्हणजे गोवा काँग्रेसमुक्त झाला की नाही माहीत नाही; पण भाजप मात्र काँग्रेसयुक्त निश्चित झाला आहे. याचे उदाहरण म्हणजे, मगोपच्या सुदिन ढवळीकरांना भाजप सरकारात घेत असल्याचे कळल्यावर बाबूश, रवी आदींनी एकत्र येऊन घेतलेली बैठक. आधी ‘वरून’ आदेश आला की भाजपमध्ये तो कुठल्याही प्रकारची कुरबुर न करता मान्य करून घेण्याची प्रथा होती. पण काँग्रेसचे आमदार आता भाजपमध्ये आल्यावर त्यांनी भाजपचीही काँग्रेस करून सोडली नाही म्हणजे मिळवले! ∙∙∙

काल तिकडे, आज इकडे

उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची आपली संस्कृती आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मंगळवारी छत्रोत्सवानिमित्त आपल्या बहिणीच्या घरी कुंकळ्ळीला आले होते. सोमवारी भाजप विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल दोतोरांना शुभेच्छा देण्यासाठी तसेच अभिनंदन करण्यासाठी यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांना गुलाल लावण्यासाठी चढाओढ मुख्यमंत्री जेव्हा देवीच्या दर्शनासाठी आले, तेव्हा सेल्फी काढणारे सेल्फीस्टार मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा गर्दी करू लागले. ते पाहिल्यावर एक भाविक म्हणाला, जे काल तिकडे होते, ते आज इकडे आहेत. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ कळला. मात्र, हसत-हसतच त्यांनी भाविकांशी हितगुज केले. ∙∙∙

 BJP VS Congress
गोव्यात भाजपने शपथविधी तातडीने पूर्ण करावा, काँग्रेस आक्रमक

मंत्रिमंडळात ‘फोंडा’ आघाडीवर

मंत्रिमंडळाचा आकार असा असेल, तसा असेल? मंत्रिपदासाठी वेगवेगळे समाज, गटांचे लॉबिंग सुरू आहे. परंतु फोंडा तालुक्यातून मात्र चारजणांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिरोड्याचे भाऊ, फोंड्याचे पात्रांव आणि प्रियोळचे गोविंद गावडे हे सत्ताधारी भाजपचे मंत्री होणार आहेत. त्यांच्याबरोबर मगोपचे सुदिन ढवळीकर सशर्त पाठिंबा देऊनही निश्‍चितपणे मंत्रिपद मिळवणार आहे, अशी चर्चा फोंडा तालुक्यात सुरू आहे.

मागील मंत्रिमंडळात सुदिन ढवळीकरांना बाजूला केल्यामुळे गोविंद गावडे हे एकटेच मंत्री होते. निवडणुकीत लढत मगोप-भाजपमध्ये अटीतटीची झाली; पण अवघ्या मतांनी मगोपचे उमेदवार पराभूत झाले आणि भाजपचे उमेदवार निवडणूक आले. तरीही सत्तेत मगोप येणार असून सर्वांनाच मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. काही का असेना; पण मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यात फोंडा तालुका आघाडीवर राहाणार आहे. ∙∙∙

कोलवाचा ‘सचिन वाझे’

कोलवा समुद्र किनाऱ्यावर जो बेकायदेशीर व्यवहार सुरू आहे, त्याला कोलवा पोलिस स्थानकात असलेला ‘सचिन वाझे’ म्हणून ओळखला जाणारा पोलिस शिपाई कारणीभूत असल्याचा आरोप बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी केला आहे. या पोलिस शिपायाला पोलिस निरीक्षक आणि उपअधीक्षक देखील टरकून असतात, अशी वदंता आहे. कोलवा पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात जे अवैध प्रकार सुरू आहेत, त्यांच्याकडून हा वाझेच हप्ता गोळा करतो. कुणाचाही वरदहस्त नसल्याशिवाय एखादा शिरपुडा असे धाडस करणे अशक्य. या वाझेच्या डोक्यावर वरदहस्त ठेवणारे परमवीर सिंग आणि अनिल देशमुख कोण? असा सवाल सध्या वेंझी करत आहेत. कोण असेल बरे हा कोलव्यातील ‘सचिन वाझे?’ ∙∙∙

फोंड्यात भाटीकर-वेरेकरांची युती?

डॉ. केतन भाटीकर आणि राजेश वेरेकर हे या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार. डॉ. भाटीकर हे मगोपतर्फे तर वेरेकर हे काँग्रेसतर्फे रिंगणात उतरले होते. त्यामुळे या निवडणुकीत ते एकमेकांचे विरोधक होते. दोघेही अवघ्याच मतांनी पराभूत झाल्यामुळे त्यांना पराभवाचे दुःख होणे साहजिकच होते.

पण नुकत्याच फोंड्याच्या वैश्‍य समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हे दोघेही एकत्र आल्याचे दिसून आले. वैश्‍य समाजाच्या कार्यक्रमात सारस्वत असलेल्या भाटीकरांना व्यासपीठावर पाहून उपस्थित ज्ञातीबांधवांंना ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ या गाण्याची आठवण झाली. यावेळी भाटीकर आणि वेरेकरांची ‘गुफ्तगु’ही बघायला मिळाली. त्यामुळे या दोघांत युती होते की काय, असे लोकांना वाटू लागले आहे. आता ही युती दोन महिन्यांनी होणाऱ्या पंचायत निवडणुकीकरिता आहे, पुढील वर्षी होणाऱ्या फोंडा पालिका निवडणुकीसाठी आहे, का पाच वर्षांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरिता आहे, हे मात्र कळले नाही बुवा. ∙∙∙

केपेतील परिवर्तन

कोविडचा कहर कमी होऊन जनजीवन सुरळीत होण्याबरोबरच निवडणूकही पार पडली. आता विविध उत्सव व जत्राही पूर्ण क्षमतेने होऊ लागल्या आहेत. हे सांगण्याचे तात्पर्य म्हणजे, या उत्सवानिमित्त जागोजागी लागणारे नेतेमंडळींचे शुभेच्छा फलक. बाळ्ळी जंक्शनवर सालाबादप्रमाणे असे फलक लागलेले आहेत. त्यातील शुभेच्छाही ठरावीक आहेत; पण शुभेच्छा देणारा बदलला आहे. आजवर त्या फलकावर माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार बाबू कवळेकर यांचे छायाचित्र व त्याखाली त्यांचे नाव असायचे, यावेळी तेथे आमदार एल्टन यांचे छायाचित्र आणि नाव आहे. राज्यात नसले तरी केपेत परिवर्तन झाल्याचे ते चिन्ह आहे. ∙∙∙

कनिष्ठांकडून वरिष्ठांच्या कलेचे परीक्षण!

एखाद्या स्पर्धेचे परीक्षण करणे म्हणजे संबंधित परीक्षकाला त्या कलेची सर्वांगीण जाण आणि समग्र अभ्यास असणे गरजेचे आहे, हे ओघाने आलेच. त्याशिवाय परीक्षक या नात्याने जबाबदारी सांभाळणाऱ्या कलाकाराचे अथवा जाणकाराचे कलाकौशल्य व ज्येष्ठताही स्पर्धकांपेक्षा जास्त असायला हवी, असे अभिप्रेत असते.

परंतु, म्हापसा परिसरात काहीजण आयोजकांची खूशमस्करी करून स्वत:ची परीक्षक म्हणून वर्णी लावण्यात माहीर आहेत, असे प्रकर्षाने जाणवते. असे ते प्रसिद्धीलोलूप, अतिउत्साही परीक्षक मानधन न घेताही परीक्षण करण्याची एकही संधी वाया घालवत नाहीत. संबंधित कलेचे कोणतेही ज्ञान नसलेल्या अशाच एका परीक्षकाची नेमणूक झाल्याचे पाहून हल्लीच म्हापशात एका कसबी कलाकाराने स्पर्धेतून माघार घेतल्याचे उदाहरण अगदी ताजे आहे. अशा या सुमार दर्जाच्या हौशी परीक्षकांमुळे आयोजकांची प्रतिष्ठा प्रकाशमय होणार की अंध:कारमय, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, अशी चर्चा रसिकांमध्ये सुरू होती.

 BJP VS Congress
'सोपो' कंत्राट कराराला एका महिन्याची मुदत वाढ: फोंडा पालिका

लॅन्डरी बनणार नगराध्यक्ष!

कुंकळ्ळी नगरपालिका मंडळात बदल होणार, अशी चर्चा सध्या कुंकळ्ळी शहरात सुरू आहे. वारे बदलते, त्याप्रमाणे सुपाची दिशाही बदलावी, असे म्हणतात. त्याप्रमाणे आमदार बनलेले युरी आलेमाव यांचे कट्टर समर्थक तथा माजी नगराध्यक्ष लॅन्डरी मास्कारेन्हस यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. विद्यमान नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांना खुर्ची खाली करण्याचे फर्मान काढल्याचेही वृत्त आहे. लक्ष्मण नाईक यांच्यानंतर ही खुर्ची लॅन्डरी यांना मिळणार असल्याने लॅन्डरी समर्थक जरी खूष असले तरी युरीचे हिंदु समर्थक काही खोचक प्रश्‍न विचारू लागले आहेत. पाहुया यावर युरी आलेमाव काय तोडगा काढतात ते? ∙∙∙

त्या तीन प्रकल्पांवर भूमिका काय?

कुडतरीतून तीनवेळा निवडून येऊनही मंत्रिपद मिळू न शकलेले आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना आता यावेळी भाजप सरकारला पाठिंबा दिल्याने मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. कुडतरीचा विकास व्हावा हे एकमेव उद्दिष्ट असल्याने आपण या सरकारला पाठिंबा दिला, असे रेजिनाल्ड सांगत आहेत. मात्र, हा पाठिंबा देताना सासष्टीच्या लोकांनी रेल्वे दुपदरीकरण व कोळसा वाहतुकीला जो विरोध केला, त्यावर त्यांची भूमिका काय असेल? सध्या सासष्टीचे लोक हा प्रश्न करू लागले आहेत. आलेक्स रेजिनाल्ड यावर खुलासा करतील का? ∙∙∙

देवावर भारी अघोरी

देवभोळा माणूस कोणत्याही कामाची सुरवात करताना देवांचा आशीर्वाद घेऊनच करतो. विज्ञान युग असले तरीही देवाला प्रथम नमस्कार करून आपला पूर्ण भार देवावर ठेवून कार्याला शुभारंभ करतात. अगदी कालची निवडणूकसुद्धा सर्वच उमेदवारांनी देवावर विसंबून लढविली. पण काहींनी केवळ देवावर भार न ठेवता अघोरी कृत्य करून देवावर भारी असे अघोरी कृत्य करून मतदारांची मतिभ्रष्ट करण्याचे काम करून घेतले. काहींनी तर गोव्यात बंगाली बाबाला आणल्याची वार्ता पसरली आहे. काळी जादू ही फार काळ टिकू शकत नसली तरी त्या दिवसासाठी कामी येते. आता लोकही नाईलाजाने म्हणू लागले आहेत, ‘देवावर भारी अघोरी’. ∙∙∙

घरवापसीचे वेध!

कुंकळ्ळी मतदारसंघात भाजपने आपल्याला उमेदवारी दिली नाही म्हणून बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उभे राहिलेले कुंकळ्ळी भाजप मंडळाचे उपाध्यक्ष सुदेश भिसे यांना पुन्हा घरवापसीचे वेध लागले आहेत असे समजते. क्लाफास डायस यांचा आता कुंकळ्ळीतून सफाया झाल्यामुळे आता आपला मार्ग मोकळा असे गृहीत धरून ही घरवापसी की आता भाजपचेच सरकार आले आहे त्यामुळे स्वगृही परतणे हेच योग्य म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला हे कळू शकले नाही. मात्र, या घरवापसीसाठी त्यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्त शोधून ठेवला आहे असे समजते. दुसऱ्या बाजूने आणखी एक अपक्ष उमेदवारही भाजपमध्ये येण्याची तयारी करत आहे, असेही वृत्त आहे.

जना उवाच!

काणकोणचे काँग्रेस उमेदवार जना भंडारी यांनी आपला पराभव का झाला, याचे कारण सांगताना याचे खापर इजिदोर फर्नांडिस यांच्या डोक्यावर फोडले आहे. इजिदोरने काँग्रेस मतदारांशी प्रतारणा केल्याने लोकांचा काँग्रेसवरील विश्वास उडाला, असे ते म्हणतात. दुसऱ्या बाजूने इजिदोर म्हणतात, काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार, अशी हवा झाल्याने आपली मते कमी झाली. वास्तविक या निवडणुकीत जना भंडारी यांना अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळाली, हे कुणीही मान्य करेल. इजिदोर म्हणतात त्याप्रमाणे काँग्रेस सत्तेवर येणार, असे वाटल्याने लोकांनी जनाला मते दिली तर नाहीत ना? ∙∙∙

दिव्या, की जेनिफर

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून डॉ. दिव्या राणे आणि जेनिफर मोन्सेरात आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्यापैकी मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे, हा प्रश्न भाजपसमोर आहे. कारण महिलांशिवाय मंत्रिमंडळ हे राज्यातल्या महिलांसाठी अन्यायकारक ठरणार आहे. त्यातच राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. त्यामुळे येत्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप या दोघींपैकी कोणाला तरी मंत्रिमंडळात घेणार, अशी चर्चा आहे. मात्र, नंबर कोणाचा लागणार, याबाबत शंका-कुशंका आहे. कारण राणे आणि मोन्सेरात दोघेही मंत्रिमंडळात असणार, हे निश्चित झाले आहे.

 BJP VS Congress
कोलवा पोलीस स्थानकासाठी जागेचा शोध सुरु

मंत्रिमंडळ खरेच एकजिनसी?

निकालानंतर अनेक दिवस गेल्यावर भाजपने अखेर आपला विधिमंडळ नेता निवडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केलेला असला व 28 मार्च रोजी सरकारचा शपथविधी जरी पार पडणार असला तरी भाजपश्रेष्ठी दावा करतात, त्याप्रमाणे हे सरकार खरेच एकजिनसी होणार का? असा सवाल अनेकजण करू लागले आहेत. कारण सरकारात जसे असंतुष्ट आमदार असतील, त्याचप्रमाणे एकमेकांच्या तोंडाकडेही न पाहणारे रवी-गोविंद-सुदिन हे त्रिदेवही असणार आहेत. त्यांना सांभाळता सांभाळता दोतोरांचाच वेळ गेला, असे झाले नाही म्हणजे पुरे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com