
Ponda-Sanquelim Municipal Election 2023: फोंडा व साखळी नगरपालिकेवर यावेळी भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे प्रतिपादन भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ‘दैनिक गोमन्तक’ला दिलेल्या खास मुलाखतीत केले.
या प्रतिनिधीच्या फोंडा येथील निवासस्थानी येऊन दिलेल्या त्यांच्या या खास मुलाखतीचा हा गोषवारा...
साखळी पालिकेत भाजपची स्थिती कशी आहे?
अत्यंत उत्तम आहे. सुरुवातीलाच दोन जागांपैकी आमची एक जागा बिनविरोध आली आहेच. उरलेल्या दहा प्रभागातही आम्हाला पूरक असे वातावरण आहे.
जी काही थोडीफार खिंडारे होती त्याची डागडुजी केली आहे. दोन प्रभागातील अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेऊन आमच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.त्यामुळे यावेळी आमचे यश निश्चित आहे.
यापूर्वी भाजपला साखळी पालिका कधीच काबीज करता आलेली नाही. मग आताच आपण इतके आशावादी कसे?
त्याला अनेक कारणे आहेत. मागच्या वेळी आमच्याच काही उमेदवारांनी आम्हाला तोंडघशी पाडले होते. पण यावेळी आम्ही सावध भूमिका घेतली आहे. आम्ही पॅनेल निवडणुकीपूर्वीच जाहीर केले आहे.
मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्यामुळे आम्ही दोघे प्रसंगनिहाय रणनीती ठरवत आहोत. आणि त्यामुळेच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही आघाडीवर पोहोचलो आहोत. यामुळे उरलेल्या दहापैकी कमीत कमी आठ तरी जागा मिळविण्याची खात्री निर्माण झाली आहे.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखळीत भाजपमध्ये बंड झाले होते हे खरे आहे का?
त्याला बंड म्हणता येणार नाही. ती नाखुशी होती. आमच्या ज्या कार्यकर्त्यांना उमेदवारी म्हणजे आमचे समर्थन मिळाले नाही ते नाराज झाले होते. पण शेवटी जिंकण्याकरता ‘विनेबलिटी’ महत्त्वाची असते.
त्याप्रमाणे आम्ही समर्थन दिले. पण आता ही नाराजी दूर झाली आहे. मी व मुख्यमंत्र्यांनी यामागची कारणे विशद केल्यामुळे आता सर्वजण एकदिलाने काम करताना दिसत आहेत.
फोंडा पालिकेत गेल्या पाच वर्षांत सहा नगराध्यक्ष झाले. हा संगीत खुर्चीचा खेळ विकासाला मारक ठरत नाही का?
नक्कीच ठरतो. पण याला भाजप जबाबदार आहे असे वाटत नाही. याचे कारण म्हणजे गेल्या वेळी विविध पॅनेलचे नगरसेवक एकत्र आले होते. त्यामुळे एकमेकांशी मेळ नव्हता. त्यात परत चार वर्षे आमचा आमदारही नव्हता.
गेले वर्षभर रवी नाईक हे भाजपचे आमदार असल्यामुळे संगीत खुर्चीचा खेळ थांबला आहे. त्यात परत यावेळी आम्ही निवडणूक होण्यापूर्वीच आमचे पॅनेल जाहीर केल्यामुळे भविष्यात असा संगीत खुर्चीचा खेळ होणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ.
फोंडा पालिकेत भाजप पॅनेलची स्थिती कशी आहे?
एकतर्फी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. आधीच आमच्या दोन जागा बिनविरोध आल्या आहेत. आणि उरलेल्या १३ जागांपैकी कमीत कमी दहा जागा तरी भाजप पॅनेलला मिळतील याची आम्हाला खात्री आहे. मी स्वतः, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर व फोंड्याचे आमदार रवी नाईक हे स्थितीचा आढावा घेत असून त्याप्रमाणे रणनीती आखत आहोत.
या पालिका निवडणुकांकडे तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कसे पाहता?
पालिका या ‘लोकल बॉडी’ असल्यामुळे त्यांचे निकष वेगळे असतात. पण शेवटी कोणतीही निवडणूक जिंकण्याकरता सगळ्या घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही आम्हाला सर्व घटकांची गरज भासणार आहे.
जेवढे नगरसेवक आमच्याबरोबर असतील तेवढी आमची स्थिती मजबूत होणार आहे. फोंडा व साखळी वगळता आज राज्यातील १२ नगरपालिकांपैकी ११ पालिका भाजपकडे आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही पालिका निवडणुका महत्त्वाच्या ठरत असतात.
तुमचे पॅनेल निवडून आल्यास तुम्ही नगरसेवकांच्या कार्याचा पाठपुरावा करणार का?
करायलाच पाहिजे. नगरसेवकांवरही वचक असला पाहिजे. मुख्य म्हणजे नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील मतदारांच्या संपर्कात राहिले पाहिजे. शहरातील समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे बघितले पाहिजे.
यावर आम्ही नियंत्रण ठेवण्याचे ठरविले आहे. नगरसेवकाकडे काम होत नसेल तर आमदाराकडे जावे. तिथेही होत नसेल तर आम्ही आहोतच; पण यावेळी आम्ही कोणतीही तडजोड करणार नसून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू.
फोंडा व साखळीत विकासाबाबत काही उणीवा आढळल्या आहेत का?
साखळी हा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्यामुळे ते नेहमीच साखळी पालिका कक्षेबाबत जागरूक असतात. पण नगरसेवकांनीही सतर्क राहून काम करणे आवश्यक आहे. फोंडा हे तर मध्यवर्ती शहर असल्यामुळे इथे विकासाला नेहमीच वाव असतो.
आता फोंड्यात प्रथमच भाजपचा आमदार निवडून आल्यामुळे आम्ही जनतेला ‘रिटर्न्स’ देण्यास बांधील आहोत. फोंड्यात आता नियोजित मास्टर प्लॅन कार्यान्वित होणार आहे.
भाजप म्हणजे विकास हे समीकरण कृषिमंत्री रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही फोंड्यातही साकार करणार आहोत, हे निश्चित.
नगरसेवकाने दरवर्षी आपले ‘प्रगती पुस्तक’ मतदारांना दाखवायला हवे, असे तुम्हाला वाटते का?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगरसेवकाने निवडून आल्यानंतर आपण पुढील पाच वर्षांत काय करणार याचे नियोजन करायला हवे. नाहीतर पाच वर्षे संपल्यानंतर नगरसेवकाची पाटी कोरी राहते. फक्त गटार बांधले म्हणजे नगरसेवकाचे काम संपत नाही.
मला वाटते, शहराचा योग्य विकास साधण्याकरता शहरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची एक सल्लागार समिती नेमायला हवी. या समितीचा सल्ला शहराचा सर्वांगीण विकास साधायला मदत करू शकेल.
यादृष्टीने सरकारतर्फे अधिसूचना काढता येईल काय, हे मी मुख्यमंत्र्यांशी बोलून ठरविणार आहे. पण अशी समिती ही राज्यातील पालिकांकरता काळाची गरज आहे, हे नक्की.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.