'गोव्यात भाजपचेच सरकार येणार'

राधाराव यांचा काँग्रेस पक्षाला असलेला विरोध तसा सर्वांना माहीत आहे.
 BJP |Goa latest political news updates in Marathi
BJP |Goa latest political news updates in Marathi Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: भाजपच्या आमदारांची संख्या यावेळी 12 ते 13 आमदारांपर्यंत येऊन थांबणार असा अंदाज सगळीकडे व्यक्त होत असताना राजकीय विश्लेषक असलेले राधाराव ग्रासीयस यांना काहीही झाले तरी गोव्यात भाजपचेच सरकार येणार असे वाटते. राधाराव यांचा काँग्रेस पक्षाला असलेला विरोध तसा सर्वांना माहीत आहे. (Goa election 2022 News Updates)

पण, राधाराव यांनी हे वक्तव्य काँग्रेस द्वेषातून केलेले नाही. राधाराव म्हणतात, केंद्रात भाजपचे सरकार आहे आणि आयटी, ईडीसारख्या यंत्रणा त्यांच्याकडेच आहेत. उद्या जर कुणीही असा तसा निर्णय घेतला तर भाजप त्यांच्यामागे या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावू शकते. निवडून येणारे संभाव्य आमदार पाहिल्यास त्यांच्या मागे या यंत्रणा लागल्या तर आश्चर्य वाटायला नको. राधाराव यांचे गणित याच्यावरच तर आधारून आहे. (Goa latest political news updates)

एक्झिट पोलचे मायाजाल!

‘रुको जरा, सब्र करो, धक्काबुक्की करने का नही’ हा संवाद आपण सोशल मीडियावर बऱ्याच वेळी ऐकला असणार याची आठवण होण्याचे कारण म्हणजे न्यूज चॅनेलनी एक्झिट पोलच्या नावाने घातलेला गोंधळ. कोण जिंकणार व कोण हरणार हे दहा तारखेला समजणारच आहे मग हे नाटक कां? या तथाकथित एक्झिट पोलात एक्झेट असे काहीच नसते. दहाजण दहा वेगवेगळे दावे करून बिचाऱ्या उमेदवारांना आणखी चिंतेत टाकतात.

वेगवेगळ्या जनमत चाचण्यांमुळे जनताही काहीवेळा बुचकाळ्यात पडत असल्याने असे दावा करणाऱ्यांचे अंदाज खोटे ठरले तर त्यांना दंड देण्याचा कायदा केला तर हे फुकट उद्योग बंद पडणार हे निश्चित.

अपक्षांचा भाव वधारणार

विधानसभा निवडणुकीत विविध संस्थांनी केलेल्या जनमत चाचणीच्या आधारे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, असे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे तृणमूल-मगोप आणि आम आदमी पक्षाला काही जागा मिळतील, असाही अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय तीन ते चार ठिकाणी अपक्ष उमेदवार बाजी मारतील, असा अंदाज आल्याने अपक्ष उमेदवारांत आत्तापासूनच आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत.

सरकार कुणाचेही येवो या अपक्षांचा दर वधारणार असल्याने त्यांना सत्तेतही सहभागी करून घेऊ, असे प्रमुख पक्षांचे नेते फोन करून त्यांना सांगू लागले आहेत. काही का असेना अपक्ष उमेदवारांनी घेतलेले कष्ट फळाला येईल, असे दिसते.

हूरहूर वाढू लागली

राज्यात काँग्रेस पक्ष सरकार की भाजपा सरकार करणार या संदर्भात सर्वत्र हुरहूर निर्माण झाली आहे. मात्र, सांगे मतदारसंघात काँग्रेस गोटात शांतता पसरली आहे. भाजपा गट आणि सावित्री गटात कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे. वरवर भाजपाची मते विभागून दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या आशेवर काँग्रेसचे हितचिंतक आहे.

तर भाजपा म्हणतो आमची एक गट्टा मते तशीच आहे. तर सावित्री म्हणते सर्वच पक्षाची मते या वेळी आपल्या पारड्यात पडली आहे. आम आदमी आणि तृणमूल काँग्रेस पक्षाला हानी पोचविणार आहे. या सर्व भानगडीत सावित्री कवळेकर नक्कीच बाजी मारून जाणार असल्याची जोरदार हवा निर्माण झाली असल्यामुळे सर्वानाच निकाला विषयी हुरहूर लागली आहे.

देवस्थान कार्यकारिणींवरही डोळा

राजकीय क्षेत्राबरोबरच संस्थात्मक राजकारणातही स्वत:चा वरचष्मा राखण्याचा प्रयत्न भाजप नेहमीच करीत आहे, हे तर सर्वश्रुतच आहे. अगदी ज्ञातीसंस्थांच्या राजकारणातही सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ झाल्याचा अनुभवही गोमंतकीयांनी घेतलेला आहे.

काही वर्षांपूर्वी भाजप राजवटीवेळी एका ‘भाई’ने भंडारी समाजाच्या अध्यक्षपदी स्वपक्षातील अनिल होबळे यांची निवड होण्यासाठी कोणकोणते उपद्‍व्याप केले होते, हे गोमंतकीय जनता अजून विसरलेली नाही. अशा या पार्श्वभूमीवर आता भाजपने सरकारमान्य देवस्थानांच्या निवडणुका येत्या रविवारी 13 रोजी होणार असल्याने तिथेही स्वत:ची फिल्डिंग लावली असल्याचा बोलबाला आहे. याचाच परिपाक म्हणून सध्या म्हापशातील बोडगेश्वर मंदिराचे अध्यक्षपद भूषवणारे आनंद भाईडकर हे काँग्रेससमर्थक असल्याच्या कारणावरून त्यांना येत्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत पदच्यूत करण्याचा विडा काहींनी उचलला असल्याचे विद्यमान घडामोडींवरून जाणवते.

 BJP |Goa latest political news updates in Marathi
बाणावली येथील जेडन परेरा सोडल्यास सर्व विद्यार्थी परतले

‘ते’ त्रिकुट खुश!

सांगे मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर सांगे मतदारसंघात विजयी होणार असा दावा एका न्यूज चॅनेलने केल्यामुळे सावित्रींबरोबर फिरणारे सांग्यावरील ‘ते’ त्रिकुट खुश आहे. आता मॅडम जिंकणार हे पक्की झाले असून, मॅडम आमदारच नव्हे तर मंत्रीही बनणार व आपले भाग्य उजाळणार म्हणून ती तिकडी खुश आहे म्हणे. सोमवारी शाकाहारी असतानाही म्हणे या तुकडीने सेलिब्रेशन केले. आता तो एक्झिट पोलचा दावा जर खोटा बनला तर मग या तुकडीचे काय होणार? हे देवच जाणे.

बायोमिथेनेशन प्लांटची शोकांतिका

‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ असे सरकारी कारभाराबाबत सर्रास म्हटले जाते; पण मडगाव नगरपालिकाही त्याच वर्गात मोडते की काय, अशी शंका एसजीपीडीए बाजारात उभारलेल्या 9 टीपीडी बायोमिथेनेशन प्लांटवरून घेतली जाऊ लागली आहे. सर्व सोपस्कार पूर्ण करून या प्लांटचे काम दिले गेले आणि ते पूर्ण होऊन काही महिन्यांपूर्वी तो प्लांट सुरूही केला. पण पूर्ण क्षमतेने तो चालविण्यासाठी त्याला थ्री फेज वीजजोडणी हवी, हे त्यानंतर लक्षात आले. पण ती तेथे उपलब्ध नव्हती.

ती वाहिनी टाकण्यासाठी त्यानंतर हालचाली सुरू झाल्या व त्यात आणखी काही महिने निघून गेले. या प्लांटमधून वीजनिर्मिती होणार होती. या वीज जोडणीमुळे ती झाली नाही. त्याचप्रमाणे या प्लांटचे फलित पाहून स्थापन करावयाचे अन्य दोन प्लांटही अडून पडले आहेत.

उडदामाजी काळे गोरे

सध्या गोव्यात सगळीकडे एकच प्रश्न विचारला जातो. यावेळी सरकार बदलणार का? युगोडेपाचे उपाध्यक्ष राधाराव ग्रासीयस यांना हा प्रश्न विचारल्यास ते म्हणतात, सरकार बदलणार का यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे तो येणारे आमदार चांगले सरकार देऊ शकतील का? राधाराव म्हणतात, जे कोण जिंकून येणार असे वाटते त्यांची कुवत पाहता हेही सरकार पूर्वीप्रमाणे नाकर्त्यांचेच असणार. फक्त माणसे कदाचित बदलतील. पण, त्यांची कुवत आदल्यासारखीच असेल. राधारावांचे म्हणणे असेच बाहेर टाकण्यासारखे नक्कीच नाही म्हणायचे.

काॅंग्रेस सावध

विधानसभेच्या 2017 मधील निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपने कॉंग्रेसच्या तोंडचा घास हिरावून नेला होता. कॉंग्रेसनेही जास्ता जागा मिळवूनही सत्ता स्थापनेसाठी केलेली ढिलाई हीच त्याचे मूळ कारण होते. पुढे 80 टक्के कॉंग्रेस आमदारांनी पक्षाला झिडकारत भाजपची वाट धरली. यासाठी आता कॉंग्रेसने विविध प्रकारचे सावध प्रयत्न सुरू केले आहेत. कॉंग्रेसने उमेदवारांकडून ठोस प्रतिज्ञापत्र लिहून घेत देवासमोर शपथही घेतली आहे.

त्याच्याही पुढचा प्रकार म्हणजे या सर्व उमेदवारांना म्हणे आता वरिष्ठ नेत्यांच्या निरीक्षणाखाली एकाच ठिकाणी राहण्यास भाग पाडले जाणार आहे. त्यामुळे हा अतिसावधपणा कॉंग्रेसला पूरेक ठरणार की, भाजप या पुढची चाल खेळून कॉंग्रेस उमेदवारांना गळाला लावणार हे येत्या दहा मार्चनंतरच कळेल. काॅंग्रेसने निवडणुकीनंतर घेतलेली खबरदारी ही उमेदवारांत उत्साह निर्माण करणारी असली तरी दुसरीकडे भाजपही वेगळी व्यूहरचना आखण्याची शक्यता असल्याने काॅंग्रेस नेत्यांना उमेदवार फुटण्याची भीती सतावत असल्याचे जाणवते.म्हणून कॉंग्रेस नेत्यांनी ताकही फुंकून पिलेलेच बरे.

सुदिनबाब विक्रम करणार

2000 पासून सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारांत, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, म. गो.चे सुदिन ढवळीकर यांनी मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. गतवेळी तर त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून बढती मिळाली होती. त्यामुळे गेल्या तीस बत्तीस वर्षांची परंपरा यावेळी ते कायम राखतात, की महाराष्ट्र पॅटर्नवर इतरांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊन आपले इप्सित साध्य करतात ते सर्वांसाठी उत्सुकतापूर्ण ठरणार आहे. मात्र तसे घडले तर भाजपासाठी महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात बसलेला तो हादरा ठरणार आहे.

 BJP |Goa latest political news updates in Marathi
पणजी पोलिस ठाणे हल्लाप्रकरणी सुनावणी पुन्हा तहकूब

आतातरी बदला ना!

मागच्या काळात मुख्यमंत्री असूनही लक्ष्मीकांत पार्सेकर यांना खुद्द त्यांच्याच मतदारसंघातील लोकांनी झिडकारले, परिणामी पुढील राजकारण काय झाले ते सर्वांना माहीत आहे. मुख्यमंत्रीपद मिळाले की डोक्यात हवा चढते की काय होते कुणास ठाऊक. पण, पार्सेकर यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्रीपद मिळालेले डॉ. प्रमोद सावंत यांचेही वर्तन काही बरे नव्हते, असे खुद्द त्यांच्याच मतदारसंघातील लोक बोलतात.

त्यामुळे यावेळेला दोतोरांना धडा शिकवण्याची भाषा बऱ्याच जणांनी बोलून दाखवली आहे. साखळी मतदारसंघात तर सर्वाधिक मतदानही झाले आहे. आता हे मतदान दोतोराच्या विरोधात की समर्थनार्थ हे काही कळायला मार्ग नाही. तरीपण मतदारांना झिडकारले तर त्याचा परिणाम काय होतो, हे पार्सेकरांप्रमाणेच प्रमोद सावंतांनाही कळून चुकले आहे. आता चूकभूल द्यावी घ्यावी की वचपा काढायचा निर्णय साखळी मतदारसंघातील मतदारांनी घेतला की नाही हे माहीत नाही, पण दोतोर मात्र टेन्शनमध्ये आहे.

काॅंग्रेसमध्ये खुशी

सर्वांना मतमोजणीचे वेध लागले आहेत. देशभरातील पाच राज्यांमधील मतदान संपल्याने एक्झिट पोल (जनमत चाचण्या) करण्यास मुभा मिळाल्याने बहुतांश माध्यमांनी आपल्या जनमत चाचण्या जाहीर केल्या असून, कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज बांधल्याने सध्यातरी कॉंग्रेसमध्ये चैतन्य पसरल्याचे दिसते.

गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसला सत्तेचे डोहाळे लागले होते, ते आता सत्यात उतरत असल्याने सावधपवित्रा घेत त्यांनी व्यूहरचनेची आखणी करण्यास सुरवात केली आहे. कॉंग्रेसचे बडे नेतेही आत्तापासूनच राज्यात तळ ठोकून आपल्या उमेदवारांशी पुन्हा पुन्हा चर्चा करीत आहेत. एकप्रकारे ‘खुंटी’ घटत करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतरच सत्तेचे स्वप्न साकारणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसची ही घाई अततायीपणा ठरू नये, म्हणजे मिळवले.

सुदिनरावांना शुभशकून

काबो राजभवनावर साकारलेल्या नव्या दरबार हॉलच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या हॉलच्या उभारणीत योगदान दिलेल्या अनेकांचा सत्कार केला गेला. पण त्यात माजी मंत्री व म. गो. नेते सुदिन ढवळीकरांचा समावेश पाहून केवळ भाजपवाल्यांचेच नव्हे तर म.गो. ची मदत घेऊन नवे सरकार स्थापन करण्याचे बेत करणाऱ्या काँग्रेसवाल्यांचे डोळेही विस्फारले. वास्तविक हा कार्यक्रम राज्यपालांचा होता.

त्यात सरकारचा थेट संबंध नव्हता मग हे कसे घडले यावर भाजप व काँग्रेसमध्येही अजून चर्चा सुरू आहे. सुदिन समर्थकांना मात्र मतमोजणीच्या तोंडावर झालेला हा सत्कार म्हणजे शुभशकून वाटत आहे.

 BJP |Goa latest political news updates in Marathi
सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने गोव्यातील उमेदवारांच्या 'वन-टू-वन' बैठका घेतल्या

व्यूहरचना सफल होणार?

मतमोजणी व निकालाप्रती नेहमीच उत्सुकता असते व तशी ती असणे स्वाभाविकच आहे. पण, या वेळची उत्सुकता कमाल करणारी आहे. यापूर्वी ती कधीच अशी नव्हती. कदाचित गतवेळी म्हणजे 2017 मध्ये घडलेल्या घडामोडी हे त्या मागील कारण असेल. सध्या सत्तास्थापनेबाबत गोव्यात तसेच दिल्लीत प्रमुख दावेदारांकडून व्यूहरचना केल्या जात आहेत. त्यात दिल्लीतील नेतेही सहभागी होत असल्याने या व्यूहरचनेस जरी महत्व येत असले तरी शेवटी बाजी कोण मारणार व कुठली व्यूहरचना सफल होणार ते मात्र 10 मार्चनंतरच स्पष्ट होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com