
पणजी: भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर उर्फ दामू नाईक यांनी पक्ष संघटनेवर आपला वरचष्मा कायम ठेवणाऱ्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपचे राज्य पदाधिकारी जाहीर करताना त्यांनी मूळ भाजपच्या मुशीतील नेत्यांना प्राधान्य दिले आहे.
स्व. मनोहर पर्रीकर यांचे मित्र दत्तप्रसाद खोलकर यांना प्रदेश उपाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. माजी प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांना प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे.
हळदोण्याचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांना प्रदेश उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना प्रदेश उपाध्यक्षपदी कायम ठेवले आहे.
प्रदेशाध्यक्षपदी दामू यांची निवड झाल्यानंतर त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना महत्त्वाच्या अशा प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त केले आहे. दक्षिण गोवा माजी अध्यक्ष आणि दक्षिण गोवा माजी प्रभारी सर्वानंद भगत यांनाही प्रदेश सरचिटणीसपदी बढती मिळाली आहे. माजी आमदार दयानंद सोपटे यांना प्रदेश चिटणीसपदी कायम ठेवले आहे.
माजी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीप परूळेकर यांना या बदलांमध्ये स्थान मिळालेले नाही. भारतीय जनता महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्ष आरती बांदोडकर यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त केले आहे.
प्रदेश सरचिटणीस ही सहापैकी तीन पदे महिलांना दिली आहेत. यात संजना वेळीप आणि राणीआ कार्दोज यांचाही समावेश आहे. माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांचे बंधू आणि जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर यांना प्रदेश चिटणीसपदी नेमले आहे. ते सभापती रमेश तवडकर यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात.
प्रदेश खजिनदार म्हणून गेली अनेक वर्षे काम करणारे संजीव देसाई त्याच पदावर कायम आहेत. भाजपचे पणजीतील आधारस्तंभ पुंडलिक राऊत देसाई यांना सहखजिनदार म्हणून बढती मिळाली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश यांना माध्यम विभागाचे निमंत्रक म्हणून नियुक्त केले आहे. ते जिल्हा पंचायत सदस्यही आहेत. वास्कोचे आमदार दाजी साळकर यांना मुख्य प्रवक्तेपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रवक्ते गिरीराज यांच्याकडे आता माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अशी जबाबदारी दिली आहे. शुभम पार्सेकर समाज माध्यम प्रभारी आणि सुधीर पार्सेकर कार्यालयीन सचिव या जबाबदाऱ्यांवर कायम आहेत.
भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या कुंदा चोडणकर यांना पुन्हा प्रदेश उपाध्यक्षपदी संधी दिली आहे. यापूर्वीही त्या प्रदेश उपाध्यक्षपदी होत्या. पर्वरी परिसरातील अन्य नेते किशोर अस्नोडकर, महानंद अस्नोडकर यांच्याऐवजी चोडणकर यांच्या नावाचा विचार करून पर्वरी मतदारसंघात राजकारणाने कुस बदलली तर पर्याय काय, याचा विचारही केलेला दिसत आहे.
प्रियोळ मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास सतरकर यांना पुन्हा राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. यावरून प्रियोळ मतदारसंघाकडे भाजप आता आणखी लक्ष पुरवणार आहे. त्यातही भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपच्या प्रयोगामधील सध्या आमदार गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड ठळकपणे उठून दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.