

पणजी: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना संसदेत आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक आणले. मात्र, काँग्रेसने अनेक दशके हे आरक्षण अडवून ठेवून देशातील महिला शक्तीचा विश्वासघात केला आहे,’ अशी टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी केली.
भाजप महिला मोर्चातर्फे आज पणजीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जन आक्रोश’ रॅलीत नारी शक्तीला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार डॉ. दिव्या राणे, दिलायला लोबो, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सुवर्णा प्रभू तेंडुलकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष रेश्मा बांदोडकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसच्या कार्यकाळात महिलांना त्यांचे हक्क मिळाले नाहीत. ज्या ‘महिला आरक्षणा’साठी मोदी सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले, त्याला काँग्रेसने सातत्याने विरोध दर्शवला. मोदी सरकारने महिलांना ‘लक्ष्मी’, ‘सरस्वती’ आणि ‘दुर्गा’ मानून त्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. जनधन खाती उघडण्यापासून ते उच्च शिक्षणापर्यंत महिलांना सक्षम करण्याचे काम भाजपने केले आहे. केवळ पंचायतीतच नव्हे, तर आता संसदेतही ५० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व दिसले पाहिजे, हे आमचे ध्येय आहे, असे नाईक यांनी पुढे नमूद केले. मोर्चादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत महिला कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विधेयकाला ठाम पाठिंबा दर्शवला, तर विरोधकांच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला.
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. लोकसभेत या विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी ठामपणे केले. विरोधी पक्षांच्या भूमिकेमुळेच हे महत्त्वपूर्ण विधेयक संमत होऊ शकले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
दामू नाईक यांनी आपल्या भाषणातून आगामी निवडणुकांसाठी महिला कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला असून मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार घराघरांत पोहोचवण्याचे आवाहन केले. महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी महिला आरक्षण अत्यावश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
३३ टक्के महिला आरक्षण लागू करून महिलांना उच्च पदावर पोहोचवण्याचे आश्वासन केवळ भारतीय जनता पक्षच पूर्ण करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोर्चात महिलांची मोठी उपस्थिती होती. सकाळपासून हजारो महिला या रॅलीत सहभागी झाल्या होत्या, हा काँग्रेसच्या विरोधातील मोठा जनआक्रोश आहे, असे दामू नाईक यांनी यावेळी सांगितले. भाषणाच्या शेवटी त्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत नारी शक्तीला वंदन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.