गोव्यात तृणमूलच्या येण्याने भाजपलाच फायदा
पणजी: गोव्यात (Goa) आलेले नवीन पक्ष भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी नव्हे, तर भाजपविरोधी (BJP) मतांचे विभाजन करण्याच्या मोहिमेवर आले असल्याचे दिसत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी तृणमूल काँग्रेसवर (Trinamool Congress) केली. थिवी येथील मतदारसंघातील दौऱ्यावेळी ते बोलत होते.
तृणमूलने अवघ्या काही महिन्यांतच काँग्रेस तसेच प्रादेशिक पक्षातील नेत्यांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवल्याने काँग्रेसला मत विभाजनाची भीती वाटू लागली आहे. या मत विभाजनाचा फायदा भाजपलाच होण्याची शक्यता आहे.
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझिन फोलेरो हे सध्या गोव्यातील सर्वेसर्वा आहेत. आमदार प्रसाद गावकर यांना या पक्षाने गळाला लावल्यानंतर गोवा फॉरवर्डच्या किरण कांदोळकर यांना पक्षात आणण्यात यश मिळवले. राज्यातील प्रादेशिक पक्षांना गोमंतकीयांची मते मिळतात व काँग्रेसला बिगर गोमंतकीयांची मते मिळतात. आता तृणमूलच्या आगमनामुळे या मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे काँग्रेससाठी आगामी निवडणुकीत मारक ठरण्याची स्थिती उद्भवू शकते. त्यामुळे ही मते मिळवण्यासाठी काँग्रेसला नवी क्लृप्ती लढवण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षाकडून नवे चेहरे व तरुण उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी संकेत दिले असले तरी जिंकून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची या पक्षाकडे वानवा आहे. यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार हे पक्षाची व स्वतःची मते मिळून जिंकून आले आहेत. सध्या पक्षाकडे अनुभवी उमेदवार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला तृणमूल काँग्रेसचा राज्यातील आगमन डोईजड होणार आहे.
थिवी येथे पक्षाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव म्हणाले की, आप आणि टीएमसी हे पक्ष गोव्यात भाजपला हरवण्यासाठी नव्हे, तर कॉंग्रेसला कमजोर करून भाजपला मदत करण्यासाठी आले आहेत, याची जाणीव आता लोकांनाही झाली आहे. त्यांचा हेतू नेमका काय आहे, हेच तर कळत नाही. धर्मनिरपेक्ष शक्तींना व काँग्रेसला कमजोर करण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेस गोव्यात करीत आहे.
2022 मध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस आणि समविचारी पक्ष एकसूत्री अजेंडा घेऊन एकत्र येण्याचा प्रयत्न करत असताना हे नवे पक्ष भाजपविरोधी मतांचे विभाजन करण्याच्या मोहिमेवर असल्याचे दिसते. या पक्षांनी आधी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पदांचे आमिष दाखवले. आता ते त्यांच्या उमेदवारांची शिकार करून प्रादेशिक पक्षांना लक्ष्य करत आहेत. हा संपूर्ण गेमप्लॅन धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्याचा आहे. कारण ते कोणत्याही भाजप नेत्यांना लक्ष्य करत नाहीत.
‘तृणमूल’कडे एवढी माया कुठली?
मागील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येऊन भाजपमध्ये गेलेल्या ‘त्या’ गद्दार आमदारांना आम्ही पुन्हा पक्षात घेणारच नाही. कारण त्यांनी काँग्रेसला तसेच लोकांनाही फसवले आहे. तृणमूलचा आम्हाला कोणताही धोका नाही. कारण आमचा पक्ष मजबूत आहे. परंतु, त्यांच्या गोव्यात येण्याच्या हेतूबाबत आम्हाला शंका वाटते. त्यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून हाच प्रश्न आहे, असेही दिनेश गुंडू राव म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.