

गोव्यातली जंगले, नदी किनारे, नाले, तलाव तसेच समुद्रकिनाऱ्याजवळ वास्तव करून राहणारे अनेक पक्षी पक्षीप्रेमींना आकर्षित करत असतात. मात्र या सुंदर पक्ष्यांची नावे किंवा त्याच्याबद्दलची माहिती त्यांना असतेच असे नाही. गोव्याच्या स्थानिक आनी स्थलांतरी पक्षांच्या प्रजातींची सखोल माहिती व्हावी यासाठी ‘बर्डस ऑफ गोवा : कोंकणी नोमेनक्लेचर - वळख सुकण्याची’ या इंग्रजी- कोंकणी द्विभाषिक पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, पक्षीनिरीक्षक आणि संशोधकांना या पुस्तकाचा विशेष फायदा होईल यात शंका नाही.
डॉ. मीनल देसाई शिरोडकर ( प्राणीशास्त्र अध्ययन शाखा), डॉ. प्रकाश पर्येकर (कोंकणी अध्ययन शाखा) तसंच वैष्णवी भारती (प्रणिशास्त्र अध्ययन शाखेच्या संशोधन विद्यार्थी) यांच्या अथक परिश्रमाने एकूण ५१५ पक्ष्यांची माहिती संकलित करून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
पक्ष्यांना कोंकणी नांव देताना संबंधित पक्ष्यांविषयी स्थानिक व्यक्तींकडे चर्चा करण्यात आली होती. ज्या पक्ष्यांची नांवे उपलब्ध नव्हती त्यांचे इंग्रजी तसेच वैज्ञानिक नांव, त्यांचा रंग, घरटे बांधण्याची त्यांची पद्धत, भक्ष खाण्याची तर्हा, त्यांच्या शरीराचे विविध भाग, त्यांचा आवाज ही महत्वाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यांना नांवे दिली गेली आहेत.
पक्ष्यांची प्रजाती आणि त्यांचे कुटुंब याची माहिती या पुस्तकात उपलब्ध केली गेली आहे. त्यांच्या कोंकणी नांवाचा अचूक उच्चार करता यावा यासाठी आय. पी. ए. (इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट्स) या लिपीत ती लिहिण्यात आली आहेत.
४५० पेक्षा अधिक छायाचित्रे असलेले अशा प्रकारचे हे पहिले पुस्तक असून सर्व वयोगटातल्या वाचकाना ते उपयुक्त ठरेल अशी त्याची मांडणी आहे.
गोवा विद्यापीठ, वन विभागाच्या संयुक्त विद्यामाने हे पुस्तक वाचकवर्गासमोर येत आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक ६ रोजी, संध्याकाळी ५.३० वाजता, वाळपई येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षी महोत्सवास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या पुस्तकासाठी नकुल धावस्कर, मांगिरीष धारवाडकर, जस्टीन्हो रिबेलो, सागर नाईक, अंकुश सहानी, स्टीफन मॅनेझिस, शैलेंद्र नाईक, राकेश धारेश्वर, हर्ष झवेरी, अनिश थीमन्ना, अलिस्टर मार्टिन्स, अमोल लोखंडे, मिनल देसाई शिरोडकर, वैष्णवी भरती आणि प्रकाश पर्येंकर यांनी टिपलेली छायाचित्रे लाभली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.