

एका बाजूला मांडवी नदी आणि दुसर्या बाजूला म्हापसा नदी यांनी आणलेल्या गाळापासून निर्माण झालेले चोडण बेट, प्राचीन काळी चूडामणी नावाने ओळखले जायचे. येथील खारफुटीचे वनक्षेत्र आज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावाने परिचित आहे. हिरवळीचे वैभव टिकवून ठेवलेल्या या चोडण बेटाला राज्यात महत्त्वाचे स्थान आहे.
एक महसुली गाव म्हणून तिसवाडी तालुक्यातील सर्वाधिक मोठे भौगोलिक क्षेत्रफळ लाभलेला गाव म्हणूनच त्याची ओळख आहे, असे नसून संपूर्ण गोव्यात जी लोकवस्ती आणि मनुष्यविरहित बेटं आहेत, त्यातही चोडण अग्रेसर आहे.
१९,९८३.२१ हेक्टर क्षेत्रफळ लाभलेल्या या कृषिप्रधान गावात जी खाजनभूमी बराच काळ पडीक राहिली त्यात झपाट्याने कांदळवनाचा विस्तार झाला. १९८८साली गोवा सरकारने वैविध्यपूर्ण कांदळ वनस्पतीच्या प्रजातींचे वैभव मिरवणार्या या गावतल्या १.७८ चौरस किलोमीटर क्षेत्राला डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य म्हणून अधिसूचित केले.
या अभयारण्याच्या पाच किलोमीटर परिघात एकवीस गावे असून इथे असलेल्या समृद्ध कांदळवनाचे पर्यावरणीय आणि आर्थिक लाभ त्यांना पूर्वीपासून मिळत आहेत.
भारतीय वन कायद्याच्या अंतर्गत चोडण बेटावरती निर्माण झालेल्या खारफुटीच्या हिरव्यागार जंगल क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा दिला आणि १९८८साली त्याचे रूपांतर अभयारण्यात करण्यात आले. आज मानवी समाजाला नदीतले पाणी पिण्यासाठी आणि जलसिंचनासाठी गरजेचे असले तरी त्या पाण्याद्वारे पशुपक्षी आणि वृक्षवेलींचे भरणपोषण होण्याबरोबर प्राणवायूची निर्मिती होत असते.
मांडवी नदीने आणलेला गाळ इतका सुपीक, की जेव्हा इथल्या कष्टकर्यांनी खाजनशेतीला विराम दिला तेव्हा इथे हां हां म्हणता कांदळवनाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आज एका बाजूला मांडवी आणि तिच्या खाड्या, तर दुसर्या बाजूला म्हापसा नदीच्या भरती-ओहोटीच्या पाण्याने चोडण बेट वेढले गेले. शेकडो वर्षांपूर्वी निर्माण झालेले हे बेट, चोहोबाजूने पाण्याने वेढले असतानादेखील नाना जाती, जमाती, धर्म, संप्रदायाच्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे.
पणजी शहरापासून १५ किमी अंतरावरती हे बेट वसलेले असले तरी ते केवळ तिखाजनद्वारे पुलाने जोडलेले आहे. बाकीच्या बाजूंना नद्या खाड्यांनी वेढलेले आहे.
हिवाळ्यात येथे देशविदेशातून असंख्य पक्ष्यांच्या प्रजातींचे आगमन हमखास होते. त्यामुळे त्याला पक्षी अभयारण्याचा दर्जा लाभलेला असला, तरी हे बेट संपूर्ण गोव्यात खारफुटीच्या प्रजातीच्या वैविध्यासाठी ख्यात आहे.
त्सुनामी, वादळी वारे, मुसळधार पर्जन्यवृष्टी आदींच्या नैसर्गिक प्रकोपाला सामोरे जात खारफुटीची इथली जंगले चोडणसारख्या बेटाला संरक्षण प्रदान करतात. सतत भरती-ओहोटीच्या प्रवाहात खार्या पाण्यात त्याचप्रमाणे वादळवार्यांना समर्थपणे तोंड देत खारफुटी खरं म्हणजे तटरक्षकाची भूमिका पार पाडत असतात.
खारफुटीची आणि अन्य वृक्षवेलीच्या मुळात फरक आहे. त्यांना आधार मुळांची देणगी लाभलेली आहे. या मुळांच्या आधारे खारफुटीच्या वनस्पती नदी आणि खाडीच्या पात्रातल्या मातीला घट्ट धरून सशक्तपणे उभ्या असतात. त्यामुळे जमिनींची धूप थोपविण्याच्या दृष्टीने खारफुटी महत्त्वाचे योगदान करतात.
खारफुटीची वनस्पती दलदलीच्या ठिकाणी वाढत असल्याने त्यांना प्राणवायूसाठी संघर्ष करावा लागतो आणि त्यासाठीच परिस्थितीनुसार त्यांच्या मुळात बदल घडलेला आहे. उलट्या दिशेने असलेली श्वसनामुळे या वनस्पतीला प्राणवायू पुरविण्याचे कार्य करतात आणि अतिरिक्त शोषून घेतलेल्या क्षाराचेसुद्धा निस्सारण करतात. खारफुटी असलेल्या जमिनीमध्ये सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे अन्न साखळ्या कार्यक्षम असतात.
आज खरे तर या बेटाचे अस्तित्व नैसर्गिक आपत्तीपासून टिकवण्यासाठी महत्त्वाचे योगदान अभयारण्य करत आहे. आज इथे राहणार्या लोकांचे संरक्षण आणि उदरभरण करण्याचे कार्य हे अभयारण्य कित्येक शतकांपासून करीत आहे. केवळ १ .७८ चौरस किमी क्षेत्रफळात पसरलेल्या या अभयारण्यात पक्ष्यांना गरज असलेल्या अन्नांची रसद बारमाही उपलब्ध असल्याने इथे पक्ष्यांचे थवेच्या थवे आश्रयाला येतात.
लिटल इग्रेट, युरेशियन स्पूनबिल, ग्रे हेरॉन, वेस्टर्न रिफझोट, ब्राऊन हेडेड गल, रेड वेन्टेड बुलबूल, लिटल हेरॉन, ब्लॅक हेडेड आयबिस, ब्राह्मिनी काईट अशा विभिन्न पक्ष्यांच्या प्रजाती खारफुटीच्या वनस्पतीत सकाळ संध्याकाळ वावरतात. उपलब्ध अन्नावरती यथेच्छ ताव मारतात. बगळ्यांच्या विविध प्रजातींना पोषक, नैसर्गिक अधिवास लाभलेला आहे.
हिवाळ्याच्या प्रारंभी, मान्सूनचा पाऊस ओसरू लागला, की देश - विदेशातून स्थलांतरित पक्ष्यांचे थवेच्या थवे गोव्यात असलेल्या पाणथळ, खारफुटीच्या परिसरात दिसू लागतात. त्यात चोडण बेटावरची खारफुटीच्या वैविध्यपूर्ण प्रजातींनी समृद्ध असलेली ही जागा पक्ष्यांसाठी नंदनवन ठरलेली आहे.
पहाटे किंवा संध्याकाळी जेव्हा सूर्याच्या किरणाची प्रखरता कमी होते तेव्हा पक्षी निरीक्षणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या अभयारण्यातल्या मनोर्यावरती बसतात. कोणी होड्यांतून पक्षी निरीक्षणात दंग होतात. इथे दलदल असल्याकारणाने मगरींचेही वास्तव्य या बेटावरती आहे. खारफुटीच्या काही झाडांवर वटवाघळांची वस्ती असून कोल्हा, मुंगूस, खवले मांजर यांसारखे वन्यजीव इथे वावरत असलेले आढळतात.
त्यामुळे इथे येणार्या पर्यटकांना त्यांच्या स्वभावाचे नानाविध पैलू अनुभवण्याची संधी लाभते. अजगर, धामण व घोरपड यांसारख्या वन्यजिवांचा इथे संचार आहे. चोडण बेटावरचे हे अभयारण्य आज पक्ष्यांसाठी नावाजलेले असले तरी इथे खरे वैभव पाहायला मिळते ते खारफुटीच्या विविध प्रजातींचे.
चार पाकळ्यांचे आणि फिकट पिवळा पुष्पकोश असलेली सफेद फुले आणि लांबच्या लांब शेंगा धारण करणार्या रायझोपोरा, म्युक्रोनोटा, लाल रंगाचा पुष्पकोश आणि शेंगाचा खालचा लालसर भाग असलेली बुगेरा जिमनोरायझा, तार्याच्या आकाराची पांढरी फुले असलेले कादेलिया कँडल, एकत्रित गुच्छासारखी पिवळट तपकिरी रंगाची फुले असणारे व्हिसेनिया मरिना, गोल गुळगुळीत हिरव्या रंगाची आणि मोठ्या आकाराची फळे मिरवणारे पांढरी चिपी म्हणजे सोनरेशिया अल्वा आणि चिपीपेक्षा काहीशी लहान फळे असलेले सोनरेशिया पेटेंला, गोलाकार आणि भरपूर बियांचे खाण्यालायक फळांचे सोनरेशिया कॉसिओलरिससारख्या खारफुटीच्या प्रजाती इथे आढळतात.
एका छोट्याशा बेटावरती खारफुटीचे वैविध्य ज्यांना पाहायचे असेल त्यांना डॉ. सलीम अली अभयारण्यासारखा परिसर अन्यत्र अभावानेच आढळेल. हे अभयारण्य गोव्याच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या मुकुटात मणी शोभण्यासारखे आहे. आपल्या पूर्वजांनी मांडवीच्या भरती ओहोटीपासून बेटावरच्या खाजन शेतजमिनीचे रक्षण करण्यासाठी चिखलाचे बांध आणि मानशीची उभारणी कुशलतेने केली होती.
आज ही शेतजमीन खारफुटीच्या विस्तारामुळे जंगलक्षेत्रात परिवर्तित झाली म्हणून स्थानिकांनी त्यांची कत्तल केली नाही आणि अभयारण्याचा दर्जा लाभल्यावर त्याचे अस्तित्व टिकावे आणि समृद्ध व्हावे म्हणून आत्मीयतेनं प्रयत्न आरंभलेले आहेत. मांडवी नदीच्या मुखावरती वसलेले हे खारफुटीचे वैभव टिकवले तरच आपला गाव वैश्विक तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे उद्भवणार्या प्रतिकूल परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाऊ शकणार याची जाणीव असल्याने, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.