

म्हापसा : ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा या बंधूंचा म्हापसा पोलिसांनी अधिकृतपणे ताबा घेतला आहे. बनावट ना-हरकत प्रमाणपत्र तयार केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून, या दोघांनाही सोमवारी दुपारी कोलवाळ कारागृहातून म्हापसा पोलिस स्थानकात हलवण्यात आले आहे.
पोलिसांनी दोघांनाही रितसर अटक केली आहे. दरम्यान, सायंकाळी, स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नाईट क्लबसाठी अबकारी परवाना मिळवण्यासाठी आरोग्य विभागाचा बनावट दाखला वापरल्याचा आरोप लुथरा बंधूंवर आहे.
कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये फेरफार करून आणि बनावट स्वाक्षरीद्वारे हे प्रमाणपत्र मिळवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हडफडे येथील या क्लबला काही महिन्यांपूर्वी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर मालकांच्या या बेकायदेशीर कारभाराचा पर्दाफाश झाला होता.
आगीच्या प्रकरणात ते आधीच न्यायालयीन कोठडीत होते; मात्र आता बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीच्या गुन्ह्याखाली म्हापसा पोलिस त्यांची सखोल चौकशी करणार आहेत. दरम्यान, म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने या बनावट ‘एनओसी’ प्रकरणात लुथरा बंधूंचा अटकपूर्व जामीन नुकताच फेटाळून लावला होता. त्यानुसार, म्हापसा पोलिसांनी सोमवारी या दोघांचा अधिकृतपणे ताबा घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.