पणजी : गोवा विधानसभेची 2022 ची निवडणूक भाजप पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घेतली असून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक भाजपला जिंकायची आहे. यासाठी मायक्रो स्तरावरती नियोजन सुरु केले आहे. त्यामुळे विद्यमान भाजप गोवा (Goa BJP) युनिटला निवडणूक अधिक कठीण जाणार याचे स्पष्ट संकेत दिल्लीतून मिळाले आहेत.
सध्याच्या 25 आमदारांपैकी 13 आमदारांना येत्या विधानसभेसाठी (Goa Assembly Election) तिकीट मिळणार नाही. हा या नियोजनाचा भाग असून स्वच्छ, निष्ठावान आणि तरुण नेतृत्वाला वाव देण्यासाठी केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी कंबर कसल्याची माहिती आहे.
याबाबत वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या राज्य सरकारच्या वतीने अनेक सामाजिक हिताचे प्रयत्न सुरू आहेत. पण नव्याने उघड झालेल्या अनेक प्रकरणांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे पक्षश्रेष्ठींना वाटते. त्यामुळे अशा प्रकरणांत अडकलेले आणि पक्ष हिताच्या विरोधात कार्यरत असलेल्यांना यावेळेला पक्षाकडून बेदखल करण्यात येणार आहे.
राज्यात गाजत असलेले सेक्स स्कँडल, नोकरभरती प्रकरण, पक्षविरोधी कारवाया यामुळे पक्षश्रेष्ठी नाराज आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि संघटन मंत्री बी.एल.संतोष यांनी गोव्याच्या संदर्भात डॅमेज कंट्रोलसाठी विशेष चर्चा केली. या संपूर्ण प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी विद्यमान आमदारांपैकी (MLA) अनेकांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात येणार आहे. पक्षाला स्वच्छ चारित्र्याचे, पक्षासाठी कार्यरत असलेल्या तरुण नेतृत्वाची गरज असून त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती आहे.
अहवालावरच रणनिती ठरणार
पक्षाचे वरिष्ठ संघटन मंत्री बी.एल. संतोष पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी लवकरच पुन्हा गोव्यात (Goa) येत आहेत. ते मतदारसंघनिहाय अहवाल तयार करणार आहेत. तो अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे सादर करण्यात येईल. त्यानुसार विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरणार आहे.
उत्पल पर्रीकर दिल्लीत
पक्षाचे वरिष्ठ नेते स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर सध्या पणजी मतदारसंघातून इच्छुक आहेत. मात्र, स्थानिक नेते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यासाठी बुधवारी अमित शाह यांनी उत्पल पर्रीकर यांना दिल्लीला बोलावून घेतले. त्यांची उत्पलबरोबर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.