
मधू य. ना. गावकर
मऊ चिखलात उभे राहत फुलणारे कमळ उनवाऱ्यात टिकाव धरते, त्याचप्रकारे कृषी शेती, पाऊस, वारा, ऊन, झेलीत पीक देते. ते घेण्यास पूर्वजांनी आपल्या कर्मातून विक्रम करीत आयुष्य वेचले. त्यांनी आपल्या जीवनाचा पवित्र दीप बनवून कष्ट रूपाची ज्योत पेटत ठेवली, म्हणून आज हिरवी वसुंधरा पाहावयास मिळते.
पर्यावरण योगाचा मार्ग त्यांना प्रभू निसर्गाने शिकविला. उजेड देणारा सूर्य पूर्व क्षितिजावर उभा राहताच, सारे जग जागे होते. पक्षी उडतात, गुरे रानात जातात, माणूस आपला व्यवसाय सुरू करतो. सूर्याच्या मुक्या उजेडाने विश्वाला चालना मिळते, माती आणि पाण्याच्या संगतीत जन्मभर कष्ट करणारे पूर्वज म्हातारे झाले, त्यांच्या मुलांनाही काम करून संस्कृतीचा वारसा जपला.
शेतात काम करून दमून घरी आल्यावर चौकीवर बसलेला म्हातारा बाप, सुरकुतलेला थरथरणारा हात त्याच्या पाठीवर ठेवत म्हणायचा, ‘बाळ दमलास काय!’ त्या थापेत प्रेरणा देणारी अपार शक्ती असायची. त्या मायेचा स्पर्श असलेले वात्सल्याचे अनेक हात आजकाल वृद्धाश्रमात थरथरत आहेत. बालपण पाळणाघरात व म्हातारपण वृद्धाश्रमात घालवणे सामान्य प्रथा होत नाही, तोवर वात्सल्याचा हात पाठीवर परत आणण्याची संधी आहे. त्यासाठी आपण प्रमाण राखले पाहिजे.
सृष्टीने सर्वांना रिझवण्यासाठी अपरंपार सौंदर्य ओतून ठेवले आहे. तिच्याकडे अमृताची धार आहे, सकाळचा उष:काल, संध्याकाळची अंबरी रंगशोभा, रात्री कोवळी पौर्णिमा.
त्यावरील नभात अनंत तारे, धरणीवरील उत्तुंग पर्वत. पवित्र नद्या, मखमली वने, उचंबळणारा निळा सागर, वाहणारा वारा, जो शरीराला स्पर्शताच नवजीवन आल्यासारखे वाटते. अपयशाची आलेली ग्लानी सृष्टीच्या सौंदर्याने नाहीशी होते. वाहणाऱ्या ओहोळांचा खळखळणारा आवाज, पक्षांचे मधुर संगीत, मयूराचा फुललेला पिसारा, हरणांच्या उड्या अशी दृश्ये पाहून चंचल मनाला आनंद मिळतो. माणसाचा हा नीतळ आनंद टिकण्यास पाणी हा पातळ पदार्थ मुख्य घटक आहे!
पाणी नसताना कपड्यांना साबण लावल्यास कपडे स्वच्छ होणार नाही, हे सारे समजते ते दूरदृष्टी असणाऱ्या ज्ञानी माणसाला. कोणत्या मार्गाने गेलो तर सर्वांना सुख मिळून सर्वांच्या जीवनाचा विकास होईल, याची जाण आमच्या पूर्वजांना होती.
त्यांच्या विचारांचे संशोधन आज केले तरच भविष्याचे कल्याण होईल. याची जाण महात्मा गांधींनी होती. म्हणूनच त्यांनी सर्वांना तारणारा चरखा, त्यांना परमेश्वर वाटला. त्या परमेश्वरी चरख्याकडे त्यांनी ध्यान लावले आणि गरिबांसाठी ज्ञान प्राप्त केले.
माणसाचा देह म्हणजे रथ आहे. त्या देहरूपी रथात जीव स्वार होतो, बुद्धी सारथी, मन लगाम आणि इंद्रिये घोडे बनून आपण आयुष्याचा रस्ता पार करतो. रथात मिळणारे सुखदुःख भोगीत मेंदूतील बुद्धीवर मात करतो. शेतीला सुरुवात करताना दगडधोंडे, पालापाचोळा दूर करावा लागतो, त्या जमिनीत नांगरणी करून बियाणे करून त्याला तळी, ओहोळाचे पाणी उपसा करून दिल्याने पीक येते.
हे कष्ट पूर्वजांनी घेतले होते. एखाद्या वस्तीच्या वाड्यावर एकच विहीर असल्याने कळशी, घागर भरून पाणी दूर न्यावे लागत होते, अशी कष्टाची कामे पूर्वजांनी केली. पण आज एक घागर भरून पाणी आणण्यास, कुदळीने शेत खणण्यास, विहिरींचे पाणी भरण्यास, शेतास पाणी देण्यास, कल्ली घेऊन कुळागरात शिंपण्यास कोण तयार होत नाही.
त्याने आमचे शरीर सुखावून मस्तावले आहे. पूर्वजांनी शेतीच्या रक्षणासाठी भरतीच्या पाण्यात उतरून बुडून चिखल वर काढून त्या चिखलाने शेतीच्या बांधाला संरक्षण देऊन शेती, बागायती फुलवली. आज आम्ही लावलेला स्प्रिंक्लर सुरू करावयासही आळस करतो.
गोव्याच्या शापुरा नदीला चार नावांनी ओळखतात. महाराष्ट्रातील भेडशी भागात तिला तिळारी म्हणतात, दोडामार्ग भागात मणेरी नदी म्हणतात. गोव्यात बार्देश तालुक्यात कोलवाळ आणि शापुरा नदी म्हणतात. तिच्या तटावर इतिहासकालीन तीन किल्ले आहेत.
हळर्ण किल्ला पेडण्यात, कोलवाळ किल्ला थिवी मैदानी भागात आणि शापुरा किल्ला तिच्या मुखाकडे हे दोन किल्ले बार्देशात आहेत. वाहणाऱ्या नदीच्या काठाला डिचोली तालुक्याची उत्तर सीमा साळ, धुमासे आणि मेणकुरे गावांनी जोडली आहे.
यातील साळ गावाला निसर्गाने बराच लांब ओहळ दिला आहे. त्याचा उगम साळ गावच्या पूर्व बाजूने ‘गणेश कोंड’ या परिसरात झाला आहे. त्या परिसराला पाणी पुरवीत तो खालच्या भागातील चमनाबाग माळरानाला पाणी देण्यास पोहोचतो.
संपूर्ण भागाला पाणी देऊन पुढच्या मार्गक्रमणाने तिरसोळी भागात येतो आणि त्या कृषिक्षेत्राला पाणी देऊन पुढच्या ‘बायलाचो ओहळ’ या ठिकाणी पोहोचून त्या परिसराला ओलावा देतो. खालच्या भागात ‘मधला ओहळ’ या ठिकाणचा परिसर पाण्याने भिजवून पुढच्या मार्गाने कोळम भागातील बागायतीला पाणी पुरवतो. पश्चिम दिशेकडून वळून उत्तर दिशेने प्रवास करीत शेती भाती, बागायतीला पाणी देत, पुढे बाळगान परिसरात मणेरी नदीत विसावतो.
शापुरा नदीचे खारे पाणी ओहोळाच्या मुखाच्या वरच्या भागातील माडयान बंधाच्या खालीपर्यंत भरतीवेळी पोहोचते.
साठवलेले गोडे पाणी संपूर्ण साळ गावाला पुरवतात. हा माणसाने कृत्रिमपणा घडवला, मात्र पूर्वकाळी तिथल्या ओहोळाच्या नैसर्गिक पाण्यावर पूर्वजांनी दोन हातांच्या ताकदीवर कष्ट करीत अवाढव्य घवनाळे, खेमहाळी बोरचा ओहळ, आणि कलमाची व्हाळी नावाने ओळखणारे माळरान (मैदान) जागेत स्वर्ग फुलवला. पावसाळ्यात पाकड, नाचणी, वरी, तूर डोंगरीभात, कांग, कुळीथ, उडीद, काळे तीळ, करांदे, काटेकणगी, अळूमाडी, चिर्का, भोपळा, कुवाळा, काकडी, दोडकी, टरबूज अशी पिके पूर्वज घेत असत. त्यामुळे तो पठार हिरवागार दिसे.
उन्हाळ्यात ओहोळाच्या काठावर परसबाग करून कांदा, मिरची, वाल, वांगी, मुळा लागवडीने ओहोळातील पाण्याच्या उपशाने पीक घ्यायचे. साळ गावाला निसर्गाने सावलीसारखा धाडसाखळ डोंगर दिला आहे. त्या डोंगराला जंगली वनस्पती झाडांचे वरदान लाभले आहे. साळ भूभागाला थंडाव्याचा आशीर्वाद लाभला आहे.
नदीच्या काठावरील भागात सरद-वायंगण भात शेती आहे. शेतात वेगवेगळ्या प्रकारची भातबियाणी पेरून पीक घेतात. वायंगण शेती करताना उंच भागात मिरची, कांदा, अळसांदा, चवळी, भुईमूग, वाल, परसबागांनी भाजीपाल्याचे हिरवे मळे फुलवले जात. त्यामुळे शेतीच्या हिरवळीत भर पडत असे.
परिसर कृषीने भरायचा. कृषीधान्य पिकण्यास गुरांचे शेण, पालापाचोळा आणि चुलीतील राख वापरून भरपूर पीक मिळायचे. साळ गाव म्हणजे कृष्णाचे गोकूळ असल्याचे वाटायचे. कारण सकाळच्या प्रहरी माळरानावर चरण्यास जाणारे गायी म्हशींचे कळप पाहावयास मिळायचे.
साळ येथे मुख्य उत्सव गड्यांचा! या उत्सवाला शहरात अगर परराज्यात कामाधंद्यास गेलेली माणसे, हमखास घरी येतात. प्रत्येकाच्या दारात झावळांचे मंडप उभे राहायचे. शिवाय कालोत्सव, सप्ताह, दसरा, स्थापना असे संस्कृती उत्सव साजरे होतात.
बागायतीत पिकलेली केळी, फणस, आंबा, फळे, खाण्यासाठी वटवाघळांचे थवे गावातील उंच झाडांवर लोंबकळताना आजही पाहावयास मिळतात. माडवेश्वर, बाब्रेश्वर, धाडसाखळ्यो, कर्वेश्वर, घवनाळेश्वर, जठार या देवरायांनी साळ गावच्या सीमा तिथल्या धाडसाखळ डोंगराची राखण केली आहे. इतकेच नव्हे तर गावच्या पूर्वजांना कृषिधान्य पिकवण्यासाठी शक्ती दिली होती. गेल्या पन्नास वर्षापूर्वीचा पर्यावरणीय साळ गाव आज बदलताना दिसत आहे. त्या गावचा ओहळ शांतपण वाहत, हे सारे पाहत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.