

डिचोली: डिचोली आणि परिसरातील मासळी मार्केटांमध्ये सध्या विविध प्रकारच्या माशांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असली, तरी मासळीचे दर मात्र कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. विशेषतः मत्स्यप्रेमींच्या पसंतीची ‘सुरमई’ महागल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.
डिचोलीसह कारापूर-तिस्क येथील मासळी मार्केटांमध्ये दररोज ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सोमवार आणि गुरुवार हे दिवस वगळता अन्य दिवशी मार्केटात मत्स्यखवय्यांची कायम वर्दळ असते. गावठी तसेच खोल समुद्रातील विविध प्रकारचे ताजे मासे बाजारात उपलब्ध होत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे अनेकजण चिकनपेक्षा मासळीला अधिक पसंती देत आहेत. त्यातच जून महिन्यापासून जवळपास दोन महिन्यांची मासेमारी बंदी लागू होणार असल्याने मत्स्यप्रेमी सध्या आवडीच्या माशांचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत.
मासळीचे वाढते दर पाहता गावोगावी दुचाकी व रिक्षांमधून होणाऱ्या मासेविक्रीवरही परिणाम झाला आहे. तरीही मत्स्यखवय्यांचा उत्साह कमी झालेला नसून बाजारपेठांमध्ये सध्या मासळी खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे.
१ यंदा मार्केटात ‘सुरमई’चे प्रमाण तुलनेने कमी असल्याने तिच्या दरांनी विक्रमी उंची गाठली आहे. सध्या ‘सुरमई’चा दर चौदाशे ते दीड हजार रुपये किलोपर्यंत पोहोचला असून, हा दर ऐकून अनेक ग्राहकांच्या कपाळावर आठ्या पडत आहेत.
२याशिवाय कोळंबी आकारानुसार ४०० ते ५०० रुपये किलो, पापलेट ५०० ते ६०० रुपये किलो, बांगडे ४०० ते ५०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. तारले आणि इतर बारीक मासे २०० रुपये वाटा या दराने उपलब्ध आहेत.
दुसरीकडे, फोंड्यातील मासळी मार्केटमध्ये मासळीचे दर चढे असल्याने सर्वसामान्य गोमंतकीय मत्स्यप्रेमी हिरमुसला झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मासळीचे दर तसे चढेच आहेत, त्यातच इतर राज्यांतून येणारी मासळी ताजी नसल्याने मत्स्यप्रेमी ती खाण्यास टाळाटाळ करत आहेत. दरम्यान, फोंडा मासळी बाजारात गावठी मासळीला मोठी मागणी आहे; पण या मासळीचे दरही आवाक्याबाहेर असल्याने नेमके खायचे काय, असा सवाल फोंडावासीयांसमोर उभा ठाकत आहे.
फोंड्यातील जुने मासळी मार्केट पाडून त्याजागी पालिका बाजार उभारण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व मासळी विक्रेत्यांना फोंडा पालिकेने मार्केट संकुलाच्या तळघरात व्यवस्था करून तेथे हलवण्यात आले आहे. वास्तविक या ठिकाणी तशा अनेक गैरसोयी आहेत; पण नवीन मासळी मार्केट उभारण्यात येत असल्याने ‘चलता है’ असे धोरण सध्या ग्राहक आणि विक्रेत्यांकडून स्वीकारण्यात आले आहे.
फोंड्यात सध्या बांगडे ४०० रुपये किलो, इसवण एक हजार रुपये किलो, कोळंबी साडेतीनशे ते ४०० रुपये किलो, वेर्ल्या ३०० रुपये किलो, तारल्या २०० रुपये, लेपो ३०० रुपये किलो, पापलेट ६०० रुपये किलो या भावाने विकले जात आहे. मासळीचा वाटा दोनशे रुपये याप्रमाणे विकण्यात येत आहे. गावठी मासळीचे दरही तसे चढेच आहेत. शेवटे आकारानुसार ५०० ते ७०० रुपये वाटा, गावठी कोळंबी आकारानुसार दोनशे ते ५०० रुपये वाटा, खेकडे किमान ४०० ते ८०० रुपये वाटा, काळुंदरे किमान ५०० रुपये वाटा, गावठी दोडकारे तीनशे ते पाचशे रुपये वाटा या भावाने आकारानुसार विकले जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.